मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १३६

 उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३६

भये व्यापिले सर्व ब्रह्माण्ड आहे ।

भयातीत ते संत आनंत पाहे ।

जया पाहता द्वैत काही दिसेना ।

भय मानसीं सर्वथा ही असेना ।।१३६।।

अर्थ : या सर्व ब्रह्माण्डात भय व्यापून राहिले आहे. परंतु भीतीपासून मुक्त असे संत त्या अनंताला पाहू शकतात. संतांच्या दृष्टीसाठी द्वैत असे काही राहताच नाही. त्यामुळे त्यांच्या मनात भय असे काही राहताच नाही. 

(अनंत - अमर्याद/परमेश्वर, सर्वथा - अजिबात )

विवेचन 

या श्लोकात समर्थ आपल्याला भीतीपासून मुक्त होण्याचा मार्ग सांगत आहेत. पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात,' भये व्यापिलें सर्व ब्रह्माण्ड आहे. हे विश्व ही परमेश्वराचीच निर्मिती असली तरी त्यात सगळीकडे भयाची भावना व्यापून राहिलेली दिसते. या जगातील सर्व जीवमात्रांमध्ये भीतीची भावना भरून राहिलेली असते. गरिबाला उद्या काय होईल याची भीती, श्रीमंताला संपत्ती चोरीस जाण्याची भीती, चोराला पकडले जाण्याची भीती, माणसाला तर वेगवेगळ्या प्रकारची भीती भरून राहिलेली असते. परिस्थिती, मुलेबाळे, आजार, वृद्धापकाळ, मृत्यू आदी विविध प्रकारचे भय माणसाच्या मनात असते. किंबहुना भय हा सर्व सजीवांचा स्थायीभाव आहे. कारण ' आहार, निद्रा, मैथुन आणि भय ' या सर्व प्राणिमात्रांच्या मूलभूत भावना असतात. मनुष्य मात्र आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यामुळे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. त्याने आपल्या बुद्धीच्या साहाय्याने स्वतःभोवती विविध प्रकारची सुरक्षा निर्माण केली आहे. परंतु तरी देखील भीतीपासून तो संपूर्णपणे मुक्त होऊ शकलेला नाही. ' भय इथले संपत नाही ' असेच म्हणावे लागते. 

पण जे खरे संत असतात ते या सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त असतात. कारण या विश्वामध्ये व्यापून राहिलेल्या भगवंताचा साक्षात्कार त्यांना सर्वत्र घडतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत त्यांना ईश्वरी तत्वाचा अनुभव येत असतो. त्यांच्यासाठी हे जग आणि परमेश्वर वेगळे नाहीतच. त्यांच्यामध्ये द्वैतभाव नसतो हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे त्यांना सर्वत्र ईश्वराचे दर्शन होते. आपल्यासारख्यांच्या दृष्टीने सगळीकडे ब्रह्माण्ड भयाने भरून राहिलेले दिसते. त्यांना मात्र चराचरात ईश्वराचे दर्शन होते. 

आपण सामान्य माणसे. आपल्यामध्ये देहबुद्धी प्रबळ असते. त्यामुळे भोवतालचे नाशिवंत विश्व आपण खरे म्हणूनच आयुष्यभर वागत असतो. माणसे, प्राणी, पशु पक्षी, वनस्पती आदींना आपण निसर्गाचे एक घटक म्हणून पाहत असतो. परंतु संत या सर्वांमागे एकच ईश्वरी तत्व आहे हे लक्षात घेतात. आपण मात्र या सर्वांमध्ये व्यापून राहिलेल्या ईश्वरी तत्त्वापासून आपण दूर असतो. म्हणजेच जिथे द्वैत आले, तिथे भय आले. जेव्हा आपल्या हे लक्षात येईल की मी आणि दिसणारे हे जग या सगळ्यांच्या पाठीमागे एक अक्षय, अविनाशी तत्व भरून राहिले आहे, त्या क्षणी आपली भीती नष्ट होईल. एखाद्या सराफाच्या दुकानात आपण गेलो की सोन्याचे वेगवेगळे अलंकार पाहतो. अलंकार वेगवेगळे असले तरी त्यातील सोने एकच असते. बादली, माठ, घागर ही पाण्याने भरलेली भांडी भलेही आकाराने वेगवेगळी दिसतील पण त्यातील पाणी किंवा जलतत्त्व एकच असते. आपल्या भोवती असणारी पंचमहाभूते म्हणजे जल, अग्नी, वायू इ. आपल्या शरीरातही भरून राहिलेले असतात. परमेश्वराशी आपण एकरूप झालो की मनातील द्वैतभावना नष्ट होऊ लागते. द्वैतभावना नष्ट झाली की भीतीचे कारण समूळच नाहीसे होते. संत भयमुक्त असतात कारण त्यांची द्वैतभावना नष्ट झालेली असते.' मंदिरात अंतरात तोच नांदताहे, नाना देही नाना रुपी तुझा देव आहे ' अशी अनुभूती होऊ लागते. ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरूनिया ' अशी भावना निर्माण होते. 

संत भयमुक्त असतात याचे आणखीही एक कारण असते. ते परमेश्वराशी एकरूप झाल्याने काही मिळवण्याची किंवा काही गमावण्याची भीतीच त्यांना राहत नाही. ' हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला ' अशी त्यांची वृत्ती असते. अंगी वैराग्य बाणल्यामुळे आसक्ती संपून जाते. त्यामुळे भयाचा देखील नाश होतो.

 अलेक्झांडरने जग जिंकले होते. जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याला नदीकाठी एक साधू आपल्या ध्यानात आणि निजानंदात मग्न असलेला दिसला. अलेक्झांडरने आपल्या सैनिकांमार्फत त्याला बोलावणे धाडले. परंतु त्याला काही नकोच होते. त्यामुळे तो सैनिकांबरोबर गेला नाही. सैनिक आपल्याला मारतील किंवा राजा आपल्याला शिक्षा करील ही भीती त्याच्या मनात नव्हतीच. त्याची कीर्ती कानावर पडल्याने अखेर स्वतः अलेक्झांडर त्याला भेटायला गेला. तेव्हाही तो विचलित झाला नाही. अलेक्झांडरने त्याला विचारले," तुला भीती वाटत नाही का ?" साधूने नकारार्थी मान हलवली. अलेक्झांडरने त्याला विचारले, " तुम्हाला काही हवे आहे का ? तुम्ही मागाल ते मी देऊ शकतो. " यावर सकाळच्या प्रहरी कोवळ्या उन्हाचा आनंद घेणाऱ्या त्या साधूने सांगितले की माझ्यासाठी एवढंच कर की मी सकाळच्या प्रहरी भगवंताचे नामस्मरण करतो. तुझ्यामुळे माझ्या अंगावर येणारे ऊन अडवले जाते आहे. त्यामुळे जरा बाजूला हो. मला अन्य काही नको. एवढी विरक्त वृत्ती संतांची असते. 

म्हणूनच भीतीपासून मुक्त व्हायचे असेल तर संतांचा सहवास अवश्य करावा. त्यामुळे मनातील द्वैतभावना नष्ट होऊन सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व असलेले जाणवते. ऐहिक सुखांची ओढ हळूहळू कमी होत जाते. अंगी वैराग्य बाणायला सुरुवात होते. ' मी तू पणाची झाली बोळवण ' अशी अवस्था होते. देह आणि आत्मा हे वेगळे आहेत हे त्याच्या लक्षात येते. हा देह विनाशी आहे पण देहातील आत्मा मात्र अविनाशी, चिरंतन आहे याची जाणीव होते. परमेश्वराच्या भक्तीतच चिरंतन सुख आहे ही भावना दृढ होत जाते. मनुष्य सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होतो. 

स्वसंवाद 

१. माझे मन भविष्य, परिस्थिती, आजार किंवा नश्वर गोष्टींच्या विचारांनी नेहमी कोणत्या ना कोणत्या 'भयाने' व्यापलेले असते का?

२. मी जगातील माणसांकडे आणि घटकांकडे केवळ बाहेरून (द्वैताने) पाहतो, की सर्वांच्या मागे एकच 'ईश्वरी तत्त्व' भरून राहिले आहे असा व्यापक दृष्टिकोन ठेवतो?

३. अलेक्झांडरला उत्तर देणाऱ्या त्या विरक्त साधूप्रमाणे, माझ्या गरजा मर्यादित ठेवून 'अलिप्त आणि समाधानी' राहण्याची वृत्ती मी जोपासू शकतो का?

४. 'हा देह नश्वर आहे पण त्यातील आत्मा अविनाशी आहे' हे ओळखून मी ऐहिक आसक्ती सोडून ईश्वराच्या नित्य स्मरणात राहण्याचा प्रयत्न करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२२/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...