उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११५
तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ।
जनीं बोलण्यासारखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ।।११५।।
अर्थ : ज्या चर्चेतून काही तत्व किंवा सार हाती लागू शकेल अशाच चर्चेत भाग घ्यावा. आपल्याला आपल्या ज्ञानाचा जो अहंकार झालेला असतो, त्यात विवेकाच्या साहाय्याने बदल घडवून आणावा. आपले वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असावी. भक्तिमार्गामुळे आपल्या चित्तात बदल होतो, म्हणून भगवंत प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करावा.
विवेचन
समर्थांनी आधीच्या श्लोकात केलेल्या उपदेशाची पुनरावृत्ती या श्लोकात झालेली आपल्याला आढळते. परंतु त्यांचे महत्त्व पुन्हा आपल्या मनावर ठसावे आणि आपल्या अंतरंगात बदल व्हावा यासाठीच चांगल्या गोष्टींची ही पुनरावृत्ती ! आजच्या धकाधकीच्या काळात सर्वसामान्य माणसाचे जीवन ताणतणावाचे झाले आहे. मानसिक शांती मिळावी, आपल्या मनातील प्रश्नांची योग्य ती उत्तरे मिळावीत म्हणून माणूस विसाव्याची ठिकाणे शोधत असतो. याचाच फायदा घेऊन आजकाल भोंदू बुवा, बाबा यांनी परमार्थाचा बाजार मांडलेला आपल्याला दिसतो. सर्वसामान्यच काय परंतु शिकलेले लोक देखील त्याला कसे बळी पडतात आणि आपले सर्वस्व कसे गमावतात याची अनेक उदाहरणे वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात.
अशा लोकांसाठी समर्थांनी तळमळीने इशारा देऊन ठेवला आहे की जिथे आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळतील, शंका निरसन होईल आणि जी काही चर्चा होईल त्यातून साररूपी नवनीत हाती लागेल, अशाच ठिकाणी माणसाने जावे. बुवाबाजी आणि व्यर्थ चर्चांमध्ये अडकू नये.
परिश्रमपूर्वक ज्ञान प्राप्त करणे ही चांगलीच गोष्ट आहे. जेवढे ज्ञान अधिक तेवढा माणूस अधिक नम्र व्हावा अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात होते उलटेच !माणसांना आपल्या ज्ञानाचा अहंकार व्हायला लागतो. अशा वेळी पुढील प्रगती हळूहळू मंदावते. कारण मला काही जाणून घ्यायचे नाही, मला सगळेच माहिती आहे असा अहंकार माणसाला होतो. अशा माणसांसाठी समर्थ म्हणतात की विवेकाचा आश्रय घ्यावा. विवेक म्हणजे योग्यायोग्य, बरेवाईट यातील फरक करण्याची क्षमता. त्याच्या साहाय्याने हे जाणून घ्यावे की आपला अहंकार हा आपल्या प्रगतीच्या आड येणारा आहे. हे लक्षात आले की त्यावर मात करणे सोपे होते. जगामध्ये अपरंपार ज्ञान आहे आणि आपल्याला अजून खूप शिकायचे आहे. आपल्याला जे काही माहिती आहे ते एखाद्या वाळूच्या कणापेक्षा सुद्धा कमी आहे हे सुद्धा विचार केल्यानंतर लक्षात येते. आईन्स्टाईन सारखा बुद्धिमान शास्त्रज्ञ एकदा म्हणाला होता की मला जे माहिती आहे ते वाळूच्या एखाद्या छोट्याशा कणा पेक्षा सुद्धा कमी आहे.
भगवंत प्राप्तीसाठी केवळ कोरडे ज्ञान उपयोगाचे नसते. त्यामध्ये भक्तीचा ओलावा हवा. परमेश्वराला भक्ती प्रिय आहे. भक्तिमार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. खरी भक्ती माणसाला नम्र बनवते. हनुमंत, समर्थ रामदास हे रामाचे परमभक्त होते पण त्यांची नम्रता केवढी ! ते स्वतःला रामाचा दास किंवा सेवक म्हणवून घेतात. संत ज्ञानेश्वर असो की आणखी कोणतेही संत. या सगळ्या संतांमध्ये कमालीचे नम्रता होती आणि आपण जे काही बोलतो आहोत ते आपल्या गुरूंचे कृपेमुळेच बोलतो आहोत असे ते म्हणत. आपण परमेश्वराची जी भक्ती करतो किंवा गुरूंची सेवा करतो त्यातून आपल्या चित्तामध्ये परिवर्तन घडवून आले पाहिजे. खरी भक्ती चित्तात अंतर्बाह्य पालट घडवून आणते. तेव्हा आपणही हा भक्तिमार्गच स्वीकारावा. ' मना सज्जना भक्तिपंथेचि जावे' ही समर्थांची शिकवण कायम लक्षात ठेवावी.
स्वसंवाद
१. ताणतणाव आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी खऱ्या 'सुखसंवादाचा' आधार घेतो, की भोंदू बुवा-बाबांच्या दांभिक प्रचाराला बळी पडतो?
२. माझ्याकडे असलेल्या ज्ञानामुळे किंवा पदव्यांमुळे मी अधिक नम्र झालो आहे, की "मला सगळेच माहीत आहे" असा अहंकार माझ्या प्रगतीच्या आड येत आहे?
३. माझ्या रोजच्या वाचनात आणि आचरणात केवळ 'कोरडे ज्ञान' आहे, की भगवंताला प्रिय असणारा 'भक्तीचा ओलावा' (प्रेम) मी आत्मसात केला आहे?
४. हनुमंत आणि समर्थ रामदास यांच्याप्रमाणे, मी स्वतःला नम्रपणे भगवंताचा केवळ 'दास' किंवा 'सेवक' मानतो का ?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा