उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२४
तये द्रुपदी कारणे लागवेगे ।
त्वरें धांवतु सर्व सांडूनि मागे ।
कळीलागि जाला जसे बोध्य मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२४।।
अर्थ : त्या द्रौपदीने भगवंताचा धावा केल्यावर तो अत्यंत तत्परतेने हातातील सर्व काम सोडून तिच्या रक्षणासाठी धावून गेला. या कलियुगात मात्र ज्ञानी भगवंताने काही काळासाठी मौन धारण केले आहे. असे असले तरी आपल्या भक्तांचा अभिमानी असलेला भगवंत त्यांची कधी उपेक्षा करीत नाही.
( लागवेगे - तत्परतेने, त्वरे - ताबडतोब, कली - कलियुग, बोध्य - ज्ञानी, मौनी -मौनव्रत धारण केलेला )
विवेचन
या श्लोकात महाभारतातील द्रौपदी वस्रहरणाचा संदर्भ आला आहे. द्रौपदी ही श्रीकृष्णाची परमभक्त होती. कौरव पांडव द्यूत खेळत असताना युधिष्ठिराने शेवटी द्रौपदीला देखील पणाला लावले. पण द्युतात तो हरला. त्यावेळी दुःशासनाने रज:स्वला अवस्थेत असणाऱ्या द्रौपदीला फरफटत दरबारात आणले. उन्मत्त दुर्योधनाने तिला विवस्त्र कर म्हणून दुःशासनाला सांगितले. या अत्यंत करुण आणि निर्वाणीच्या प्रसंगी द्रौपदी असहाय होती. तिने सुरुवातीला मदतीसाठी भीष्म, द्रोण, कृपाचार्य, धृतराष्ट्र यांच्याकडे मदतीची याचना केली. परंतु त्यांच्यापैकी कोणीही तिच्या मदतीसाठी धावून आले नाही. नंतर तिने आपले पती असलेल्या पराक्रमी पांडवांकडे मदतीसाठी पाहिले. परंतु ते देखील हतबल होऊन बसले होते. शेवटी तिने अनन्यभावाने श्रीकृष्णाचा धावा केला. आपली सखी आणि भक्त असलेल्या द्रौपदीला भगवंताने वस्त्र पुरवून तिची लाज राखली.
पुढे एकदा द्रौपदीने श्रीकृष्णाला विचारले की दुःशासनाने माझ्या पदराला हात घातला त्याचवेळी तू मदतीसाठी का नाही आलास ? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, " द्रौपदी, तू सुरुवातीला भीष्म, द्रोण, कृपाचार्य, धृतराष्ट्र यांच्याकडे मदतीची याचना केलीस. नंतर मदतीसाठी आपल्या पतींकडे अपेक्षेने पाहिलेस. परंतु जेव्हा तू माझा धावा केलास, त्याचक्षणी मी तुझ्या मदतीसाठी धावून आलो.
समर्थ या श्लोकातील तिसऱ्या ओळीत म्हणतात की ज्ञानी असलेल्या भगवंताने या कलियुगात मौन धारण केले आहे. काही विद्वान या शब्दांचा अर्थ भगवंताने कलियुगात ज्ञानी अशा गौतम बुद्धांचा अवतार धारण केला आहे असाही घेतात. अन्य अवतारांमध्ये भगवंताने कुठले ना कुठले शस्त्र हाती धारण केले आहे. परंतु गौतम बुद्ध म्हणजे ज्ञान, करूण, शांती आणि क्षमा या गुणांचे मूर्तिमंत प्रतीक ! त्यामुळे समर्थांनी या अवताराला ' मौनी ' म्हटले असावे. मौनी या शब्दाचा एक अर्थ ' मुनी ' असाही होतो. या अवतारात एखाद्या मुनीप्रमाणे भगवान शांत आहेत. त्यांनी कोणतेही शस्त्र हाती घेतले नाही या अर्थानेही मौनी हा शब्द वापरला असावा. या कलियुगात भक्तीची उत्कटता कमी झाली, लोकांमधील दांभिकपणा वाढला या कारणाने देखील भगवंताने मौन धारण केले असावे.
परंतु असे असले तरी, आपले भक्त जेव्हा कळवळून हाक मारतात, तेव्हा भक्तांचा कैवारी असलेला हा भगवंत धावून जातो. त्यांची संकटातून सुटका करतो. कलियुगात नामस्मरण हे भगवंताला प्रसन्न करून घेण्याचे सोपे साधन मानले जाते. अन्य व्रते, तप इ. करण्याची आवश्यकता राहत नाही.
स्वसंवाद
१. द्रौपदीच्या कथेप्रमाणे, माझ्यावर जेव्हा संकट येते, तेव्हा मी सुरुवातीला ऐहिक जगाकडे आणि माणसांकडे आशेने पाहतो, की पहिल्याच क्षणी पूर्ण विश्वासाने भगवंताला शरण जातो?
२. "जोपर्यंत आपण स्वतःचे कर्तृत्व किंवा इतरांवर मदतीसाठी अवलंबून राहतो, तोपर्यंत ईश्वर दूर राहतो" या सत्याची जाणीव ठेवून, मी प्रार्थना करताना मनातील सर्व अहंकार बाजूला ठेवतो का?
३. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे, कलियुगात भगवंताने 'मौन' धारण केले असले, तरी माझ्या हाकेमध्ये द्रौपदीसारखी उत्कटता आणि 'आर्तता' असेल तर तो मौन सोडून धावून येईल, अशी खात्री मला वाटते का?
४. कलियुगात परमेश्वर प्राप्तीसाठी अवघड तपाची गरज नसून केवळ 'नामस्मरण' हेच सोपे साधन आहे, हे स्वीकारून मी रोजच्या धकाधकीत भगवंताचे नाम घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा