उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११८
गजेंद्र महा संकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धावताहे ।
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११८।।
अर्थ : गजेंद्रावर जिवावरचे संकट आले. त्याने भगवंताचा धावा केला आणि तो त्याची वाट पाहू लागला. त्याच्या सुटकेसाठी भगवंत धावून आले. ( त्या संकट समयी ) उडी घालून भगवंताने आपल्या भक्ताचे प्राण वाचवले. आपल्या भक्ताचा अभिमानी असलेला भगवंत त्याची कधी उपेक्षा करीत नाही.
( वास पाहे - वाट पाहत होता, जीवदानी - जीवदान देणारा )
विवेचन
आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत कसा धावून येतो हे समर्थ आपल्याला विविध उदाहरणांद्वारे पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकात आपण अंबरीष राजा, उपमन्यू आणि ध्रुव बाळाचे उदाहरण पाहिले. या श्लोकात समर्थ आपल्याला गजेंद्राचे उदाहरण देत आहेत. हा श्लोक समजून घेण्यासाठी आपल्याला ही पौराणिक कथा जाणून घ्यावी लागेल. भागवत आणि पद्मपुराणात या कथेचा उल्लेख येतो. फार पूर्वी पांड्य देशात इंद्रद्युम्न नावाचा एक राजा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. एकदा त्याची भेट घेण्यासाठी त्याच्याकडे अगस्ती ऋषी आले. त्यावेळी राजा पूजेत मग्न होता. आपल्या स्वागतासाठी राजा आला नाही म्हणून अगस्ती ऋषी रागावले. ते म्हणाले, " हे राजा तू उन्मत्त झाला आहेस. ऋषींचे आदरातिथ्य करण्याचे तुला भान नाही. तेव्हा तू माझ्या शापामुळे एक मदोन्मत्त हत्ती म्हणून जन्माला येशील." राजाने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी त्याला उ:शाप दिला की हत्ती असताना जेव्हा तू प्राणांतिक संकटात सापडशील आणि भगवंताचा धावा करशील, तेव्हा भगवंत स्वतः येऊन तुझा उद्धार करतील. ऋषींच्या शापानुसार हत्ती झालेला हा राजा नंतर गजेंद्र म्हणून ओळखला गेला. तो एका हत्तींच्या कळपाचा नायक झाला.
एके दिवशी आपल्या समूहासह तो एका तळ्यात जलक्रीडा करीत असताना एका मगराने त्याचा पाय पकडला. त्याने सुटकेसाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च करूनही मगराच्या तावडीतून तो स्वतःला सोडवू शकला नाही. त्याच्या कळपानेही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता आपल्यापुढे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही असे लक्षात आल्याने त्याने भगवंताचा आर्ततेने धावा केला. तशाही जखमी अवस्थेत आपल्या सोंडेने तळ्यातील एक कमळ उपटून आकाशाच्या दिशेने फेकले. त्याचा आर्त धावा ऐकून भगवंत धावून आले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने त्या मगराचा वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला.
या कथेतील जो मगर आहे, तो देखील आधीच्या जन्मात गंधर्व होता. परंतु देवल ऋषींच्या शापामुळे त्याला मगराचा जन्म प्राप्त झाला. या प्रसंगी भगवंताच्या हातून मृत्यू आल्याने मगराचा देखील उद्धार झाला आणि तो पुन्हा गंधर्व लोकात परत गेला. इंद्रद्युम्न राजा वैकुंठात भगवंताचा सेवक झाला.
थोडक्यात सांगायचे तर "माणसाचे स्वतःचे बळ जिथे संपते, तिथे भगवंताचे बळ सुरू होते. संकटसमयी सर्व अहंकार सोडून मनोभावे आणि अनन्यभावाने ईश्वराचा धावा केल्यास तो भक्ताच्या रक्षणासाठी नक्कीच धावून येतो." हाच या कथेचा मुख्य संदेश आहे.
स्वसंवाद
१. माझ्यावर जेव्हा मोठे संकट येते, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या बळाचा, पैशाचा किंवा ओळखीचा अहंकार बाळगून लढत राहतो, की माझ्या मर्यादा ओळखून ईश्वराला शरण जातो ?
२. गजेंद्राने प्राणांतिक संकटातही जसे मनोभावे तळ्यातील कमळ भगवंताला अर्पण केले, तसा निस्सीम आणि शुद्ध भाव माझ्या प्रार्थनेत कधी असतो का ?
३. "माणसाचे स्वतःचे बळ जिथे संपते, तिथे भगवंताचे बळ सुरू होते" या सत्यावर माझा खरोखरच अढळ विश्वास आहे का ?
४. संकटाच्या वेळी मदतीला न येऊ शकणाऱ्या जगावर विसंबून राहण्यापेक्षा, जो 'भक्ताभिमानी' माझी कधीच उपेक्षा करणार नाही त्या ईश्वराचा मी खऱ्या मनाने धावा करतो का ?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
५/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा