मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ११६

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११६

बहू श्रापिता  कष्टला अंबऋषि ।

तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ।

दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११६।।

अर्थ : अंबरीश राजाला (दुर्वास ऋषींनी ) शाप दिल्यामुळे त्याला फार कष्ट झाले. त्याच्यासाठी भगवंताने स्वतः गर्भवास सोसला. उपमन्यू या आपल्या भक्तासाठी त्यांनी त्याला क्षीरसागराचे वरदान दिले. अशा रीतीने देव आपल्या भक्तांची काळजी घेतो. आपल्या भक्तांचा अभिमान असलेला हा भगवंत त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. 

( श्रापिता - शाप दिल्याने, क्षीरसिंधु - दुधाचा समुद्र, नुपेक्षी - उपेक्षा /दुर्लक्ष करीत नाही )

विवेचन 

११६ ते १२६ या अकरा श्लोकात समर्थ आपल्याला परमेश्वर आपल्या भक्तांची कशी काळजी घेतो आणि त्यांची उपेक्षा कशी होऊ देत नाही हे सांगतात. या श्लोकाचा अर्थ लक्षात येण्यासाठी आपल्याला त्याच्यामागील पौराणिक कथा समजून घ्यावी लागेल. अंबऋषी म्हणजे अंबरीष राजा. त्याची कथा महाभारत आणि भागवतात येते. हा राजा अत्यंत पराक्रमी आणि भगवंताचा परमभक्त होता. तो एकादशीचे व्रत नियमितपणे करीत असे. एकदा त्याने असेच एकादशीचे व्रत केले असता, त्याच्याकडे दुर्वास ऋषी मुक्कामासाठी आले. दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्याने उपवास सोडण्यासाठी राजाने त्यांना आपल्यासोबत भोजनासाठी थांबण्याची विनंती केली. दुर्वासांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी नदीवर स्नानासाठी गेले. तिकडेच ते ध्यानात रमल्यामुळे भोजनासाठी येण्यासाठी त्यांना खूप उशीर झाला. राजाने त्यांची वाट पाहून उपवास सोडण्यासाठी भगवंताचे तीर्थ घेऊन आचमन केले. दुर्वास आल्यानंतर त्यांना जेव्हा राजाने एकादशीचा उपवास आपल्याशिवाय सोडला हे कळले तेव्हा ते अतिशय संतापले. ते मुळातच शीघ्रकोपी स्वभावाचे होते. वास्तविक राजाने भोजन केले नव्हते. पण तरीही दुर्वासांनी त्याला मनुष्य आणि प्राण्याचे दहा जन्म प्राप्त होतील असा शाप दिला. शिवाय आपल्या डोक्यावरील एक केस उपटून त्याच्यातून राजाला मारण्यासाठी कृत्या निर्माण केली. (कृत्या म्हणजे काळ्या जादूने किंवा तांत्रिक विधीने दुसऱ्याला मारण्यासाठी निर्माण केलेली विनाशकारी शक्ती )

ही कृत्या जेव्हा अंबरीष राजाला मारण्यासाठी धावली, तेव्हा आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत धावून आले. त्यांनी सुदर्शन चक्राच्या साहाय्याने कृत्याचा नाश केला. पण आता ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. तेव्हा दुर्वासांनी भगवंताचा धावा केला. भगवंताने आपले सुदर्शन मागे घेतले. पण दुर्वासांनी दिलेल्या शापाच्या पूर्ततेसाठी स्वतः भगवंताने गर्भवास सोसून जन्म घेतले अशी ही कथा आहे. 

दुसरी कथा उपमन्यूची आहे. उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. त्याच्या घरी अत्यंत गरिबी होती. त्याला लहानपणी पिण्यासाठी गायीचे दूध देखील मिळत नसे. त्याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून देई. एकदा त्याला शेजारच्या ऋषींच्या आश्रमात गायीचे धारोष्ण दूध प्यायला मिळाले. खरे दूध कसे असते हे त्याला कळले. आपल्या आईकडे त्याने तशा दुधासाठी हट्ट धरला. आईने त्याला सांगितले की बाळा आपण गरीब आहोत. आपल्याला गायीचे दूध परवडत नाही. मागील जन्मी आपण काहीतरी पाप केले असले पाहिजे म्हणून आपल्याला ही अशी अवस्था प्राप्त झाली. तेव्हा लहानगा उपमन्यू भगवंताची उपासना करू लागला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याच्यासाठी क्षीरसागरच निर्माण केला. क्षीरसागर प्रतीकात्मक अर्थानेही घेता येईल. आनंदाचा आणि सर्व सुखांचा सागर या अर्थाने. आपल्या भक्ताला त्यामुळे काहीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था भगवंताने केली.

अशा रीतीने जो कोणी मनापासून त्याची भक्ती करतो अशा आपल्या भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा होऊ देत नाही. तो आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आहे. म्हणून आपणही भक्तिमार्गाचा अवलंब करावा असेच समर्थांचे सांगणे आहे. 

स्वसंवाद 

१. दुर्वास ऋषींसारखा मोठा संताप किंवा कोणतीही विनाशकारी 'कृत्या' (संकट) समोर आली, तरी मी अंबरीष राजासारखा शांत राहून भगवंताच्या स्मरणाचा आणि विवेकाचा आश्रय घेतो का? 

२. उपमन्यूच्या कथेप्रमाणे, माझ्या आयुष्यात किंवा कुटुंबात एखादी मोठी उणीव अथवा गरिबी आली, तर मी इतरांचा हेवा करत नशिबाला दोष देत बसतो, की माझ्या प्रामाणिक कर्माने व साधनेने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो? 

३. "माझा देव भक्ताभिमानी आहे आणि तो माझी कधीही उपेक्षा करणार नाही," हा दृढ विश्वास माझ्या मनात सुखाच्या काळाप्रमाणेच संकटाच्या वादळातही अढळ राहतो का? 

४. ईश्वराकडे केवळ संसारातील छोट्या-छोट्या भौतिक गोष्टींची मागणी करण्याऐवजी, मी कधी उपमन्यूसारखा अनन्यभाव ठेवून साक्षात 'क्षीरसागर' (परमानंदाचा सागर) मिळवण्याची इच्छा बाळगतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

४/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...