मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १११

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १११ 

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।

हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ।

हिताकारणे बंड पाषांड वारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।१११।।

अर्थ : समर्थ म्हणतात, " हितासाठी जे सत्य आहे ते मी तुला सांगतो. आपल्या हितासाठी तू स्वतःच हितकारक गोष्टींचा शोध घे. धर्माच्या विरुद्ध असणारे पाखंडी किंवा नास्तिक विचार बाजूला सार. ज्या चर्चेतून शंकांचे निरसन होते अशी चर्चा किंवा संवाद हितकारक असतो."

( हिताकारणे - आत्महितासाठी, बंड - विचारातील विरोध, पाषांड - देव व धर्म विरोधी वागणे किंवा नास्तिकता, वारणे - दूर सारणे )

विवेचन 

आत्मतत्वाचा शोध घेणे किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणे हे प्रत्येक मनुष्याचे ध्येय असले पाहिजे असे समर्थांचे सांगणे होते. हेच आपल्या हिताकरिता त्यांनी सांगितलेले सत्य. परंतु काही लोक हे खरोखरच आपल्या हिताचे आहे यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. म्हणून समर्थ म्हणतात की या गोष्टीचा तू स्वतःच शोध घे. त्यासाठी सर्व मार्गांचा वापर कर. साधू संत काय सांगतात किंवा ग्रंथांमध्ये काय म्हटले आहे हे तपासून पहा. एखादी गोष्ट माणूस जेव्हा स्वतः समजून घेतो, तेव्हा त्यावर त्याचा जास्त विश्वास बसतो. म्हणून समर्थांनी मी सांगतो तेवढेच खरे असे न मानता तुम्ही स्वतःच सत्याचा शोध घ्या असा कळकळीने उपदेश केला आहे. 

राम लक्ष्मणादि भावंडांचे गुरु वसिष्ठांच्या आश्रमातील शिक्षण जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा त्यांना निरोप देताना ते म्हणाले," मी माझ्याजवळ असणारे सर्व ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या आयुष्यात मी सांगितलेले तेवढेच खरे असे मानून चालू नका. तुमच्या विचारांना आणि विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे वागा." वसिष्ठांसारखी किंवा समर्थांसारखी अधिकारी व्यक्ती जेव्हा असे म्हणते, तेव्हा आपण तर सामान्य माणसे ! आपल्या ज्ञानाचा उगीच गर्व करण्यात काय अर्थ आहे ? त्यामुळे अशा व्यक्ती जे सांगतात त्यामागे त्यांची साधना असते. सांगण्याचा अधिकार असतो. ' आधी केले मग सांगितले ' अशा या व्यक्ती असतात. 

सत्याची एक वेगळी व्याख्या महाभारतात फार छान आहे. जे हितकारक आहे, ते सत्य असे त्यात म्हटले आहे. एखादी गोष्ट आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी घातक आहे असे जेव्हा आईला वाटते, तेव्हा ती त्याला ते देत नाही. तुझे पोट दुखेल, दात किडतील असे सांगून त्याला ती तो पदार्थ देत नाही. इथे तिचे बोलणे असत्य जरी असले तरी तिच्या मुलासाठी ते हितकारक आहे. काही वेळा कटू बोलणे आपल्या हितासाठी असते. परंतु आजच्या काळात जेव्हा गोड बोलून किंवा वेगळ्या प्रकारे ट्विस्ट करून एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा मात्र ती आपल्या हिताची असेलच असे नाही. टीव्ही वरील मालिकांतून नको त्या गोष्टी नकळत आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच सत्य काय आहे हे आपणच तपासून घ्यायला हवे. 

आपण सामान्य माणसे मात्र व्यवहारात बुद्धिभेद करणाऱ्या माणसांच्या वक्तृत्वाला भुलून आपल्या साधुसंतांनी सांगितलेल्या मौल्यवान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशा माणसांच्या नास्तिक, पाखंडी विचारांचा स्वीकार करतो. आपल्याच चांगल्या गोष्टींवर टीका करू लागतो. त्यातून द्वेष तयार होतो. माणूस आपले नीतीधर्माचे आचरण सोडून देतो. क्षुद्र विकार, वासनांना बळी पडतो. काही रूढी, परंपरा कालबाह्य झाल्या असतील, काही गोष्टी चुकीच्याही असतील. पण सगळ्याच गोष्टी कालबाह्य किंवा टाकाऊ झालेल्या नसतात. अर्थात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यामुळे सामान्य माणसांची मात्र दिशाभूल होते, गोंधळ उडतो. म्हणूनच समर्थांनी आपल्या हितासाठी अशा विचारांना दूर सारून सत्य काय आहे ते जाणून घ्या असे सांगितले आहे. 

स्वसंवाद 

१. संतांनी किंवा गुरूंनी सांगितले म्हणून मी आंधळेपणाने विश्वास ठेवतो, की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या विवेकबुद्धीने 'हितकारक गोष्टींचा शोध' घेण्याचा प्रयत्न करतो ? 

२. महाभारतातील सूत्राप्रमाणे, माझे बोलणे केवळ वरवरचे 'गोड' असते की ते समोरच्या व्यक्तीच्या आणि माझ्या स्वतःच्या 'परम हिताचे' (सत्य) असते ? 

३. टीव्ही, मोबाईल किंवा समाजमाध्यमांवरील आकर्षक वक्तृत्वाला भुलून, मी माझ्या संस्कृतीतील चांगल्या आणि सात्त्विक विचारांकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना ? 

४. मनातल्या शंका दूर करून निःशंक होण्यासाठी मी व्यर्थ वाद घालतो, की एखाद्या अधिकारी व्यक्तीशी माझ्या आत्महितासाठी 'हितकारक संवाद' साधतो? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२९/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...