मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ११४

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११४ 

फुकाचे मुखीं बोलता काय वेचे ।

दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ।

क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे ।

विचारे तुझा तूंचि शोधून पाहें ।।११४।।

अर्थ : उगीचच बडबड करून व्यर्थ ज्ञान पाजळल्याने काहीच साधत नाही. मनातील अहंकार मात्र दिवसेंदिवस वाढतो. आचरण न करता केलेली बडबड व्यर्थ आहे. म्हणून हे मना, ही गोष्ट खरी आहे की नाही हे तू स्वतः शोधून काढ.

( काय वेचे - काही साधत नाही, अभ्यंतरीं - अंतरात, साचे - साठत जातो )

विवेचन 

आधीच्या श्लोकात आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगणाऱ्या विद्वानांची अंती काय गत होते ते समर्थांनी आपल्याला सांगितले. या श्लोकात ते व्यर्थ पोकळ बडबड करून आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या दांभिक लोकांवर कोरडे ओढतात. ' उथळ पाण्याला खळखळाट फार ' अशी आपल्याकडे म्हण आहे. थोडाफार अभ्यास केलेली माणसे आपल्याला फार कळते म्हणून व्यर्थ बडबड करीत असतात. कीर्तन, प्रवचने किंवा सभा संमेलनात अशी अनेक माणसे आपण पाहतो. त्यांच्याजवळ उत्तम वक्तृत्व असते. आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर ते श्रोत्यांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतात. त्यातून त्यांचा अहंकार फुलत जातो. त्यांना कोणी काही सांगितले तरी त्यांची ऐकून घेण्याची तयारी नसते. आपल्या पांडित्याच्या जोरावर आपलेच म्हणणे कसे बरोबर आहे हे ते दुसऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात.  

आजकाल ज्ञान देणारी खूप साधने उपलब्ध झाली आहेत. दूरदर्शन, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यातून दररोज निरनिराळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. पण त्यातील खरी किती आहे, त्याला खरोखर अनुभवाची जोड आहे का हे पारखून घेणे महत्त्वाचे असते. जो तो माझेच म्हणणे कसे बरोबर असे सांगून आपले मत लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असतो. 

व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की जी व्यासपीठावरून बोलतात एक आणि करतात वेगळेच. वैयक्तिक जीवनात त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते. हा शुद्ध दांभिकपणा आहे. आपण जे काही सांगतो, त्यामागे काही एक तपश्चर्या किंवा साधना असणे आवश्यक असते. जे ज्ञान आपण प्राप्त केलेले असते, ते आचरणात आणणे ही पहिली पायरी आहे. नंतरच ती गोष्ट लोकांना सांगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. 'अभ्यासोनि प्रकटावे 'असे समर्थांचे सांगणे आहे. एखादी गोष्ट केवळ आपल्याला माहीत आहे पण आपण स्वतः ती कधी आचरणात आणली नाही अशी गोष्ट दुसऱ्यांना सांगू नये. आपल्या बोलण्याला तेव्हाच वजन प्राप्त होते, जेव्हा आपण ती गोष्ट आचरणात आणतो. नाहीतर ती केलेली बडबड व्यर्थ आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात,' क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ' 

स्वतःचे मन हा आपले प्रतिबिंब पाहण्याचा एक उत्तम आरसा आहे. आपण बोललो आहे ते कितपत बरोबर आहे, आपण स्वतः ते आचरणात आणतो का हे आपले मन आपल्याला सांगत असते. म्हणून प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्या वागण्याबोलण्याविषयी विचार करावा. म्हणूनच समर्थ या श्लोकातील शेवटच्या चरणात म्हणतात, ' विचारे तुझा तूंचि शोधूनि पाहे.' प्रत्येक श्लोकाच्या शेवटी दिलेले स्वसंवादाचे प्रश्न देखील असेच आत्मपरीक्षण आपल्याकडून व्हावे यासाठी आहेत.

स्वसंवाद 

१. मी चारचौघांत किंवा समाजमाध्यमांवर जे मोठे विचार मांडतो, ते मी केवळ 'वक्तृत्वाचा प्रभाव' पाडण्यासाठी मांडतो की प्रत्यक्षात आचरणातही आणतो?

२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या व्यर्थ बडबडीतून किंवा वाद घालण्यातून माझ्या अंतरात केवळ 'गर्व' साठत चालला आहे का?

३. माझ्याकडे येणारी कोणतीही माहिती किंवा ज्ञान पुढे सांगण्याआधी मी 'अभ्यासोनि प्रकटावे' या सूत्राचा अवलंब करतो का? 

४. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' हे ओळखून, मी माझ्या स्वतःच्या मनालाच आरसा बनवून माझ्या 'कथनी आणि करणीतील' फरकाचे आत्मपरीक्षण करण्यास तयार आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...