मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १२१

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२१

महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।

म्हणोनी तया कारणे सिंहय झाला ।

न ये ज्वाळ वीषाळ  संन्नीध कोण्ही ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२१।।

अर्थ : प्रल्हाद हा भगवंतांचा थोर भक्त होता. जेव्हा त्याला त्रास होऊ लागला, तेव्हा त्याच्यासाठी भगवंताने सिंहाचे रूप धारण केले. सिंहरूपी भगवंताच्या अंगातून येणाऱ्या प्रचंड ज्वाळांमुळे त्याच्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. भगवंत हा भक्ताभिमानी असून आपल्या भक्तांची तो कदापिही उपेक्षा करीत नाही. 

( ज्वाळ वीषाळ -आगीच्या प्रचंड ज्वाला, सन्निध - जवळ, कोण्ही - कोणी )

विवेचन 

प्रल्हाद हा भगवंताचा परमभक्त होता. प्रल्हादाचा उल्लेख करताना नेहमी भक्त प्रल्हाद असा केला जातो. त्याची कथा यापूर्वी ९६ व्या श्लोकात आली आहे. समर्थांनी त्याला महा भक्त म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे राक्षस कुळात जन्माला येऊनही आणि अत्यंत विपरीत परिस्थिती असूनही भगवंताची भक्ती तो एकनिष्ठपणे करीत राहिला. प्रल्हाद हा वयाने लहान असला तरी अत्यंत ज्ञानी होता. या चराचरात सर्वत्र भगवंत भरला आहे या गोष्टीवर त्याची दृढ श्रद्धा होती आणि त्या दृष्टीनेच तो सर्वांकडे पाहत होता. प्रल्हादाला महाभक्त म्हणण्याचे आणखी एक कारण आहे. त्याने परमेश्वराकडे त्याच्या एकट्याच्या मुक्तीची याचना केली नाही. भगवंताने सर्वसामान्य माणसांचा देखील उद्धार करावा अशी विनंती त्याने केली. 

त्याच्यावर अनेक संकटे आली पण प्रत्येक वेळी प्राणांतिक संकटातून त्याला भगवंताने तारून  नेले. प्रल्हादाची भक्ती जेवढी शुद्ध आणि निष्कपट होती, त्याच्या नेमका उलट त्याचा पिता हिरण्यकश्यपू हा होता. तो अत्यंत दुराचारी, भोगी आणि विलासी स्वभावाचा होता. त्याला मिळालेल्या वरामुळे त्याचा अहंकार कमालीचा वाढला होता. मीच परमेश्वर आहे असे तो समजू लागला होता. ज्याप्रमाणे शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून ठार केले. त्याप्रमाणेच आता हिरण्यकश्यपूच्या अपराधांची सीमा झाली होती. 

हिरण्यकश्यपूला दिलेल्या वरानुसार देव, दानव किंवा मानव यांच्या हस्ते, अस्त्राने किंवा शस्त्राने, जमिनीवर किंवा आकाशात त्याचा वध होऊ शकत नव्हता. एक प्रकारे हिरण्यकश्यपूने अमरत्वच प्राप्त केले होते. त्यामुळे आपल्या भक्ताला छळणाऱ्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंताला नरसिंह रूप धारण करावे लागले. हे नरसिंह रूप अत्यंत उग्र होते. त्याच्या अंगातून दाहक ज्वाळा निघत होत्या. त्यामुळे ते पाहून सर्वसामान्यांची पाचावर धारण बसली. त्याच्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होईना. परंतु भगवंताचा भक्त असलेला प्रल्हाद मात्र त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रणाम करू लागला. हाच नरसिंह अवतार. प्रल्हादाने नंतर त्याला सौम्य रूप धारण करण्याची विनंती केली. आता लक्ष्मीनृसिंह म्हणून या अवतारातील भगवंताची पूजा केली जाते. 

या नरसिंह रूपात हिरण्यकश्यपूला दरवाज्यापर्यंत फरफटत नेऊन त्याला आपली नखे खुपसून ठार मारले. अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचा कैवारी आहे. त्यांच्या रक्षणासाठी तो कोणताही अवतार धारण करून त्यांचे रक्षण करतो. 

स्वसंवाद 

१. प्रल्हादाप्रमाणे माझ्या सभोवताली कितीही विपरीत, नकारात्मक किंवा नास्तिक परिस्थिती असली, तरीही मी माझ्या चांगुलपणावर आणि भगवंताच्या सात्त्विक विचारांवर एकनिष्ठ राहू शकतो का? 

२. हिरण्यकश्यपूला मिळालेल्या अफाट सत्तेसारखा किंवा संपत्तीसारखा अहंकार माझ्या मनात डोकावतो का? मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो का? 

३. जेव्हा भगवंताचे रूप उग्र किंवा संकटाचे वादळ प्रचंड असते, तेव्हा मी घाबरून दूर पळतो, की प्रल्हादासारखा निष्कपट आणि निर्भय भाव ठेवून त्या परिस्थितीला सामोरा जातो? 

४. प्रल्हादाने जशी केवळ स्वतःच्या सुखाची किंवा मुक्तीची हाव न धरता सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली, तशी 'वसुधैव कुटुम्बकम्' ही व्यापक भावना माझ्या प्रार्थनेत आणि आचरणात कधी उमटते का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

७/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...