मुख्य सामग्रीवर वगळा

नात्यांचं महावस्त्र - भाग चार : 'आजी'

उगवतीचे रंग

नात्यांचं महावस्त्र - भाग चार : 'आजी' (संस्कारांची शिदोरी)

माझ्या कल्पनेतील आजी अशी आहे...

मायेचे आगर, प्रेमाचा सागर,
ज्ञानाची घागर असे आजी!

आजीची पोतडी गोष्टींनी समृद्ध,
आजीचा बटवा औषधांनी...

केसांचा अंबाडा, बोलणे प्राजक्ताचा सडा 
दातांची जरी कवळी, मनाने राही देवाजवळी.

सुरकुत्यांचे जाळे अंगावरी पण 
बोलण्यातून फुलती हास्य लकेरी.

आईबाबा नसता, आजीचा फिरे हात,
प्रेमाची ती साथ सुरक्षेची!

आजीच्या हाताला चव फार,
दुधात साखर असे आजी!

आजी म्हणजे फक्त नाव नसतं
वर्तमानाला भूत आणि भविष्याशी जोडणारं एक गाव असतं.

आजची आजी त्या मानाने अधिक आधुनिक आणि आपले आरोग्य उत्तम राखणारी आहे पण तिच्या मनातील नातवंडांबद्दलचे प्रेम आणि सगळ्यांबद्दलची माया कायमच असते!

'नात्यांचं महावस्त्र' विणताना आईची 'मायेची पैठणी' आणि बाबांची 'सह्याद्रीची ढाल' आपण पाहिली. पण या वस्त्राला पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची, परंपरेची आणि बिनशर्त प्रेमाची जरतारी किनार देणारं एक अथांग नातं म्हणजेच 'आजी'! आजी म्हणजे मूर्तिमंत माया आणि प्रेम! अनुभव आणि ज्ञान, प्रेम आणि शिस्त, अध्यात्म आणि व्यवहार या सगळ्या गुणांची अनोखी सांगड म्हणजे आजी.

खरं तर, आज्यासुद्धा दोन असतात—एक वडिलांची आई आणि दुसरी आईची आई (आजोळची आजी). या दोन्ही आज्यांची नावं जरी वेगवेगळी असली, तरी दोन्हीकडे मिळणारी मायेची ऊब मात्र एकच असते. एक आजी घरात राहून आपल्यावर रोज संस्कारांचे सिंचन करते, तर दुसरी आजोळची आजी सुट्ट्यांमध्ये लाड पुरवून बालपणात आनंदाचे रंग भरते. या दोन्ही आज्यांच्या छायेत वाढणारं मूल आयुष्याच्या बाजारात कधीच अपयशी ठरत नाही. खरं तर नातवंडांना दुधावरची साय म्हटलं जातं, पण अंगावर सुरकुत्या पडलेल्या आजीची माया या दुधावरच्या सायीसारखीच घट्ट आणि समृद्ध असते!

मला माझी आजी आठवते. तिच्याबद्दल या ठिकाणी थोडं सांगणं नक्कीच अनुचित होणार नाही. माझं बालपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेलं. मी साधारण चौथीच्या वर्गात असेपर्यंत माझी आजी आमच्यासोबत होती; त्यामुळे मला ती अगदी स्पष्ट आठवते. आजी फारशी शिकलेली नव्हती, पण तिच्याजवळ पारंपरिक आणि अनुभवजन्य ज्ञानाचे अथांग भांडार होते. ती अतिशय प्रगत विचारांची होती, नवीन चांगल्या गोष्टींना तिचा कधीच विरोध नसायचा.

मी बाहेरून खेळून आलो की आजी मला आधी सक्तीने हातपाय धुवायला लावायची; त्याशिवाय पाणी पिण्यासाठी माठाकडे जाऊ देत नसायची. मला तर खेळून आल्यामुळे तीव्रतेने तहान लागलेली असायची, त्यामुळे त्यावेळी मला कधी कधी तिचा खूप राग यायचा. पण आज मोठं झाल्यावर, जगाचा अनुभव आल्यावर कळतं की तिचं ते सांगणं आरोग्याच्या दृष्टीने किती बरोबर होतं! कोरोनाच्या भीषण काळात तर आपण सर्वजण याच गोष्टीबाबत अगदी दक्ष राहायला लागलो होतो, जी शिस्त आजीने आपल्याला बालपणीच लावली होती.

लहनपणी आम्हाला 'आजीचे घड्याळ' या नावाची एक सुंदर कविता होती. माझी आजी अगदी तशीच होती! तिच्याजवळ घड्याळ नव्हतं, पण तिच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी व्हायच्या. सकाळी पहाटे लवकर उठून धार्मिक वाचन, जप या गोष्टी ती नित्यनेमाने करायची. संध्याकाळी मला देवाजवळ हक्काने बसवून 'शुभंकरोती' म्हणायला लावायची आणि देवादिकांच्या रंजक गोष्टी सांगायची. आजी म्हणजे संस्कारांची एक चालतीबोलती पाठशाळाच होती.

पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर होत असत. माझी आई सांगते की, तिचं लग्न माझ्या मामांनी ती अवघ्या १४-१५ वर्षांची असतानाच करून दिलं होतं. तिचे आई-वडील ती लहान असतानाच वारले होते, त्यामुळे मामांनीच तिला मायेने वाढवलं. खरं तर तिचं ते वय शाळेत जाण्याचं आणि बागडण्याचं होतं; पण परिस्थितीमुळे तिला फार शिक्षण घेता आलं नाही. लग्न होऊन नवीन घरात आल्यावर तिला स्वयंपाक वगैरे गोष्टी फारशा येत नव्हत्या. पण माझी आजी, जी नात्याने तिची सासू होती, ती तिची खऱ्या अर्थाने 'आई' झाली! तिने माझ्या आईला अगदी पोटच्या मुलीसारखं मानून स्वयंपाकापासून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मायेने शिकवल्या. सासू-सुनेच्या नात्याला आई-मुलीचं रूप देणाऱ्या माझ्या अशा आजीचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो.

आई-बाबांचे जग हे सहसा शिस्तीचं, कर्तव्याचं आणि आजच्या काळात खरं तर खूप धावपळीचं असतं. अशा वेळी घरात आजी असणे म्हणजे दुधात साखर पडण्यासारखे आहे. आई-बाबा घरात नसले, तरी पाठीशी आजी असल्यामुळे त्यांना मुलांची अजिबात चिंता नसते. आई-बाबांच्या शिस्तीचा आणि ओरड्याचा उन्हाळा जेव्हा मुलांच्या वाटेला येतो, तेव्हा आजीच्या पदराची सावली हिमालयासारखी शीतल आणि उबदार ठरते. आईने रागवून हात उगारला की मुलं रडत जिथे जाऊन लपतात, ते जगातील सर्वात हक्काचं आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे आजीची कुस!

आजीचे ते पिकलेले पांढरे शुभ्र केस हे केवळ वयाचे लक्षण नसते, तर त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या शेकडो उन्हाळ्या-पावसाळ्यांच्या समृद्ध अनुभवाचे ते संचित असते. म्हणूनच, जेव्हा घरावर किंवा प्रपंचावर एखादे संकट येते, तेव्हा आजीचा हा प्रदीर्घ अनुभव घरातील माणसांना संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा दाखवतो. आजीचा तो जुना लाकडी बटवा आजही अनेकांना आठवत असेल. त्यात केवळ खोबरेल तेल, सुंठ, वेखंड किंवा लवंग नसायची; तर बालपणातल्या प्रत्येक लहान-सहान आजारपणावर फुंकर घालणारा 'मायेचा परिसस्पर्श' असायचा. आजच्या 'अलोपॅथी'च्या काळातही आजीच्या बटव्यातल्या काढ्याची जी चव आणि गुण होता, तो कोणत्याही महागड्या औषधात मिळू शकत नाही. आजकालच्या बऱ्याच नवीन लग्न झालेल्या आणि नुकत्याच माता बनलेल्या आधुनिक स्त्रियांना त्यांचं मूल रडू लागलं की त्या घाबरून जातात, अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. पण घरात जर सासूबाईंच्या रूपाने आजी हजर असेल, तर आजीकडे अशा प्रत्येक प्रसंगाचे हमखास आणि शांत करणारे उत्तर तयार असते.

आजी आणि नातवंडं यांच्यातलं सर्वात मोठं आणि सोनेरी माध्यम म्हणजे 'गोष्टी'! आजीची ती जुनी पोतडी नेहमीच अद्भूत गोष्टींनी समृद्ध असायची. रात्रीच्या वेळी आजीच्या कुशीत शिरून चांदोबाच्या गोष्टी, परिकथा, इसापनीती किंवा रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या कथा ऐकणे हा बालपणीचा सर्वात सुंदर महोत्सव असायचा. त्या गोष्टींमध्ये जो निखळ आनंद होता, तो आजच्या दूरचित्रवाणीवरील 'कार्टून्स'मध्ये नक्कीच नाही. आजी केवळ गोष्टी सांगत नसायची, तर त्या गोष्टींच्या रंजक माध्यमातून ती मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर 'नैतिकतेची' आणि 'संस्कारांची' पेरणी करत असायची. तिने लावलेली 'शुभंकरोती'ची आणि रामरक्षेची सवय मुलांच्या आयुष्याला अंतर्गत शुद्धता देऊन जाते आणि आयुष्यभर हे संस्काराचे देणे माणसाला सुखद जगण्यासाठी उपयोगी पडते. ज्या घरात लहान मुलं असतात, त्या घराच्या भिंती भलेही लहान मुलांनी रेघोट्या ओढून खराब केलेल्या असतात पण ज्या घरात आजी आजोबांना मानाचे स्थान असते, त्या घराच्या भिंती संस्कारांच्या सिमेंटमुळे भक्कम होतात. लोकरीच्या गरम महागड्या शाली ढीगभर मिळतील पण आजी म्हणजे उब देणारी मायेची गोधडी असते.

पण कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आजी-आजोबांसारखे मायेचे वटवृक्ष आज घराघरातून नाहीसे होताना दिसत आहेत. आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र तर खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन 'विभक्त कुटुंबे' आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजीच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत.

आई-बाबा दोघेही नोकरीवर गेल्यावर मुले पाळणाघरात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेली दिसतात. मोबाईलवरील 'यूट्यूब'च्या स्क्रीनवर निर्जीव आवाजात गोष्टी ऐकणे आणि आजीच्या उबदार कुशीत तिच्या हृदयाची जिवंत धडधड ऐकत गोष्ट ऐकणे, यातील जमीन-अस्मानाचा फरक आजच्या डिजिटल पिढीला समजणार कसा?

आजच्या काळाची ही मोठी शोकांतिका आहे की, ज्या आजीच्या पंखांखाली संपूर्ण घर सुरक्षित राहायचे, ती आजी आज अनेक ठिकाणी वृद्धापकाळात एकाकी पडलेली दिसते. आयुष्याच्या या संध्याकाळी तिला पैशांपेक्षा आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या दोन गोड शब्दांची, त्यांच्या वेळेची भूक असते. ज्याप्रमाणे वाळलेल्या पानांनी कधीकाळी आपल्याला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती, तसेच आजीच्या पिकलेल्या केसांचा आणि तिच्या सुकून गेलेल्या हातांचा आदरयुक्त सन्मान करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

नात्यांच्या या भरजरी 'महावस्त्रा'चा हा आजी नावाचा पदर आपल्या संस्कृतीचे खरे वैभव आहे. ही आपली ठेवणीतली पैठणी आहे. ही मायेची सावली घरात जपणे आणि तिच्या अनुभवाचे गाठोडे पुढच्या पिढीकडे आदराने सुपूर्द करणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे. संस्कृती, संस्कार आणि प्रेम जपायचं असेल आणि ते पुढील पिढीकडे सुरक्षित सुपूर्द करायचं असेल, तर 'आजी' ही गोष्ट कुटुंबातून कधीही 'माजी' होता कामा नये! ही तुमची, आमची आणि या समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

८/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२ 

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...