उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२९
गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ।
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनि मनातीत होऊनि राहे ।।१२९।।
अर्थ : अंतकाळी उत्तम गती हवी असेल तर सज्जनांचा सहवास करावा. सज्जनांच्या सहवासात दुर्जनांच्या बुद्धीत बदल घडून ती सद्बुद्धी होते. कामवासनेचा अतिरेक माणसाची हानी करतो म्हणून माणसाने मनातीत म्हणजे मनाच्या पलीकडे राहावे.
( गतीकारणे - अंतकाळी उत्तम गती मिळण्यासाठी, सुमती - सद्बुद्धी/शुद्ध बुद्धी, रतीनायिका - मदनाची पत्नी, नष्ट - हानिकारक, मनातीत - मनाच्या पलीकडे )
विवेचन
या श्लोकामध्ये सज्जन संगतीचे महत्त्व समर्थांनी स्पष्ट केले आहे. सज्जन संगती म्हणजे संतपुरुषांचा सहवास. संतांचा सहवास म्हणजे जणू परीस आहे. आपल्या बुद्धीला त्याचा स्पर्श झाला की जणू जादू घडते. दुष्ट बुद्धी नष्ट होऊन तिची जागा शुद्ध बुद्धी घेते. अर्थात हे एवढे सहज होत नाही. त्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते. केवळ सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आहे आणि त्यांच्या सहवासात राहतो आहे म्हणूनही बुद्धी शुद्ध होत नाही. त्यासाठी संपूर्ण समर्पण लागते. तरच बुद्धीत पालट घडून येतो. एकदा बुद्धी शुद्ध झाली की विचार शुद्ध होतात. चांगल्या विचारातून चांगले आचार घडतात. स्वयंपाकघरातील एखादे भांडे बाहेरून अगदी स्वच्छ दिसत असले पण आतून अस्वच्छ असेल तर त्यात कोणताही पदार्थ साठवता येत नाही. अस्वच्छ भांड्यात ठेवलेला पदार्थ देखील त्याच्या संगतीने खराब होतो. पाणी जर निर्मळ असेल तरच त्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसू शकते. तसे संतांच्या सहवासात आपली बुद्धी, मन स्वच्छ आणि निर्मळ होते. अशा निर्मळ मनातच परमात्म्याचे प्रतिबिंब दिसू शकते. एवढे संतसहवासाचे महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात, " संतांचा संग तोचि स्वर्गवास." संतांचा सहवास आणि स्वर्ग वेगळा नाही असेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात.
तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात," रतीनायिकेचा पती नष्ट आहे." रती आणि मदन हे कामदेव आहेत. माणसाच्या मनात कामवासना निर्माण करणे हे यांचे काम. मदनाने भगवान शंकरांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडून मदनाला म्हणजेच कामवासनेला भस्म करून टाकले. मदन हा कामवासनेचे प्रतीक आहे. कामवासनेचा अतिरेक माणसाला पशू बनवतो. रावणासारखी ज्ञानी आणि पराक्रमी व्यक्ती कामवासनेच्या अति आहारी जाऊन आपला सर्वनाश कसा ओढवून घेते हे आपल्याला माहिती आहे. दुर्योधन, शकुनी, कर्ण यांच्यासारख्या व्यक्तींना नेहमीच एकमेकांचा म्हणजे दुष्ट बुद्धी असणाऱ्या लोकांचा सहवास लाभला. त्यामुळे सज्जनांची संगत त्यांना नकोच होती. माणूस एकदा दुर्जनांच्या सहवासात राहायला लागला की तो वाईट गोष्टींचे देखील त्या चांगल्या म्हणून समर्थन करू लागतो. त्यातूनच मग दुर्योधन, दुःशासन यांनी द्रौपदीला भर दरबारात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. कर्णासारख्या व्यक्तीनेही मग त्या भरात द्रौपदीबद्दल अपशब्दांचा वापर केला. दुर्जनांच्या सहवासात बुद्धी भ्रष्ट होत जाते ती अशी ! त्यामुळे या सर्वांनी आपला नाश ओढवून घेतला.
मन आणि बुद्धी या गोष्टी आपल्या नोकर असल्या पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपले त्यांच्यावर नियंत्रण हवे. यालाच समर्थ मनातीत होणे असे म्हणतात. पण देहसुखाला चटावलेली आपली बुद्धी त्या गोष्टींना जीवनाचे ध्येयच समजते. त्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी मग मन नाचवेल तशी माणसे नाचतात. मनाचे गुलाम होतात. मनातीत होणे म्हणजे साक्षीभावाने मनाच्या व्यवहारांकडे पाहणे. संतांच्या संगतीत असे करण्याची सवय मनाला हळूहळू लागते.
स्वसंवाद
१. माझ्या जीवनात माझी बुद्धी शुद्ध आणि प्रगल्भ करणारे संत विचार किंवा सज्जनांची संगती आहे का की मी दुर्जनांच्या संगतीत माझा वेळ वाया घालवत आहे?
२. माझे मन संतांच्या शिकवणुकीने एखाद्या 'स्वच्छ भांड्यासारखे' निर्मळ झाले आहे का, जेथे ईश्वराचे (किंवा चांगल्या विचारांचे) प्रतिबिंब दिसू शकेल?
३. रावणासारख्या ज्ञानी माणसाचाही कामवासनेने आणि कर्णासारख्या शूरवीराचा दुर्जनांच्या संगतीने जसा नाश झाला, त्यापासून बोध घेऊन मी माझ्या वासनांवर नियंत्रण ठेवायला शिकलो आहे का?
४. माझे मन आणि माझ्या वासना मला त्यांचे 'गुलाम' बनवत आहेत, की मी साक्षीभावाने त्यांच्याकडे पाहून 'मनातीत' (मनाच्या पलीकडे) होण्याचा प्रयत्न करत आहे?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा