उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०८
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हितकारी ।।१०८।।
अर्थ : हे मना, सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या वागण्यात बदल घडतो. भगवंताच्या भक्तीबद्दल प्रेम निर्माण होते. एखादी गोष्ट स्वतः आचरण केल्याशिवाय त्याबद्दल बोलू नये. चर्चेतून जेव्हा एखाद्या शंकेचे निरसन होते, तेव्हा ती चर्चा परमार्थाला हितकारक ठरते.
( वाचाळता - व्यर्थ बडबड (करणे ), वाद संवाद - साधकबाधक चर्चा, तुटणे - निकालात निघणे/संपुष्टात येणे )
विवेचन
मागील श्लोकाप्रमाणे या श्लोकातही समर्थांनी सज्जन संगतीचा महिमा सांगितला आहे. इथे सज्जन म्हणजे साधुसंत असाच अर्थ समर्थांना अपेक्षित आहे. कारण आपल्या वागणुकीतील जो बदल समर्थांना अपेक्षित आहे, तो साधुसंतांच्या संगतीतच होऊ शकतो. संतसंगतीचा महिमा अपार आहे. ' आपल्यासारखे करती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी ' असे संतांबद्दल म्हटले जाते. संत म्हणजे परीस आहेत. त्यांच्या संगतीत राहिलो की ते आपल्याला त्यांच्यासारखेच करून टाकतात. वृत्तीत अंतर्बाह्य पालट होतो. पण त्यांच्या संगतीत केवळ देहाने राहून उपयोगी नाही. मनाने आणि बुद्धीने देखील त्यांचेच होऊन राहावे. त्यांच्याशी एकरूप व्हावे. असे झाले म्हणजे आपल्याही वागणुकीत बदल घडतो. आपल्या मनात ईश्वरभक्ती निर्माण होते. ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते. देवाच्या अस्तित्वाबद्दल मनात जी शंका असते, ती नाहीशी होते. रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात येण्याआधी स्वामी विवेकानंदांच्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका होती. पण रामकृष्ण परमहंसाच्या सहवासात येताच ती दूर तर झालीच पण त्यांच्या वृत्तीतही अंतर्बाह्य पालट झाला. अशा प्रकारे जेव्हा बुद्धी संतांच्या चरणी स्थिर होते, तेव्हाच अपेक्षित आणि आश्चर्यकारक असे आंतरिक परिवर्तन घडून येते.
आज खरे साधुसंत कोणाला म्हणावे असा प्रश्न आपल्याला पडतो. भोंदूबाबांचा बाजार भरला आहे. पण ज्यांच्या सहवासात आपल्याला शांती आणि समाधान मिळते आणि आपली ऐहिक सुखाची ओढ कमी होऊन परमार्थाकडे मनाची प्रवृत्ती होते अशा व्यक्तींना संत, सज्जन किंवा साधू म्हणायला हरकत नाही.
संतांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंतरात शांती आणि समाधान वास करीत असते. त्यामुळे व्यर्थ बडबड करून ते आपली शक्ती वाया घालवत नाहीत. ते अत्यंत मोजके आणि हिताचे बोलतात. त्यामुळेच त्यांच्या सहवासात आपल्यामध्ये बदल घडून येतो. ' बोले तैसा चाले ' या उक्तीचे ते मूर्तिमंत उदाहरण असतात. आपण सामान्य माणसे किंवा ज्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला आहे अशी माणसे आपले ज्ञान दाखवण्यासाठी बाष्कळ बडबड करतात. पण त्याप्रमाणे त्यांचे आचरण नसल्याने लोकांना त्यांचे बोलणे ऐकताना कंटाळा येतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, " आचारल्याविण बोलू नये." " क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे "ही उक्ती आपल्याला माहिती आहे. संत सोहिरोबा म्हणतात, " अनुभवाविण मान डोलवू नको रे." सर्व संतांच्या सांगण्यात आणि शिकवणुकीत एकवाक्यता आहे.
श्लोक क्रमांक १०८ ते ११५ या श्लोकांची रचना एक विशेष दृष्टिकोन ठेवून समर्थांनी केली आहे असे वाटते. कारण हे श्लोक वाद आणि संवाद, किंवा चर्चा आणि निरर्थक वाद याबद्दल आपल्याला विशेष मार्गदर्शन करतात. चर्चा किंवा वाद-संवाद आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी असावा. वादासाठी वाद घालू नये. साधुसंतांच्या संगतीत चर्चेतून आपल्या ज्या शंका दूर होतात, त्या आपल्याला परमार्थ मार्गावर पुढे वाटचाल करण्यासाठी हितकारक ठरतात. अर्थात त्यांच्याकडून ज्या शंकांचे निरसन करून घ्यावयाचे त्या शंका परमार्थासंबंधी असाव्यात. कोणतीही शंका मनात ठेवून ईश्वरभक्ती करू नये. त्या शंकांचे निरसन अधिकारी व्यक्तींकडून किंवा गुरूंकडून करून घ्यावे. एकदा का मनातील शंका दूर झाल्या की निःशंक मनाने आपण हरिभक्ती करू शकतो.
स्वसंवाद
१. मी संतांचे विचार किंवा धार्मिक ग्रंथ केवळ माझे ज्ञान वाढावे म्हणून वाचतो, की त्यामुळे माझ्या वागण्यात बदल घडून यावा या हेतूने वाचतो ?
२. संत सोहिरोबांनी म्हटले आहे, "अनुभवाविण मान डोलवू नको रे", मी उगीचच मला सर्व कळते म्हणून मान डोलावतो की नामस्मरणाचा स्वतः अनुभव घेऊन माझी भक्ती दृढ करतो?
३. माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा समाजमाध्यमांवरील चर्चेत मी केवळ माझा अहंकार शमवण्यासाठी 'व्यर्थ वाद' घालत बसतो, की शंकांचे निरसन करणारा 'हितकारी संवाद' साधतो?
४. तुकाराम महाराजांच्या सूत्राप्रमाणे, जर 'बोले तैसा चाले' हेच साधुत्वाचे खरे लक्षण असेल, तर माझे स्वतःचे जगणे माझ्याच बोलण्याशी किती प्रामाणिक आहे? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा