मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १२३

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२३

अहिले सतीलागि  आरण्यपंथे ।

कुढावा पुढे देव बंदी तयाते ।

बळें सोडितां घाव घाली निशाणी ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।१२३।।

अर्थ : वनातून जात असताना सती अहिल्येचा श्रीरामांनी उद्धार केला. पुढे चालून रावणाने बंदिवासात ठेवलेल्या देवांना त्यांनी मुक्त केले. त्यासाठी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी त्यांना युद्ध करावे लागले. आपल्या भक्तांचा अभिमानी असलेला राम त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. 

( सती - पुण्यवान/पतिव्रता स्त्री, अरण्यपंथ - अरण्याच्या वाटेवर असताना, कुढावा -रक्षण, बळें सोडिता - आपले सर्व सामर्थ्य वापरून, निशाण - पूर्वीच्या काळी युद्धप्रसंगी वापरले जाणारे एक वाद्य, घाव घालणे - वाद्यावर आघात करणे )

या श्लोकात देव किंवा श्रीराम कसे भक्ताभिमानी आहेत आणि आपल्या दासासाठी ते कसे धावून जातात हे सांगण्यासाठी समर्थांनी साध्वी अहिल्या आणि रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांचे उदाहरण दिले आहे. तसे पाहिले तर आधीच्या श्लोकांमध्ये ही उदाहरणे येऊन गेली आहेत. परंतु भगवंत आपल्या भक्तांचा कसा कैवारी आहे हे सांगण्यासाठी समर्थांनी ही उदाहरणे पुन्हा दिली आहेत. 

गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ही अत्यंत रूपवान होती. पण त्यासोबतच ती पतिव्रता आणि ईश्वरभक्त होती. इंद्राने गौतम ऋषींचे रूप धारण केले आणि तिचा उपभोग घेण्यासाठी तिच्याजवळ तो गेला. अहिल्या त्याला ओळखू शकली नाही. गौतम ऋषी परत आल्यानंतर त्यांना आपल्या पत्नीने इंद्राची सोबत केली हे कळले. त्यांनी संतापून अहिल्येला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. परंतु जे काही घडले त्यात अहिल्येचा काहीही दोष नव्हता हे लक्षात आल्यावर गौतम ऋषींनी तिला असा उ:शाप दिला की भगवंत जेव्हा रामावतारात येतील तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. श्रीराम विश्वामित्र ऋषींसोबत जनकपुरीला जात असताना वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. तेव्हा विश्वामित्रांनी श्रीरामाला ही हकीगत कथन केली आणि श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला. अशा रीतीने आपल्या भक्त असलेल्या अहिल्येचा भगवंतांनी उद्धार केला. 

यातील दुसरे उदाहरण रावणाने बंदिवासात ठेवलेल्या देवांचे आहे. महापराक्रमी अशा रावणाने देवांना देखील बंदी बनवले होते. त्याला आपल्या सामर्थ्याचा प्रचंड अहंकार होता. सगळे देव हे भगवंताचे भक्तच असल्याने त्यांच्या सुटकेसाठी भगवंताला धावून जाणे भाग पडले. श्रीरामांनी त्यासाठी रावणाशी युद्ध केले. त्यासाठी त्यांना आपले सर्व सामर्थ्य पणाला लावावे लागले. त्यांचा पराक्रम आणि युद्ध सामर्थ्याचे वर्णन करण्यासाठी ' त्यांनी सर्व बळानिशी निशाणावर घाव घातला ' असे शब्द समर्थांनी योजले आहेत. निशाण हे त्याकाळातील युद्धप्रसंगी वाजवले जाणारे वाद्य. त्या वाद्यावर त्यांनी सर्व शक्तीनिशी जो आघात किंवा प्रहार केला त्यामुळे शत्रूला देखील धडकी भरली असा तो होता. 

वरील दोन्ही उदाहरणातून देव आपल्या भक्तांना संकटप्रसंगी एकटे पडू देत नाही. तो त्यांचा अभिमानी आहे. त्यांच्या रक्षणार्थ तो धावून जातो हेच समर्थांनी आपल्या मनावर ठसवले आहे. आजच्या काळात कोणी या पौराणिक कथा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतील. परंतु या कथा प्रतीकात्मक अर्थाने देखील घेता येतील. अहिल्येच्या रूपाने समर्थांनी हे सांगितले आहे की देव पतितांचा देखील उद्धार करणारा आहे. तो त्यांना पावन करून घेतो. बंदिवासात असलेले देव म्हणजे साधुसंत किंवा सज्जन माणसे असा प्रतीकात्मक अर्थ घेतला तर त्यांना दुर्जनांपासून त्याने सोडवले आहे. कोणताही अर्थ घेतला तरी भगवंत आपल्या भक्तांचा उद्धार करतो हा बोध आपल्याला घेता येतो. 

स्वसंवाद 

१. अहिल्येच्या कथेप्रमाणे, जर माझ्या हातून नकळत किंवा परिस्थितीमुळे काही चूक झाली असेल, तर मी निराश होऊन 'शिळा' (जड) बनून राहतो, की भगवंताच्या सात्त्विक विचारांच्या स्पर्शाने स्वतःचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करतो? 

२. "देव पतितांचा देखील उद्धार करणारा आहे" यावर विश्वास ठेवून, मी भूतकाळातील माझ्या चुकांना मागे टाकून एका नव्या सन्मार्गावर चालण्यास तयार आहे का? 

३. रावणाने देवांना बंदिवासात ठेवले होते, त्याप्रमाणे माझ्या मनातील काही दुर्गुण किंवा वाईट सवयी यांनी माझ्या आतील 'देवत्वाला' (सत्प्रवृत्तीला) बंदी तर बनवले नाही ना? 

४. जेव्हा सज्जन किंवा चांगल्या विचारांवर दुर्जनांचे संकट येते, तेव्हा "राम दासाभिमानी" आपल्या सर्व सामर्थ्यानिशी पाठीशी उभा राहतो, हा दृढ विश्वास माझ्या मनात अढळ आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

९/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...