उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११२
जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।
परी वाद वेवाद तैसा चि ठेला ।
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।११२।।
अर्थ : अनेक वर्षांपासून जगात हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि ऐकल्या जातात. पण एवढे होऊनही वादविवाद निर्माण करणारे मतभेद कायमच आहेत. संशयापोटी निर्माण होणारा वाद हा अहंकार वाढवणारा असतो. ज्या संवादातून शंका फिटून काही तत्व हाती लागते असा संवाद हितकारक असतो.
( ठेला - तसाच राहिला, दंभ - व्यर्थ अहंकार/अभिमान )
विवेचन
या श्लोकात मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. आपण अनेक वर्षांपासून चांगल्या हितकारक गोष्टी ऐकत आलो आणि सांगतही आलो. संतांनी समाजाच्या आणि आपल्या हितासाठी आपले सारे आयुष्य झिजवले. ग्रंथातून, प्रवचनातून आपले विचार आपल्यापर्यंत पोचवले. परंतु दुर्दैव हे आहे की एवढया सगळ्या खटाटोपानंतर देखील आपल्या शंका आणि वादाचे विषय कायम राहिले. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, तुकाराम गाथा यासारख्या अनेक ग्रंथांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. हे अक्षर वाङ्मय आहे. या ग्रंथांमध्ये एवढे ज्ञान आहे की खरे तर कोणत्याही शंकाच शिल्लक राहायला नको.
खरी ज्ञानी माणसे नम्र असतात पण मी विद्वान आहे या जाणिवेतून अहंकार जन्मतो. मला सगळेच माहिती आहे या जाणिवेतून संतांनी जे काही हितकारक सांगितले त्याबद्दल संशय निर्माण होतो. ईश्वर आहे हे कशावरून, पुनर्जन्माचा काही पुरावा आहे का, ईश्वराला कोणी पाहिले आहे का ...वगैरे वगैरे अनंत गोष्टींबद्दल मानवी मनात संशय अनंत काळापासून आहे आणि तो तसाच राहणार आहे. शंका असणे रास्त आहे, चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या अधिकारी माणसाकडून किंवा वर उल्लेख केलेल्या ग्रंथातून जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते, त्यावेळी निःशंक मनाने ' राघवाच्या अनंत पंथावर ' चालण्यास सुरुवात करावी.
बऱ्याच माणसांची प्रवृत्ती अशी असते की संतांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा एखादी संशयाची सुई त्यांच्या मनात जास्त घर करून बसते. मग आपल्या हिताचे कळूनही त्यांना त्या मार्गाने जाण्याची बुद्धी होत नाही. अशा लोकांच्या बाबतीत ' पालथ्या घड्यावर पाणी ' ही म्हण सार्थ ठरते. सगळे समजते आहे पण पोकळ दंभ किंवा अहंकार त्यांना या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करतो. "मी जप करू ? कीर्तनाला जाऊ ? छे ! छे ! मी एवढा विद्वान ! मला इतकी माहिती आहे ! मग लोक काय म्हणतील ?" यासारख्या खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना अशा व्यक्तींना परमार्थ मार्गावर चालण्यासाठी प्रतिबंध करतात.
परंतु समाजमान्यता असणाऱ्या काही विद्वानांनी बुद्धिभेद केला की सर्वसामान्य माणसे देखील गोंधळतात. मग अशी माणसे राम आणि कृष्ण यासारख्या वंदनीय महापुरुषांच्या चरित्रात देखील दोष दाखवतात. राम आणि कृष्णासारख्या महापुरुषांनी आपल्या जीवनकार्यातून कोणता महत्वाचा संदेश दिला आहे याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. या सगळ्या गोंधळात आपल्याला आपल्या आत्मतत्वाचा शोध घ्यायचा आहे ही मूळ गोष्ट ते विसरतात. वादविवाद कुठे होत नाहीत असे नाही पण जिथे मूळ तत्वाचा शोध घेण्यापेक्षा आपल्या अहंकाराला जास्त जोपासले जाते असा वाद काय कामाचा ? ज्यातून काही जीवनोपयोगी तत्व गवसते आणि मन परमार्थ मार्गाकडे ओढ घेते असा सुखसंवाद महत्वाचा असेच समर्थांना यातून सांगायचे आहे.
स्वसंवाद
१. अनेक वर्षांपासून संतांचे विचार, ग्रंथ आणि निरूपण 'ऐकून व वाचूनही' माझे आयुष्य 'पालथ्या घड्यावर पाणी' या म्हणीसारखेच कोरडे राहिले आहे का?
२. "मी एवढा शिकलेला, मी नाम कसे घेऊ?" अशा प्रकारच्या कुठल्यातरी पोकळ दंभामुळे (अहंकारामुळे) किंवा खोट्या प्रतिष्ठेमुळे मी स्वतःला आत्महितापासून दूर ठेवत नाहीये ना?
३. महापुरुषांच्या किंवा संतांच्या चरित्रातील आणि विचारांमधील केवळ 'दोष' शोधण्यात मी माझी बौद्धिक ऊर्जा वाया घालवतो, की त्यांच्याकडून 'जीवनोपयोगी तत्त्व' शिकण्याचा प्रयत्न करतो?
४. मनात शंका असणे स्वाभाविक आहे, पण ग्रंथांच्या वाचनातून किंवा अधिकारी व्यक्तींच्या 'सुखसंवादातून' उत्तर मिळाल्यावर, मी निःशंक मनाने भक्तीच्या मार्गावर चालण्यास सुरुवात करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा