उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२०
विधीकारणे जाहला मछ वेगीं ।
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ।
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।१२०।।
अर्थ : ब्रह्मदेवासाठी भगवंताने तत्परतेने मत्स्यरूप धारण केले. कूर्मावतारात पृथ्वी पाठीवर घेऊन तिचे रक्षण केले. जनांचे कल्याण व्हावे म्हणून त्याने नीच योनीत जन्म घेणे देखील स्वीकारले. आपल्या भक्तांचा अभिमानी असलेला भगवंत त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.
( विधी - ब्रह्मदेव, मछ - मासा, कूर्म - कासव, धरा - पृथ्वी, पृष्ठभागी - पाठीवर, नीच योनी - मानवेतर प्राण्याचा किंवा क्षुद्र जन्म )
विवेचन
या एकाच श्लोकात परमेश्वराच्या तीन अवतारांचा उल्लेख आला आहे. मत्स्यावतार, कूर्मावतार आणि वराह अवतार. त्यामुळे या श्लोकाचा अर्थ लक्षात येण्यासाठी या पौराणिक कथा थोडक्यात जाणून घेऊ या. ब्रह्मदेव वेदांच्या साहाय्याने सृष्टीची पुनर्निर्मिती करतात. म्हणून वेद हे सृष्टीचे निर्माते आहेत. २५ व्या कल्पाच्या वेळी ब्रह्मदेव निद्राधीन असताना हयग्रीव नावाच्या राक्षसाने वेद पळवले. ते घेऊन तो प्रलयसागरात लपून बसला. ब्रह्मदेवांना हे कळल्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंना वेदांचे रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी भगवंताने तत्परतेने मत्स्यावतार धारण केला. हयग्रीव दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला आणि त्याच्या ताब्यात असलेले वेद सोडवून आणले.
दुसरी कथा भगवंताच्या कूर्मावताराची आहे. समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून घुसळण्यासाठी वापर केला. परंतु हा मंदार पर्वत आपल्या भारामुळे समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवंताने कूर्मावतार धारण करून मंदार पर्वताचा भार आपल्या पाठीवर घेतला. त्यानंतरच समुद्रमंथन शक्य झाले. परंतु येथे ही कथा समर्थांना अभिप्रेत नसावी. भगवंतानेच निर्माण केलेली ही धरा म्हणजे पृथ्वी आपल्याच वजनामुळे समुद्रात बुडू लागली. त्यावेळी सगळेच जीवन नष्ट होण्याचा धोका होता. अशा वेळी भगवंताने कासवाचे रूप धारण केले आणि पृथ्वीला आपल्या पाठीवर तोलून धरले असेही स्पष्टीकरण काही ग्रंथांमध्ये आढळते. काही विद्वानांनी या कथेला मान्यता दिली आहे. हीच कथा या ठिकाणी समर्थांना अपेक्षित असावी. हाच भगवंताचा कूर्मावतार. त्यामुळे पृथ्वी बुडण्यापासून वाचली.
भगवंताचा तिसरा अवतार वराह रूपातील आहे. हिरण्याक्ष नावाचा महाबलवान दैत्य होता. त्याने पृथ्वी पाताळामध्ये पळवून नेली. तेव्हा पृथ्वीचे त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी विष्णूने वराह अवतार धारण केला. पाताळात जाऊन हिरण्याक्षाचा वध केला. आपल्या सुळ्यांच्या साहाय्याने पृथ्वी पाताळाबाहेर आणून ठेवली. वराह योनी हा पशूंमधील देखील नीच जन्म मानला जातो. परंतु लोकांच्या कल्याणासाठी विष्णूला वराह रूप देखील धारण करावे लागले. या श्लोकामध्ये वराह अवताराचा थेट उल्लेख नसला तरी नीच योनी या शब्दांनी त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे.
आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी भगवंत किती तत्पर असतो हेच या पौराणिक कथा दाखवतात. ज्या भगवंताने अत्यंत बलवान अशा दैत्यांचा विनाश केला, प्रचंड असा पृथ्वीचा भार आपल्या पाठीवर किंवा सुळ्यांवर तोलून धरला. त्याला आपल्या भक्तांचे रक्षण करणे किंवा उद्धार करणे कठीण नाही. देव भक्ताभिमानी आहे, भक्तांचा कैवारी आहे. तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात.
स्वसंवाद
१. वेदांच्या रक्षणासाठी मत्स्यरूप धारण करणारा परमेश्वर संकटाच्या वेळी मला देखील सावरण्यासाठी कोणत्याही रूपात माझ्या मदतीला धावून येईल, असा अढळ विश्वास माझ्या मनात आहे का ?
२. कूर्मावतारात पृथ्वी बुडू लागताच तिचा भार भगवंताने आपल्या पाठीवर घेतला. त्याप्रमाणे संसारसागरात मी बुडत असताना भगवंत मला आधार देईल याची खात्री मला वाटते का ?
३. भगवंताने जनांच्या कल्याणासाठी 'वराह' (नीच योनी) जन्म घेण्यासही संकोच केला नाही, तर मी समाजहिताच्या कामात माझा खोटा अहंकार बाजूला ठेवून नम्रतेने काम करतो का ?
४. 'देव भक्ताभिमानी आहे', हे जाणून मी माझ्या रोजच्या जीवनातील व्यर्थ चिंता सोडून देऊन स्वतःला ईश्वराच्या भक्तीवर पूर्णपणे सोपवून दिले आहे का ?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
७/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा