उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२७
जगी धन्य तो रामसूखें निवाला ।
कथा ऐकता सर्व तल्लीन झाला ।
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ।।१२७।।
अर्थ : रामनामातच आपले सुख आहे अशा भावनेने जो समाधान पावतो, तो खरोखरच धन्य आहे. भगवंताची कथा ऐकताना जो तल्लीन होऊन जातो आणि आपले देहभान विसरतो असा भक्त खरोखरच धन्य होय. रामनामाच्या बोधाने ( ज्ञानाने ) त्याला हे कळते की आपण म्हणजे देह नाही आणि मग त्याच्या सर्व वासना रामरूपातच लय पावतात.
विवेचन
संतांच्या चार ओळींच्या सांगण्यात केवढा गहन अर्थ भरलेला असतो, त्याचे प्रत्यंतर या श्लोकातून आपल्याला येते. आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला पापी कोण, चांडाळ कोण ते सांगितले. या श्लोकात ते धन्य कोणाला म्हणावे ते सांगताहेत. व्यावहारिक जगात आपल्या धन्यतेच्या कल्पना वेगळ्या असतात. ज्याच्याजवळ भरपूर पैसा, गाडी, बंगला, नोकरचाकर इ. आहेत, तो आपल्या दृष्टीने जगात धन्य होय. ज्याने भरपूर यश संपादन केले आहे, जो मोठ्या अधिकारपदावर आहे अशा व्यक्तीला देखील आपण जीवनात धन्य समजतो. पण संतांच्या धन्यतेच्या कल्पना वेगळ्या असतात. या श्लोकातील पहिल्याच ओळीत समर्थ म्हणतात ' जगी धन्य तो रामसूखें निवाला. 'रामनामात ज्याला सुख वाटते, त्यातील आनंदाने जो निवाला आहे म्हणजे समाधानी किंवा तृप्त झाला आहे, तो जगात धन्य होय. संतांच्या दृष्टीने अशी व्यक्ती म्हणजे परम भाग्यवान ! मीराबाई म्हणतात, " मैने रामरतन धन पायो." रामनामाचं हे धन ज्याच्या बँकेत जमा आहे अशी व्यक्ती धनवान, धन्य. आधीच्या श्लोकांत समर्थांनी म्हटलेच आहे की ' जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.' एखाद्या मोठ्या संस्थेचा, कारखान्याचा मालक होण्यापेक्षा त्या सर्वोत्तमाचा दास होणे ही अधिक धन्यतेची गोष्ट आहे. तो सर्वोत्तम कोण ? सर्वात उत्तम कोण असू शकेल ? एका रामरायाशिवाय दुसरे कोण ?
ज्याचे मन रामस्वरूपी रंगून गेले आहे त्याला रामकथेची गोडी वाटणारच ! त्यात तो तल्लीन होऊन जातो. स्वतःला विसरतो. आपण सामान्य माणसे एखादा चित्रपट पाहताना तल्लीन होतो. आपल्याला वेळेचे भान उरत नाही. चित्रपट संपल्यानंतर आपण म्हणतो," अरेच्या, एवढा वेळ झाला. वेळ कसा गेला हे कळलेच नाही." जो रामभक्त किंवा भगवंताचा भक्त असतो त्याचे चित्त भगवंताच्या नामस्मरणात, कथाकीर्तनात अशा प्रकारे रमते. त्याचे देहभान हरपते. आपण असे म्हणतो की जिथे जिथे रामकथा सुरु असते तिथे स्वतः मारुतीराय उपस्थित असतात. का ? तर त्यांना एका रामनामाशिवाय दुसरे काहीच प्रिय नाही. सीतामातेने जेव्हा त्यांना अमोलिक असा मोत्यांचा हार दिला, तेव्हा त्यात माझा राम, माझे स्वामी कुठे आहेत असे म्हणून त्यांनी तो फोडून नष्ट केला. आपल्याही जीवनात सगळीकडे असा राम जेव्हा आपल्याला दिसू लागेल, तेव्हा आपले जीवन खरोखरच धन्य होईल.
जो नित्य नामस्मरणात राहतो त्याला रामस्वरूपाचा बोध होतो. आपणही रामस्वरूप आहोत अशा प्रकारची भावना जागृत होऊ लागते. तेच आपले मूळ स्वरूप आहे. आपण जिथून आलो तिथे आपल्याला जायचे आहे. अशा प्रकारचे ज्ञान जेव्हा होते, तेव्हा देहबुद्धी नष्ट होऊ लागते. आपण म्हणजे देह नाही ही भावना उत्तरोत्तर दृढ होत जाते. भगवंत मुळात आनंदस्वरूप आहे. आपणही मूलतः आनंदस्वरूपच आहोत. पण देहबुद्धीमुळे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला आहे म्हणून आपण आपला आनंद दुसरीकडे शोधू लागतो. पण तो आनंद शाश्वत नसतो.
मी म्हणजे देह अशी जी सुरुवातीपासून आपली भावना असते, त्यातूनच देहसुखाच्या कल्पना निर्माण होतात. या कल्पना म्हणजेच नाना प्रकारच्या वासना. या वासना आपल्या भगवंतापासून दूर नेतात. पण ज्याचे चित्त रामनामी, रामस्वरूपी आणि रामकथेतच समाधान पावते, त्याच्या या ऐहिक वासना हळूहळू लय पावतात. रामरूपातच त्यांचा विलय होतो.
स्वसंवाद
१. माझी 'धन्यतेची' कल्पना केवळ पैसा, गाडी, बंगला आणि अधिकारपद मिळवण्यापुरतीच मर्यादित आहे, की मला 'रामनामात' (सत्कर्मात आणि भक्तीत) खरी तृप्ती मिळते ?
२. एखादा चित्रपट पाहताना किंवा मनोरंजनाच्या गोष्टीत मी जसा स्वतःला विसरून तल्लीन होतो, तशी तल्लीनता मला चांगल्या विचारांचे श्रवण करताना किंवा भगवंताच्या नामस्मरणात कधी अनुभवता येते का ?
३. "मी म्हणजे केवळ हा नश्वर देह नसून मुळात एक आनंदस्वरूप आहे," या खऱ्या स्वरूपाचा बोध मला झाला आहे का, की मी अजूनही देहबुद्धीतच अडकलो आहे ?
४. मारुतीरायांप्रमाणे, ज्या गोष्टीत भगवंताचे (किंवा चांगुलपणाचे) नाम नाही, ती कितीही मौल्यवान असली तरी तिचा त्याग करण्याची वृत्ती माझ्यामध्ये आहे का ?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा