मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १२२

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२२ 

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।

तयाकारणे वामनु चक्रपाणी ।

द्विजांकारणे भार्गव च्यापपाणी 

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२२।।

अर्थ : इंद्राने देवाची करुणा भाकली तेव्हा भगवंताने वामन अवतार धारण केला. द्विजांच्या रक्षणार्थ त्याने धनुष्यबाण धारण केलेल्या परशुरामाचा अवतार घेतला. भगवंत आपल्या भक्तांचा अशा प्रकारे कैवारी असून त्यांची तो कधीही उपेक्षा करीत नाही. 

(वज्रपाणी - इंद्र, वामनु -वामन अवतार, चक्रपाणी - विष्णू /भगवंत, द्विज - ब्राह्मण, भार्गव - परशुराम, च्यापपाणी - धनुष्यबाण धारण केलेला/भगवंत ) 

आधीच्या श्लोकात आपण भक्त प्रल्हादाबद्दल जाणून घेतले. या श्लोकात त्याचा नातू असलेला बली याचा संदर्भ आला आहे. त्याशिवाय द्विजांच्या रक्षणासाठी झालेल्या परशुराम अवताराचा देखील संदर्भ आहे. प्रल्हादाप्रमाणेच बली हा देखील भगवंताचा महान भक्त होता. तो अत्यंत पराक्रमी होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे म्हणून शंभर यज्ञांचे आयोजन केले होते. त्यापैकी ९९ यज्ञ निर्विघ्नपणे पार पडले. आता शंभरावा यज्ञ पूर्ण झाला तर आपले इंद्रपद जाईल याची भीती इंद्राला वाटू लागली. त्याने विष्णूंची प्रार्थना केली. 

विष्णूने मग अदितीच्या पोटी वामन म्हणून जन्म घेतला. बटू वेशात थेट बलीच्या यज्ञशाळेत प्रस्थान केले. बली हा दानवीर होता. त्याने वामनरूपातील विष्णूचे यथोचित स्वागत करून त्यांना आपल्याला जी गोष्ट हवी आहे, ती सांगा. मी लगेच आपल्याला देतो असे म्हटले. याप्रसंगी वामन रूपातील भगवंताने आपल्याला केवळ तीन पावले एवढी भूमी द्यावी अशी विनंती केली. ही अजब आणि अत्यंत किरकोळ विनंती ऐकून बली क्षणभर चक्रावला. पण त्याने वामनाची मागणी पूर्ण करण्याचे ठरवून हातावर उदक सोडले. यावेळी दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी बलीला विरोध करून असे करू नकोस असे सांगितले. पण आपल्या शब्दाचा पक्का असलेल्या बलीचा निश्चय अटळ होता. 

त्याने हो म्हणताच वामन रूपातील भगवंताने विश्वव्यापक रूप धारण केले. एका पावलाने जमीन आणि दुसऱ्या पावलाने आकाश व्यापले. आता बलीने नम्र शरणागती पत्करली आणि आपले मस्तक त्याच्यापुढे झुकवले आणि तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्याची विनंती केली. तेव्हा वामनाने  आपले तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवले. त्याने बलीला पाताळात धाडले. तिथले राज्य दिले आणि स्वतः विष्णू त्याचे द्वारपाल झाले. शिवाय पुढील मन्वंतरात विष्णूने बलीला इंद्रपद दिले. अशा रीतीने भगवंताने इंद्र आणि बली अशा आपल्या दोन्ही भक्तांची लाज राखली.

या श्लोकातील पुढील संदर्भ भगवान परशुरामांचा आहे. त्यांच्या काळात काही क्षत्रिय राजे अत्यंत अहंकारी आणि अन्यायी झाले होते. त्यांनी भगवंताचे भक्त असलेल्या निरपराध ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या या भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंताने जमदग्नी ऋषींच्या पोटी जन्म घेतला. हाच परशुराम अवतार. त्यांनी उन्मत्त झालेल्या क्षत्रिय राजांशी युद्ध करून त्यांचा नाश केला. काही लोक परशुराम अवताराला ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते योग्य नाही. कारण अन्यायी आणि अधर्मी राजांचा वध श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी देखील केला आहे. अशा रीतीने आपल्या भक्तांचा अभिमानी असलेला भगवंत त्यांच्या रक्षणार्थ धावून जातो. तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. 

स्वसंवाद 

१. बली राजाप्रमाणे मी माझ्या आयुष्यात दिलेला 'शब्द' किंवा घेतलेला चांगला 'निश्चय' कितीही मोठे नुकसान सोसावे लागले तरी अढळ ठेवतो का? 

२. इंद्राप्रमाणे जेव्हा मला माझ्या पदाची किंवा वैभवाची भीती वाटते, तेव्हा मी मत्सर करत बसतो, की विवेकाने ईश्वराचा धावा करून योग्य मार्ग शोधतो? 

३. वामन अवताराप्रमाणे, भगवंत जेव्हा माझा अहंकार दूर करण्यासाठी मला संकटात टाकतो, तेव्हा मी बलीसारखे स्वतःचे मस्तक (अहंकार) त्याच्या चरणी समर्पित करायला तयार असतो का?

 ४. परशुराम अवताराच्या कथेवरून, माझ्या अंगी असलेल्या शक्तीचा किंवा अधिकाराचा उपयोग मी उन्मत्तपणे इतरांना त्रास देण्यासाठी करतो, की दुर्बलांच्या रक्षणासाठी करतो?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

७/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...