उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४३
अविद्यागुणें मानवा उमजेना ।
भ्रमे चूकले हित ते आकळेना ।
परीक्षेविणें बांधले दृढ नाणे ।
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ।।१४३।।
अर्थ : आपल्यावर अविद्येच्या ( अज्ञानाचा ) प्रभाव असल्यामुळे आपल्याला खरे काय आहे ते लक्षात येत नाही. बुद्धी भ्रमित झाल्याने आपला मार्ग चुकतो. त्यामुळे आत्महित नेमके कशात आहे ते समजत नाही. एखाद्या नाण्याची ते खरे आहे की खोटे अशी पारख न करताच आपण ते गाठीला बांधतो. त्यामुळे सत्य काय आणि असत्य आहे हे आपल्यला कळतच नाही.
( अविद्यागुणें - अज्ञानाच्या प्रभावामुळे, परीक्षेविणे - पारख केल्याशिवाय, मिथ्या - असत्य )
विवेचन
समर्थ म्हणतात," आपल्यावर अविद्येचा पगडा असतो. " विद्येचा अभाव म्हणजे अविद्या. थोडक्यात सांगायचे तर अज्ञान. अज्ञानाचा पडदा आपल्या बुद्धीवर असल्याने ज्ञान झाकले गेले आहे. देहबुद्धीच्या प्रभावामुळे दृश्य गोष्टी आपण खऱ्या मानून चालतो. जे प्रत्यक्षात नाही ते खरे वाटणे हा भ्रम आहे. म्हणूनच या दृश्य जगताचा मोह आपल्याला पडतो. ते खरे वाटू लागते. हे आपले अज्ञानच होय. इथे व्यावहारिक शिक्षणाबद्दल समर्थ बोलत नसून त्यांचा रोख अध्यात्मिक ज्ञानाकडे आहे. आपल्याजवळ कितीही ज्ञान असले, कितीही पदव्या आपण प्राप्त केल्या, कितीही ग्रंथ वाचले तरी जे दृश्य आहे त्याला आपण सत्य मानून चालतो. पण या साऱ्या दृश्य गोष्टी विनाशी आहेत. एक दिवस नष्ट होणाऱ्या आहेत. अविनाशी, चिरंतन असे आत्मतत्त्व किंवा परमात्मा आहे. त्याला आपण विसरतो. त्यामुळे ज्या गोष्टींना महत्व द्यायला हवे त्यांना दिले जात नाही. नको त्या गोष्टींना आयुष्यात आपण महत्वाचे मानून बसतो. हाच भ्रमाचा पडदा आपल्या डोळ्यांवर असतो. त्यामुळे आपले हित कशात आहे ते आपल्याला कळत नाही.
महाभारतातील युद्धात जेव्हा कौरव आणि पांडव सेना समोरासमोर आल्या तेव्हा अर्जुनाने पाहिले की ज्यांच्याबरोबर आपल्याला लढायचे आहे ते म्हणजे शत्रू वगैरे कोणी नसून आपलेच बंधू, पितामह, गुरु इ. मंडळी आहेत. अशा आपल्याच व्यक्तींचा वध आपण कसा करणार ? त्यामुळे अर्जुन मोहग्रस्त झाला होता. त्याचा मोह म्हणजेच त्याचे एक प्रकारचे अज्ञान होते. कृष्णाने उपदेश केल्यानंतर हा मोहाचा पडदा किंवा भ्रम दूर झाला. सत्याची जाणीव होऊन अर्जुन युद्धाला प्रवृत्त झाला.
आज विज्ञानाने अनेक शोध लावून आपले जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही सगळी भौतिक प्रगती आहे. माणूस आत्मिक उन्नतीपासून मात्र दूर जातो आहे. भौतिक शोधांनी मानवी जीवन सुखी झाले आहे यात वाद नाही. पण जे आधुनिक शोध लागले त्यामुळे माणूस त्याचा साधन म्हणून वापर करून घेण्यापेक्षा त्यालाच साध्य मानू लागला. त्यातच रमू लागला. आपल्या जगण्याचा मूळ उद्देशच विसरला. टीव्हीचा शोध लागला आणि जगभरातील बातम्या घरबसल्या पाहता येऊ लागल्या. मोबाईलचा शोध लागला आणि जग जणू आपल्या मुठीत आले. इंटरनेटमुळे जगभरातील सगळ्या प्रकारचे ज्ञान केवळ एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध झाले. पण खरंच माणूस सुखी झाला का ? त्याची त्या साधनांची ओढ किंवा हाव अधिकच वाढली. विज्ञानाचे नवे शोध हे त्याच्या वासनापूर्तीचे एक साधन बनले.
पण माणसाच्या अंतरीची अस्वस्थता मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. असे का होते ? कारण त्याची दिशाभूल झाली आहे. भ्रमामुळे आपले कायमचे हित कशात आहे हे तो विसरूनच गेला आहे. त्याला या झोपेतून जागे करण्याची गरज आहे. समर्थांसारखे संत अत्यंत तळमळीने हे कार्य करीत असतात. इथे समर्थ एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणजे एखाद्या नाण्याचे. कोणी आपल्याला एखादे नाणे दिले की ते खरे आहे की खोटे याची पारख न करताच आपण ते कमरेला बांधतो. मग बाजारात जेव्हा आपल्याला ते नाणे खर्चण्याची वेळ येते, तेव्हा दुकानदार ते नाणे घेत नाही. मग आपल्याला कळते जे नाणे आपण पारख न करता ठेवून घेतले, ते प्रत्यक्षात नकली आहे. आपल्याकडील नोटा जेव्हा आपण बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा त्यातील एखादीही नोट नकली असेल तर ती चालत नाही. उलट आपल्यालाच प्रश्न विचारले जातात. ही नोट तुम्ही कुठून आणली ? तुम्हाला कोणी दिली वगैरे. आणि आपला काही दोष नसतानाही आपल्यासाठी ती डोकेदुखी ठरते.
व्यवहारात जर खोटी नोट किंवा खोटे नाणे चालत नाही तर अध्यात्मात कसे चालेल ? म्हणूनच आपण जी गोष्ट आपल्या उपयोगाची म्हणून घेतो आहोत, ती खरोखरच आपल्या हिताची आहे का याचा विचार करूनच तिचा स्वीकार करायला हवा. विवेक आणि वैराग्य या दोन कसोट्या लावून अशा गोष्टी स्वीकारायच्या की नाहीत हे ठरवायला हवे. सत्य काय आणि असत्य काय हे कळणे म्हणजे विवेक. जे जे दिसते, भासते ते ते सारे नाशिवंत आहे. ते सत्य वाटणे हा आपला भ्रम आहे. परमात्मा हेच चिरंतन सत्य आहे. तेच परीक्षा करून गाठीशी बांधायला हवे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ' सार ' आपल्यापाशी ठेवावे आणि ' असार ' टाकून द्यावे.
स्वसंवाद
१. माझ्या आयुष्यात मी पुस्तकी ज्ञानालाच सर्वस्व मानून वावरत आहे, की आत्मज्ञानाचा अभाव असलेली 'अविद्या' दूर करून विवेक जागृत ठेवण्याचा प्रयत्न करतो?
२. अर्जुनाप्रमाणे मी सुद्धा या नश्वर जगतातील नात्यांच्या आणि मोहाच्या पडद्याखाली अडकून माझे खरे कर्तव्य तर विसरत नाही ना?
३. मोबाईल, टीव्ही किंवा इंटरनेट यांसारख्या आधुनिक साधनांना मी केवळ 'साधन' म्हणून वापरतो, की त्यांनाच माझे 'साध्य' मानून माझी शांती आणि वेळ गमावून बसलो आहे?
४. बँकेत खोटी नोट नाकारली जाते, तसे माझ्या आयुष्यात मी पारख न करता (विवेक न वापरता) ज्या गोष्टी गाठीशी बांधल्या आहेत, त्या मला अंतिम क्षणी खरोखरच तारणार आहेत का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३१/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा