मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १३९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३९ 

पुढे पाहतां सर्व ही कोंदलेंसे ।

अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ।

अभावें कदा पुण्य गाठी पडेना ।

जुने ठेवणें मीपणें आकळेना ।।१३९।।

अर्थ : ईश्वरी तत्त्वाने सर्व जगत व्यापलेले आहे. परंतु भाग्यहीन किंवा श्रद्धाहीन माणसाला भगवंताची सगुण मूर्ती ही केवळ पाषाणाची आहे असे वाटते. श्रद्धेचा अभाव असल्याने पुण्यसंचय होऊ शकत नाही. देहबुद्धीमुळे अनादि आत्मस्वरूपाचे आकलन होत नाही. 

( कोंदलेले - व्यापलेले, अभाग्यास - श्रद्धाहीन/भाग्यहीन व्यक्ती, अभावे - श्रद्धा नसल्याने, गाठी पडणे - संचय होणे )

विवेचन 

जे आत्मज्ञानी संत असतात त्यांना सर्वत्र ईश्वरी तत्त्व दिसते. हे चराचर सर्वच परमेश्वराने व्यापलेले आहे. अंतरंगातही तोच भरून राहिला आहे. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या असे शंकराचार्यांनी जरी म्हटले असले तरी हे दृश्य जगत त्या परमेश्वराचीच निर्मिती असल्याने त्यातही तो भरून राहिला आहे. या विश्वातील सर्व पदार्थ धन आणि ऋण विद्युतकणांनी भारलेले असतात. प्रत्येक पदार्थात त्यांचे प्रमाण कमी जास्त असल्याने तो पदार्थ वेगळा ठरतो. हिरा आणि कोळसा हे दोघेही पदार्थ कार्बनपासून निर्माण झाले आहेत. तरी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांचे मूल्य ठरते. हिऱ्याला परमेश्वराच्या मुकुटात स्थान मिळते. कोळसा जळणासाठी वापरला जातो. तसेच ईश्वरी तत्त्व देखील सर्व पदार्थात आणि प्राणीमात्रात भरून राहिले आहे. पण ज्यांच्याजवळ दृष्टीचा अभाव आहे त्यांना हिरा आणि गारगोटी सारखीच वाटणार. 

जर हेच तत्त्व सर्वत्र व्याप्त असेल तर मंदिरातील सगुण मूर्तीतही ते आहेच. परंतु भाग्यहीन माणसे त्या मूर्तीतही केवळ पाषाणच पाहतात. केवळ भौतिकवादी किंवा नास्तिक व्यक्तींना मंदिरातील मूर्ती पाषाणाचीच भासते. ' श्रद्धा ' हे जीवनातील अतिशय महत्वाचे मूल्य आहे. नैतिक मूल्ये, संस्कार आदी गोष्टींवर श्रद्धेपोटीच तर आपण विश्वास ठेवतो ना ? पण ज्याच्याजवळ श्रद्धा नाही अशा व्यक्तीला समर्थ अभागी म्हणतात. जिथे श्रद्धाच नाही तिथे पुण्यसंचय घडेलच कसा ? मूर्तीत जर परमेश्वर नसेल तर जगात सर्वत्र थोर व्यक्तींचे जे पुतळे उभारले जातात ते केवळ पाषाणाचेच किंवा धातूचेच म्हणावे लागतील. पण तरीही सर्वत्र लोक त्यांच्यातील तत्त्व लक्षात घेऊन त्यांची पूजा करतातच ना ? श्रद्धा किंवा भाव महत्वाचा असतो. आणि तो मनात असतो.

आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण जे अनुभवतो ते सर्व खरे असलेच असे नाही. टीव्ही किंवा चित्रपटात आपण अनेक दृश्ये किंवा घटना पाहतो. परंतु त्या सगळ्याच खऱ्या नसतात हे आपण अनुभवाने जाणतो. एखादे अमूर्त चित्र जर आपण वेगवेगळ्या व्यक्तींना दाखवून त्यांना त्यात काय दिसते हे विचारले तर प्रत्येकाला त्या चित्रात वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. त्या गोष्टी चित्रात नसून त्यांच्या मनात असतात. त्याप्रमाणे भक्ताला सर्व जगत परमेश्वराने व्यापलेले दिसते. नास्तिक व्यक्तीला ते अनुभवास येत नाही. 

पाप-पुण्य, देशभक्ती, गुरुभक्ती यासारख्या गोष्टी विज्ञानात आढळणार नाहीत. परंतु आपण त्या मानतो. त्यामुळेच मानवी जीवन सुंदर झाले आहे. सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहून चालत नाहीत. परमेश्वर तर मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. वेद उपनिषदे देखील त्याच्याबद्दल बोलताना नेती नेती म्हणतात. पण संतांनी हे ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष अनुभवले आहे. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार त्यांना झालेला असतो. पण या सगळ्याच गोष्टी ज्यांना नाकारायच्याच आहेत, त्यांना समर्थ अभागी किंवा भाग्यहीन म्हणतात. त्यामुळे आपल्याजवळच असलेला आत्मस्वरूपाचा अक्षय ठेवा ज्याला समर्थ जुने ठेवणें म्हणतात तो कळत नाही.

स्वसंवाद 

१. मी मंदिरातील सगुण मूर्तीकडे किंवा जगातल्या गोष्टींकडे केवळ 'पाषाण' किंवा 'भौतिक वस्तू' म्हणून पाहतो, की त्यामागे व्यापून राहिलेले ईश्वरी चैतन्य अनुभवण्याचा प्रयत्न करतो?

२. हिरा आणि कोळसा यांच्यातील फरकाप्रमाणे, मी केवळ बाह्य स्वरूपावर भुलतो की त्यामागील अंतरंगाची खरी योग्यता ओळखतो?

३. विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या पण जीवनाला सुंदर बनवणाऱ्या प्रेम, श्रद्धा आणि नैतिक मूल्यांवर माझा अढळ विश्वास आहे का?

४. माझ्या स्वतःच्या देहबुद्धीमुळे आणि साशंकतेमुळे माझ्या जवळच असलेला 'आत्मस्वरूपाचा अक्षय ठेवा' (जुने ठेवणे) मी गमावून तर बसलो नाही ना?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२५/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

थोडा बदल केला आहे. वाचून पहा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...