उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२५
अनाथां दिनाकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ।
जया वर्णितां सीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२५।।
अर्थ : परमेश्वर दीन अनाथ भक्तांसाठी अवतार घेतो. कलियुगात तो कल्की म्हणून अवतार घेणार आहे. अशा या परमेश्वराचे वर्णन करताना वेद सुद्धा थकले आहेत. तात्पर्य आपल्या भक्तांचा कैवारी असलेला परमेश्वर त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.
( कलंकी - कल्की अवतार )
विवेचन
आधीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी नऊ अवतारांचे वर्णन केले आहे. त्या त्या अवतारात आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी परमेश्वराने अवतार घेतल्याचे आपल्याला दिसते. ' परित्राणाया साधूनां विनाशायच दुष्कृताम् ' हे त्याचे ब्रीदच आहे. म्हणून अनाथ दीन जनांसाठी तो अवतार घेतो. त्यांचे दुर्जनांपासून रक्षण करतो. परंतु अनाथ आणि दीन जन कोणते ? आपण नेहमीच्या व्यावहारिक अर्थाने समजतो, ते नाहीत. अनाथ आणि दीन या शब्दांचा अर्थ इथे ज्यांना भगवंत हाच माझा नाथ आहे आणि भगवंताशिवाय अन्य आपले कोणी नाही असे वाटते ते असा अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी भक्तांनी त्याची," हे भगवंता, आता मला तुझ्याशिवाय अन्य कोणी त्राता नाही " अशा आर्ततेने आळवणी केली त्या त्या वेळी तो धावून आला. मागील श्लोकांमध्ये गजेंद्राचे उदाहरण, द्रौपदीचे उदाहरण अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत.
आताच्या काळात अन्याय, अत्याचार वाढला आहे. लोक खरा धर्म विसरले आहेत. लोकांच्या वागण्याबोलण्यात दांभिकतेचे प्रमाण वाढले आहे. राजसत्ता, शासनसंस्थेत भ्रष्टाचार, अनागोंदी वाढली आहे. अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा अगदी कळसाला पोचेल तेव्हा कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की रूपाने अवतार घेतील. या वेळी त्यांच्यासोबत अनेक सज्जन शक्ती देखील त्यांना त्याच्या कार्यात साहाय्य करतील. भगवंताच्या नऊ अवतारानंतर होणारा हा दहावा अवतार असेल. कल्की अवताराचे वर्णन पुराणात आले आहे. पुराणात वर्णन केल्यानुसार कल्की म्हणजे एक तेजस्वी ब्रह्मचारी योद्धा असून तो शुभ्र अशा अश्वावर स्वार झाला आहे. त्याच्या हातात तलवार आहे. त्याचे हे वर्णन हे सूचित करते की तो धर्माच्या रक्षणार्थ आणि कल्याणकारी अशा राजसत्तेची स्थापना करणार आहे. धर्माला हानी पोचवणाऱ्या दुष्ट शक्तींचा विनाश करणार आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे हा कल्की अवतार म्हणजे एका नव्या क्रांतीची सुरुवात असेल. अन्याय, अत्याचाराचे अंधकारमय युग संपून एका नव्या युगाची पहाट होईल.
ज्या ज्या वेळी समाजात अन्याय, अत्याचार वाढला आहे, राजसत्ता आणि शासनसत्ता भ्रष्ट झाली आहे अशा वेळी समाजात वेळोवेळी क्रांती घडून आली आहे. हा इतिहास आहे. अशा परिस्थितीत कोणीतरी अशी व्यक्ती जन्माला येते की तिच्या मागे सगळा समाज जातो. अशी व्यक्ती क्रांतीचे माध्यम ठरते. अशा व्यक्तीला समाजातील विधायक शक्तींचे देखील सहकार्य मिळते असाही अर्थ या ठिकाणी घेता येईल.
तात्पर्य, अशा भगवंताचे यथार्थ वर्णन करणे कोणालाही शक्य नाही. त्याचे वर्णन करताना प्रत्यक्ष वेद देखील शिणले आहेत. तर आपल्यासारख्या सामान्य जनांची काय कथा ! तेव्हा दीन अनाथ होऊन म्हणजेच हे भगवंता, मला तुझ्याशिवाय कोणी नाही अशा भावनेने आपण परमेश्वराची भक्ती करावी. तो दीनदयाळू आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.
स्वसंवाद
१. व्यवहारात माझ्याकडे सर्व काही असले, तरी ईश्वरासमोर उभे राहताना "तुझ्याशिवाय माझा दुसरा कुणीही त्राता नाही" अशी 'अनाथ आणि दीन' असल्याची अनन्य शरणागती माझ्या ठायी असते का?
२. आजूबाजूला वाढलेला भ्रष्टाचार किंवा दांभिकता पाहून मी केवळ हताश होऊन नकारात्मक विचार करतो, की कल्की अवताराला (सत्प्रवृत्तीला) साहाय्य करणारी एक 'सज्जन शक्ती' म्हणून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो?
३. ज्याचे यथार्थ वर्णन करताना प्रत्यक्ष वेदही थकले, त्या भगवंताचे आकलन मी माझ्या मर्यादित बुद्धीने आणि अहंकाराने करण्याचा व्यर्थ प्रयत्न तर करत नाही ना?
४. संकटाच्या किंवा अन्यायाच्या अंधकारमय युगातही, भगवंत भक्तांचा कैवारी बनून एका 'नव्या युगाची पहाट' नक्कीच आणेल, हा अढळ विश्वास माझ्या मनात आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१०/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) तम्
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा