मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १३३

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३३ 

हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी ।

जेणें मानसी स्थापिले निश्चयासी ।

तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।

तया भाषणे नष्ट संदेह मोडे ।।१३३।।

अर्थ : परमेश्वरावर दृढ भक्ती असणारा, वृत्तीने विरक्त असलेला, ज्याच्याजवळ (अध्यात्म )ज्ञानाचा विपुल साठा आहे आणि ज्याने निश्चयपूर्वक स्वस्वरूपावर आपली दृष्टी स्थिर केली आहे, अशा सत्पुरुषाचे दर्शन घेतले असता किंवा त्याचा स्पर्श लाभला तरी आपले पुण्य वाढते. त्याच्या बोलण्याने ( उपदेशाने ) आपल्या मनातील वाईट शंका किंवा संशयाचे निवारण होते. 

( विरक्त -ऐहिक सुखांची आसक्ती नसलेला, विज्ञानरासी - ज्ञानाचे भांडार असणारा, नष्ट - नुकसानकारक/वाईट, संदेह - संशय/शंका, मोडे - नष्ट होतो )

विवेचन 

खरा संत किंवा सत्पुरुष कसा असतो त्याची लक्षणे समर्थांनी या श्लोकात सांगितली आहेत. आजच्या काळात भोंदू बुवा, बाबांचा बाजार भरलेला आपल्याला दिसतो. अशा वेळी खरा साधू पुरुष कोण हे आपल्याला या श्लोकावरून सहज लक्षात येऊ शकते. संत किंवा साधू म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. दाढी आणि जटा वाढलेला, भगवे कपडे घातलेला, कपाळावर टिळा किंवा भस्माचे पट्टे ओढलेला, गळ्यामध्ये, हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण ही सगळी बाह्य लक्षणे झाली. खरा सत्पुरुष या लक्षणांशिवाय देखील आढळू शकतो. 

मग सत्पुरुष होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे ? तर सगळयात आधी त्याचे पहिले लक्षण म्हणजे ती व्यक्ती हरिभक्त असावी. भक्तीचा बाह्य देखावा करणे आणि अंतर्बाह्य परमेश्वराचेच होऊन राहणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जो हरिभक्त असतो, त्याचे भगवंतावर उत्कट प्रेम असते. लोकांसाठी तो त्याचे प्रदर्शन मांडत नाही. अशा सत्पुरुषाचे दुसरे लक्षण म्हणजे तो विरक्त असतो. तो चारचौघांसारखा संसारात दिसेल पण त्यात असूनही त्यापासून तो अलिप्त असतो. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात असते, पण पाण्यापासून, चिखलापासून ते अलिप्त असते. अशीच या संतांची वृत्ती असते. एखादी गोष्ट मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्यांना त्यामुळे फरक पडत नाही. ते सदैव आनंदी असतात. कारण ' ठेविले अनंते तैसे राहावे ' अशी त्यांची वृत्ती असते. 

अशा सत्पुरुषाचे तिसरे लक्षण म्हणजे त्याच्याजवळ अनुभूतीतून आलेल्या ज्ञानाचा अपार साठा असतो. अर्थात हे ज्ञान म्हणजे प्रामुख्याने अध्यात्मिक ज्ञान. कारण ज्ञान या शब्दाचा जो व्यावहारिक अर्थ आपण इथे घेतो, तो इथे लागू होत नाही. अशी व्यक्ती कदाचित उच्च शिक्षित असेल किंवा नसेलही. परंतु भगवंताबद्दलचे, त्याच्या अस्तित्वाबद्दलचे ज्ञान त्याच्याकडे आत्मानुभूतीतून आलेले असते. भगवंताबद्दलचे आपले ज्ञान आणि अशा सत्पुरुषांचे ज्ञान यात एक मूलभूत असा फरक असतो. त्यांना असणारे ज्ञान आपल्यालाही असू शकते. पण आपले ज्ञान कोरडे असते. त्याला अनुभवाची आणि भक्तीची जोड नसते. आपले लक्ष बाह्य गोष्टींकडे जास्त असते पण अशा साधुपुरुषांचे लक्ष अंतर्यामी वळलेले असते. त्यांची भक्ती ही निश्चयपूर्वक दृढ झालेली असते. त्यांचे ज्ञान आत्मसाक्षात्कारातून आलेले असते. कोणी काही विपरीत सांगितले तरी ते विचलित होत नाहीत. आपल्या मार्गावरून ढळत नाहीत. ' निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ.' म्हणून त्यांच्या ज्ञानाला महत्त्व आहे. त्यांच्या सहवासाला महत्त्व आहे. 

अशा व्यक्तींचा केवळ सहवास लाभला तरी त्यांच्या वागण्याबोलण्यातून ही गोष्ट लक्षात येऊ शकते. परंतु आजकाल अशी व्यक्ती भेटणे कठीण. भेटली तर तिच्यावर विश्वास बसणे कठीण. त्यांचा सहवास लाभणे ही तर त्याहून पुढची गोष्ट. परंतु सुदैवाने अशी व्यक्ती भेटली तरी केवळ तिच्या दर्शनाने आपले मन प्रसन्न होते. कारण तिच्याभोवती भगवंताच्या कृपेचे आणि तपश्चर्येचे जे वलय असते, त्या लहरींचा सकारात्मक परिणाम आपल्यावरही होतो. त्यांच्या केवळ काही वाक्यांनी किंवा उपदेशाच्या चार शब्दांनी आपल्या मनातील सर्व बऱ्यावाईट शंका दूर होतात. त्यांचा स्पर्श देखील अत्यंत लाभदायक असतो. अशा व्यक्तीने आपल्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला किंवा त्यांच्या स्पर्शाचा लाभ कोणत्याही प्रकारे झाला तरी तो पुण्यप्रद असतो. त्यांच्या तप:सामर्थ्याचा काही अंश त्यातून आपल्याकडे प्रवाहित होतो. म्हणूनच साधू संतांच्या किंवा ज्येष्ठ व्यक्तींच्या पायावर डोके ठेवून आपण त्यांचे आशीर्वाद घेतो. अशा सत्पुरुषांना भेटण्याची संधी मिळत असेल तर कोणत्याही कारणाने ती दवडू नये. 

स्वसंवाद 

१. मी संतांची किंवा मार्गदर्शकांची निवड करताना केवळ त्यांच्या बाह्य वेशावर भुलतो, की त्यांच्या आचारातील विरक्ती आणि विचारांतील अध्यात्मिक ज्ञान पाहतो? 

२. माझ्याजवळ असलेले ज्ञान केवळ 'कोरडे' (पुस्तकी) आहे, की मी ते ज्ञानेश्वरी किंवा दासबोधातील विचारांचा प्रत्यक्ष 'अनुभव' घेऊन माझ्या आचरणात आणले आहे? 

३. 'कमळाप्रमाणे' संसारात राहूनही त्यातील ऐहिक मोहापासून अलिप्त राहण्याची आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' अशी समाधानी वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न मी करतो का? 

४. संतांच्या वाचनातून किंवा सहवासातून मिळणाऱ्या विचारांनी माझ्या मनातील नको त्या शंका-कुशंका (संदेह) दूर होऊन माझा देवावरील आणि चांगुलपणावरील विश्वास दृढ होतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२०/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...