उगवतीचे रंग
विठ्ठल सोयरा...
' सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख ' असलेला ' बाप रखुमादेवीवरू ' पंढरपुरी उभा आहे. थोडाथोडका नाही. तर ' युगे अठ्ठावीस.' भक्तांच्या दर्शनासाठी हे सावळे परब्रह्म विटेवर उभे ठाकले आहे. पण सकल संत सज्जनांचा हा सोयरा तिथे कसा आला याची एक सुंदर कथा सांगितली जाते. जशी भगीरथाने भगीरथ प्रयत्न करून पृथ्वीवर गंगा आणली तसंच पांडुरंग अवताराचं श्रेय आपल्याला भक्त पुंडलिकाला द्यावं लागेल. पुंडलिक आपल्या मातापित्यांची सेवा करत होता आणि ते पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याच्या भेटीला आले. पुंडलिकाने मग त्यांना उभे राहण्यासाठी एक वीट पुढे केली. ही कथा आपल्या सगळ्यांना बहुतेक माहिती आहे. परंतु त्यापेक्षा एक अगदी वेगळी कथा सांगितली जाते. पुंडलिक हा भगवान शंकरांचा परम भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. तो महादेवाला म्हणाला," देवा, तुम्ही ज्या दैवताची उपासना करता ते मला कुठे आणि कसे मिळेल ?" भगवान शंकर म्हणाले," मी तुला एक लोहदंड देतो. हा लोहदंड ज्या ठिकाणी पाण्यात तरेल, तिथे तुझे दैवत तुला भेटेल." हा लोहदंड चंद्रभागेमध्ये तरला. आता आपल्याला आपले इच्छित दैवत इथेच मिळेल म्हणून पुंडलिकाने आर्ततेने भगवंताचा धावा सुरु केला.
साक्षात नारायण सगुण रूपात प्रकट झाले. " पुंडलिका, तुला काय हवं आहे ते सांग ?" पुंडलिक म्हणाला," देवा, मला माझ्यासाठी काही नको. पण जडजीवांचा उद्धार व्हावा, अनाथांना सनाथ करावे आणि संसारबंधनातून हे जीव उद्धरून जावेत अशी माझी उत्कट इच्छा आहे. तेवढी इच्छा पूर्ण कर." ज्ञानदेवांनी विश्वाच्या कल्याणासाठी जसे पसायदान मागितले, तशीच ही मागणी होती. परमेश्वराने पुंडलिकाची मागणी पूर्ण केली. पुंडलिकाने भक्तीचे बीज पेरले होते. त्याच शेतीची मशागत पुढे संतांनी केली. भीमेकाठी भक्तीचा मळा फुलत राहिला. अमाप पीक येत गेलं. वारकऱ्यांनी, संतांनी यात खंड पडू दिला नाही.
तेव्हापासून हे सावळे परब्रह्म विटेवर उभे आहे. तुकाराम महाराज म्हणतात
स्वयंभू हा माझा विटेवरी उभा। चैतन्याचा गाभा पांडुरंग ।
नाही घडविला नाही बैसाविला । भेटावया आला पुंडलिका ।
याच अभंगात ते पुढे म्हणतात
द्वारकेची अवघी संपदा घेऊनी । आले चक्रपाणी पंढरीसी ।
तुका म्हणे मुर्त घडली जे म्हणती ।तया मुखाप्रती किडे पडो।।
असा प्रत्यक्ष येऊन साक्षात वैकुंठीचा राणा इथे उभा आहे. सावळ्या रंगातील मूर्तिमंत सौंदर्य इथे उभे आहे. साधारणपणे काळा रंग कोणाला फारसा आवडत नाही. पण याचे सौंदर्यच आगळे. त्याच्या सावळेपणातच त्याचे सौंदर्य. ज्ञानेश्वर माउली म्हणतात
अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा.
पण असं असलं तरी त्याचा साधेपणा तरी किती ! त्याला रत्नजडित वा सुवर्णाचं सिंहासन नकोच आहे. तो आपला साधा विटेवर उभा. ही वीट आपल्याला खूप काही सांगून जाते. साध्या मातीची भाजलेली वीट. मातीपासून बनलेली. पंचमहाभुतांचं प्रतीक. आपल्याला जणू सांगते," या मातीशीच तुझं नातं जडलेलं असू दे. मातीतून आला आहेस. शेवटचा मुक्काम तिथेच आहे. जीवनाचं क्षणभंगुरत्व लक्षात घे. " ही माती वीट करताना भाजली जाते. म्हणजे जणू काम, क्रोध, लोभ या सारख्या षड्विकारांना नाहीसं करते. तेच आपणही करायचं. ही देहाची वीट भाजली गेली पाहिजे. ती कच्ची राहता कामा नये.
शेकडो वर्षांपासून सुरु असलेली ही वारीची परंपरा. वारीची सुरुवातच मुळी आपण माया, मोह, संसारसुख निदान काही काळापुरतं का होईना पण बाजूला ठेवून करतो. सगळं काही मागे सोडून वारकरी बाहेर पडतो. त्याला गाडी लागत नाही, रिझर्वेशन नाही. कोणतेही पैसे भरावे लागत नाही. विठुरायाच्या ओढीनं तो खुशीनं ऊन, वारा, पाऊस सगळं सोसण्याच्या तयारीनं बाहेर पडतो. अंगावर साधे कपडे, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध आणि विठ्ठलाचा छंद. वारीत मला उत्तम जेवण मिळेल का, राहायला उत्तम जागा मिळेल का अशा कोणत्याच गोष्टींचा विचार तो करत नाही. वारीत अहंकार गळून पडतो. ' मी ' मागे पडून आपण सारे असा हा प्रवास असतो. सगळेच एकमेकांच्या पाया पडतात. सगळेच ' माउलीरूप ' होतात. स्त्री-पुरुष भेद देखील गळून पडतो. ' कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु ' असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाषा, प्रांत हे सारे भेद गळून पडतात. वारी एकतेचं प्रतीक आहे. ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' ते इथे पाहायला मिळते. एखाद्या मोठ्या नदीला ज्याप्रमाणे लहान मोठे ओहोळ, नद्या येऊन मिळतात, तसे सगळे वारीत एकत्र येत जातात. त्यांचा एक मोठा प्रवाह होतो. पंढरपूरच्या सागरात विलीन होण्यासाठी या सगळ्या नद्या त्या दिशेने वाटचाल करतात.
विठ्ठल हे दैवत म्हणजे संतांचे माहेर ! माहेर म्हणजे मुक्त वागण्याचं स्वातंत्र्य देणारं हक्काचं ठिकाण. इथे नवस, उपासतापास नाहीत. कठोर नियम नाहीत. उपास केला काय आणि नाही केला काय तो रागावत नाही. ' माउलीच ' ती. आई कधी आपल्या मुलांवर रागावते का ? लांबून आलेल्या भक्तानं तिच्या पायावर डोकं ठेवलं की झालं. त्याचे सगळे श्रम ती हरण करते. त्याची दुःखं तिच्या पायी विसर्जित होतात. काही वारकरी तिच्या पर्यंत पोचतात. काही नाही पोहोचू शकत. लांबूनच दर्शन घेऊन धन्य होतात. माउली रागावत नाही. इथपर्यंत येऊन माझ्या पायावर आपला माथा का टेकवला नाहीस असं म्हणत नाही. तिच्या आशीर्वादाचे किरण सगळ्यांपर्यंत पोचतात.
संतांनी तर या माउलीवर किती प्रेम केलं ! ते विठ्ठलमयच होऊन गेले. संत सावता माळी यांना तो आपल्या पिकात दिसला. गोरोबांना मडकी घडवताना, जनाईला दळण दळताना तो समोर होता. त्याला प्रेमाने आणि हक्काने कोणी रागावून अपशब्द वापरले. कोणी त्याला पंढरीचा चोर म्हटले, तर कोणी पंढरीचे भूत ! कोणी त्याची लाज काढली. तर कोणी ' विठ्ठला न्याय तुझा कुठला?' असे म्हणून त्याच्या न्याय पद्धतीवर बोट ठेवले. तर जनाबाईंनी ' अरे विठ्या, अरे विठ्या , माझ्या मायेच्या कारट्या, अरे काळतोंड्या..' असे म्हटले. संत तुकारामांची पत्नी आवली आहे देखील विठ्ठलाला शिव्याची लाखोली वाहिली. पण या सगळ्यांच्या बोलण्यातील हा अधिकार त्यांच्या विठ्ठलावरील भक्तीतून आणि प्रेमातून आला. त्यांच्या रागातही प्रेम होतं, भक्ती होती.
साधारण आठशे -नऊशे वर्षांपासून ही वारीची परंपरा अखंड सुरु आहे. कोणाला बोलवावे लागत नाही, आमंत्रण पत्रिका छापाव्या लागत नाहीत. सगळे स्वयंस्फूर्तीने सामील होतात. शिस्त पाळतात. ज्ञानोबा माउलींच्या आधीपासून वारी सुरु होती असे म्हटले जाते. संत तुकारामांनी तर आपल्या वारीत आयुष्यभर खंड पडू दिला नाही. एकदाच ते आजारी असल्याने वारीला जाऊ शकले नव्हते. पण विठ्ठल त्यांच्या ध्यानी मनी होताच. वारीतील पालखी सोहळ्याची सुरुवात तुकोबारायांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी केली असे सांगितले जाते. वारीतील ' ज्ञानबा तुकाराम ' हा गजर तेव्हापासूनच सुरु झाला. वारीमध्ये शिस्त आणण्याचे काम गुरु हैबतबाबा यांनी केले. ती शिस्त आजही कायम आहे. इथे शिस्तीसाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नसते. ती स्वयंस्फूर्तीने पाळली जाते. वारी म्हणजे खरोखरच एक जिताजागता चमत्कार आहे. वारीतील नेत्रदीपक रिंगण सोहळा, दिंडी प्रमुखांचे चोख नियोजन, वारीतील अभंग, भारुडे, गौळणी या सगळ्या गोष्टींमुळे वारी म्हणजे प्रबोधनाचे एक उत्तम माध्यम ठरले आहे.
अनेक बुद्धिवादी, निरीश्वरवादी वारीच्या कुतूहलापोटी त्यात सामील झाले. पण वारीची जादू अशी की ते सुद्धा विठ्ठलनामाच्या गजरात रंगून गेले. इरावतीबाई कर्वे या महान विदुषी आणि थोर साहित्यिक. सगळीकडे फिरल्या. सगळ्या गोष्टींची चिकित्सा केली. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहणाऱ्या. पण वारीच्या कुतूहलापोटी वारीत सामील झाल्या. खरंच जादू घडली. सावळ्या विठ्ठलाची जी मोहिनी त्यांच्यावर पडली ती कायमचीच ! इरावतीबाई देहभान हरपून वारकऱ्यांसोबत नाचायला लागल्या. आज अगदी आय टी क्षेत्रातील बुद्धिमान तरुण मुलं मुली या वारीत सामील होतात. परदेशी पाहुणे देखील यात हजेरी लावतात.
वारीकडे निकोप दृष्टीने पाहिले तर वारी एकतेचा संदेश देणारी आहे. ' मानव तितुका एक आहे ' हे सांगणारी आहे. सारी ईश्वराची लेकरे आहेत हे सांगणारी आहे. विठ्ठल हे श्रीमंत दैवत नाही. त्याला सोन्याचा मुकुट वगैरे गोष्टी नको असतात. हवी असते ती निर्मळ भक्ती, शुद्ध अंतःकरण. मानवी जीवनाला श्रीमंत करणारी जी चिरंतन मूल्ये आहेत, तीच वारी आणि विठ्ठल आपल्याला देतो. सदाचार, पावित्र्य, नीतिमत्ता, करुणा, अनासक्ती या मूल्यांची शिकवण देणारं जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ म्हणजे वारी. आज या मूल्यांचीच जगाला गरज आहे. विठ्ठल सोयरा असा विलक्षण आहे. सगळ्यांशी आपुलकीचं नातं जोडणारा. ' बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव ' असं संत तुकाराम महाराजांबरोबर आपणही म्हणू या. माउली म्हणतात
बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठली आवडी ।
आपले भाग्य थोर म्हणून विठ्ठलाची आवड आपल्याला लागली आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१८/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा