उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४०
जयाचे तया चुकले प्राप्त नाही ।
गुणें गोविलें जाहलें दुःख देहीं ।
गुणावेगळी वृत्ती ते ही वळेना ।
जुने ठेवणें मीपणें आकळेना ।।१४०।।
अर्थ : आत्मस्वरूप हे आपल्या[पैकी प्रत्येकाच्या मालकीचे असते. पण त्रिगुणांच्या फेऱ्यात अडकल्याने आपणास ते गवसत नाही. जीव त्रिगुणात अडकल्याने त्याला देहाशी निगडित येणारे दुःख भोगावे लागते. देहबुद्धीमुळे वृत्ती त्रिगुणांच्या बाहेर धाव घेत नाही. अहंकारामुळे त्याला अनादी असा आत्मस्वरूपाचा ठेवा समजू शकत नाही.
( चुकणे - गमावणे, गुणे - सत्व, रज, तम या गुणांनी युक्त, गोविले - अडकवले, गुणावेगळी - त्रिगुणापासून अलिप्त, वळेना -होणे )
विवेचन
आधीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला अंतर्यामी असलेल्या 'जुन्या ठेव्याची' म्हणजेच आत्मस्वरूपाची जाणीव करून दिली. या १४० व्या श्लोकात समर्थ अतिशय मार्मिकपणे सांगतात की, ही आत्मरूपी संपत्ती कोणा दुसऱ्याची नसून 'जयाचे तया' म्हणजे आपली स्वतःचीच आहे. तरीही ती आपल्याला प्राप्त होत नाही. आपली अवस्था ' तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी ' अशी झाली आहे. मानवाचे मूळ स्वरूप 'सच्चिदानंद' (सत्, चित्, आनंद) असे आत्मस्वरूप आहे. हा आनंदाचा मूलस्रोत आपल्या आतच असतो, त्यामुळे तो प्राप्त करण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नसते. पण शोकांतिका अशी आहे की, जे आपले मूळचे आहे, तेच आपण विसरून बसलो आहोत.असे घडण्याचे कारण म्हणजे समर्थांच्या मते आपण सगळे ' गुणे गोविले ' गेलो आहोत. एखाद्या शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकावे तशी आपली अवस्था या त्रिगुणात अडकल्याने झाली आहे.
हे तीन गुण कोणते ? तर सत्त्व, रज आणि तम. आपल्या भोवतीची प्रकृती या तीन गुणांनी युक्त आहे. आपण सर्व जीव या त्रिगुणांच्या जाळ्यात अडकलो आहोत. माणसाला जेव्हा आनंद होतो, सुखाची अनुभूती होते, तेव्हा तो सत्त्वगुणात असतो. सत्त्वगुण उत्तम असला तरी त्यातून अहंकार निर्माण होण्याची भीती असते. जेव्हा आपण ऐहिक गोष्टींच्या मागे धावतो, कर्माची आसक्ती ठेवतो, तेव्हा रजोगुण वरचढ असतो; आणि जेव्हा आळस, अज्ञान किंवा संताप येतो, तेव्हा तमोगुण प्रभावी होतो. माणूस आयुष्यभर या तीन गुणांच्या चक्रातच फिरत राहतो. व्यक्तिपरत्वे या तिन्ही गुणांचे प्रमाण वेगवेगळे असले तरी जोपर्यंत आपण गुणातीत होत नाही म्हणजेच या गुणांच्या सापळ्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होणार नाही. या त्रिगुणांच्या फेऱ्यामुळे 'मी म्हणजे केवळ हा देहच आहे' ही भावना (देहबुद्धी) घट्ट होते आणि मग देहाला होणारी सुख-दुःखे, आजार, मान-अपमान स्वतःवर ओढवून घेऊन जीव दुःख भोगत राहतो.
या दुःखातून सुटायचा मार्ग म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे (गुणातीत) जाणे. परंतु आपली मनोवृत्ती या त्रिगुणांच्या बाहेर पडायला तयार होत नाही. संसारात राहूनही अलिप्त राहणे आपल्याला जमत नाही. त्यातच 'मीपणा' म्हणजेच अहंकार आडवा येतो. 'मी कर्ता आहे', 'माझे ज्ञान श्रेष्ठ आहे' हा अहंकार जोपर्यंत गळून पडत नाही, तोपर्यंत आपल्याच उरात दडलेला हा अनादी आत्मस्वरूपाचा अक्षय ठेवा आपल्याला समजू शकत नाही. त्रिगुणांचा प्रभाव ओळखून संतांच्या मार्गदर्शनाने जेव्हा आपण गुणातीत होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच खऱ्या मुक्तीचा आणि आनंदाचा मार्ग मोकळा होतो.
स्वसंवाद
१. माझ्या स्वतःच्या मालकीचा 'आत्मस्वरूपाचा आनंद' माझ्याकडे असताना, मी सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या फेऱ्यात अडकून नको त्या गोष्टींचे दुःख भोगत आहे का?
२. देहाला होणारे आजार, संकटे किंवा मान-अपमान यामुळे मी विचलित होतो, की 'मी केवळ हा देह नसून या देहातील साक्षी आत्मा आहे' या भावनेने त्रिगुणांच्या पलीकडे (गुणातीत) जाण्याचा प्रयत्न करतो?
३. माझा 'मीपणा' (अहंकार) मला माझ्या अंतर्यामी असलेल्या ईश्वरी ठेव्याची (आत्मज्ञानाची) जाणीव होण्यापासून रोखत आहे का?
४. रोजच्या व्यवहारामध्ये रज-तमाचा प्रभाव कमी करून, संतांच्या विचारांनी आपली वृत्ती सात्त्विक आणि विवेकपूर्ण बनवण्यासाठी मी काय प्रयत्न करत आहे?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२७/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा