मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १३७

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३७ 

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।

परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ।

देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना ।

जुने ठेवणे मीपणे आकळेना ।।१३७।।

अर्थ : अज्ञानी जीवांना संत आत्मकल्याणाचा मार्ग स्पष्टपणे सांगून गेले आहेत. परंतु अज्ञानी जीवांचे अज्ञान तसेच राहिले. देहबुद्धीमुळे जे जे कर्म आपल्या हातून घडते ते ते सर्व आपल्याला आपल्या मूळ स्वरूपापासून दूर नेते. त्यामुळे संतांनी सांगितलेला जो अक्षय सुखाचा ठेवा आहे, तो आपल्या लक्षात येत नाही.

( जीवा - अज्ञानी माणसे, श्रेष्ठ - थोर साधुसंत, ठेले - तसेच राहिले, खोटे कर्म - अज्ञानातून निर्माण होणारे कर्म, जुने - अनादी /अक्षय, ठेवणे - ठेवा/द्रव्य/स्वस्वरूप )

विवेचन 

या श्लोकात समर्थ आपल्याला संतांनी मानवजातीवर जे अगणित उपकार करून ठेवले आहेत, त्याबद्दल सांगतात. आपण संतांना आई किंवा माउली म्हणतो कारण त्यांना लोकांचा अपार कळवला असतो. म्हणून पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात.' जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले.' आपल्यासारख्या अज्ञानी माणसांचे कल्याण व्हावे म्हणून संतांनी शेकडो वर्षांपासून आपल्याला आपल्या हिताचा मार्ग सांगितला आहे. तो ही अत्यंत स्पष्ट शब्दात. या ओळीतील ' श्रेष्ठ ' हा शब्द दोन अर्थांनी घेता येतो. श्रेष्ठ म्हणजे आपल्या हिताची गोष्ट आणि दुसरा अर्थ म्हणजे थोर साधुसंत. याचाच सोपा अर्थ असा घेता येईल की संतांनी आपल्या हिताचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. तो सुद्धा काही आडपडदा न ठेवता, स्पष्टपणे. व्यवहारात आपण पाहतो की साधारणपणे ज्यांना काही ज्ञान अवगत झालेले असते,  अशा व्यक्ती आपले ज्ञान पूर्णपणे उघड करीत नाहीत. काहीतरी हातचे राखून ठेवतात. आपली पुन्हा गरज भासावी या दृष्टीने काही गोष्टी आपल्या हातात ठेवतात. 

परंतु संतांना कोणाकडून काही प्राप्त करायचे नसते. ते आसक्तिरहित असतात. जीवांचे कल्याण व्हावे हाच त्यांचा हेतू असतो. ' जे जे आपणांसी ठावे, ते ते लोकां सांगावे, शहाणे करुनि सोडावे सकळ जन.' अशी त्यांची वृत्ती असते. सामान्यांना गीतेचा उपदेश कळावा, देहाचे मर्त्यपण आणि आत्म्याचे अविनाशीपण लक्षात यावे म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी भगवद् गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. संत एकनाथांनी भागवत मराठीत सांगितले. मूळ वाल्मीकी रामायणाची लोकांना कळावे म्हणून अनेक भाषांत भाषांतरे झाली. संत तुकारामांनी ' गाथा ' सांगितली, समर्थांनी मनोबोध, आत्माराम, दासबोध यासारखे ग्रंथ लिहिले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद आदी संतांनी धर्म म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजावून सांगितले. 

परंतु संतांच्या एवढ्या श्रेष्ठ उपदेशानंतरही आपल्यात फारसा बदल झालेला नाही. म्हणून समर्थ ' जीव अज्ञान तैसेचि ठेले ' असे म्हणतात. त्यांनी सांगितलेले आम्ही समजून घ्यायला तयारच नाही. खरं तर या आपल्या भारत देशात परमेश्वराचे अनेक अवतार होऊन गेले. अनेक थोर साधुसंत होऊन गेले. त्यांची अमृतवाणी शतकानुशतके लोकांना मार्गदर्शन करीत आली. म्हणून आपण भारताला धर्मभूमी किंवा देवभूमी म्हणूनही संबोधतो. पण साधुसंतांच्या उपदेशाचा असा कितीसा परिणाम आमच्यावर झाला ? पालथ्या घड्यावर पाणी अशीच आमची अवस्था आहे. दिवसेंदिवस खून, दरोडे, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार या गोष्टी वाढतच आहेत. 

देहाला सुखावणाऱ्या गोष्टी करण्याकडे आमचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. हा देह म्हणजे मी असेच आपण देहबुद्धीमुळे समजतो आहोत. त्यामुळे त्याचे चोचले पुरवण्यासाठी नाना प्रकारच्या इच्छा, वासना मनात निर्माण होतात. त्या पूर्ण केल्या म्हणजे सुख मिळेल अशी आपली समजूत असते. पण या इच्छा आणि वासनांना अंत नसतो. त्या वाढतच जातात. या सगळ्या गोंधळात जो शाश्वत सुखाचा ठेवा आमच्याजवळ आहे, त्याचे आकलनच आम्हाला होत नाही. आत्मरूपाने परमेश्वराचा अंश आपल्या अंतर्यामी आहे. परंतु देहबुद्धीमुळे आपल्याला आत डोकावून पाहण्याची इच्छाच कधी होत नाही. 

आत्म्यालाच समर्थांनी या ठिकाणी ' जुने ठेवणे ' असे म्हटले आहे. ही अक्षय संपत्ती आहे. हा चिरंतन ठेवा आत्म्याच्या रूपाने या देहात विराजमान आहे. परंतु आम्ही सुख बाहेरच शोधत असतो. कस्तुरी मृगाला जशी कस्तुरी त्याच्या नाभीतच आहे हे कळत नाही,  तशीच आमची अवस्था झाली आहे. कस्तुरीच्या शोधार्थ तो मृग रानोमाळ भटकत असतो. तसेच आम्हीही इतरत्र सुखाचा शोध घेतो. ' तुझे आहे तुजपाशी ' ही जाणीव आम्हाला संतांनी करून दिली तरी आमच्या ते लक्षात येत नाही किंवा आम्ही ते लक्षात घ्यायला तयार नसतो. आमच्या इच्छा किंवा वासना आम्हाला मग वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. हेच आपले रानोमाळ भटकणे आहे. ते नको असेल तर संतांचा सहवास करून भक्तिमार्गाची कास धरणे आवश्यक आहे हेच समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. 

स्वसंवाद 

१. संतांनी अतिशय सोप्या आणि स्पष्ट शब्दांत आत्मकल्याणाचा मार्ग दाखवला असताना, मी मात्र स्वतःच्या अज्ञानात आणि देहबुद्धीतच अडकून राहिलो आहे का?

२. कस्तुरीमृगाप्रमाणे खरा आनंद आणि सुख माझ्या अंतर्यामी (आत्मारूपाने) असताना, मी ते बाह्य जगातील नश्वर गोष्टींमध्ये शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहे का?

३. 'मी म्हणजे केवळ हा देह' या भावनेपोटी मी केवळ देहाचे चोचले पुरवण्यात आणि वासना वाढवण्यातच आयुष्य घालवत आहे का?

४. संतांचे ग्रंथ आणि विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता, 'तुझे आहे तुजपाशी' या सत्याची अनुभूती घेण्याचा मी रोज थोडा तरी प्रयत्न करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२३/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...