मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ११०

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११० 

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । 

विवेके अहंभाव यातें जिणावे ।

अहंतागुणे वाद नाना विकारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।११०।।

अर्थ : ज्या चर्चेतून शंकेचे किंवा संशयाचे निराकरण होते त्या चर्चेला संवाद म्हणावे. विवेकाच्या साहाय्याने अहंकारावर मात करावी. अहंकारामुळे नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. ज्या संवादातून वाद किंवा शंकेचे निराकरण होऊन काही तत्व हाती लागते, अशी चर्चा हितकारक समजावी. 

( अहंभाव - अहंकार, अहंतागुणे - अहंकारामुळे, जिणावे - जिंकावे ) 

विवेचन 

मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात असे अनेक प्रसंग उद्भवतात की ज्यामुळे त्यांच्या मनात शंकांचे वादळ निर्माण होते. आध्यात्मिक जीवनात तर माणसे अनेक शंका मनात ठेवून वावरत असतात. जेव्हा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून या शंकांची समाधानकारक उत्तरे मिळतात, तेव्हा त्यातून काहीतरी मौलिक मार्गदर्शन मिळते. काहीतरी तत्व किंवा सार हाताशी लागते. अशी चर्चा जेव्हा होते तेव्हा तिला ' संवाद ' म्हणता येईल असे समर्थ म्हणतात. अशी चर्चा किंवा संवाद तेव्हाच होऊ शकतो जेव्हा दोन्ही पक्षातील मंडळी चर्चेतील व्यक्तींपेक्षा मुद्द्यांना अधिक महत्व देतात. जेव्हा विषयापेक्षा व्यक्तींना अधिक महत्व प्राप्त होते, तेव्हा चर्चेत संवाद न होता वादच जास्त होतात आणि फारसे काही हाती लागण्याची शक्यता कमी असते. चर्चा करण्याचा अहंभाव जेवढा जास्त, तेवढी ती चर्चा ' संवादाच्या ' पातळीवर न राहता वादाच्या पातळीवर उतरते. 

अहंकारी व्यक्तींची बुद्धी चंचल असते. त्यांचे चित्त चर्चेतील मुद्द्यांवर एकाग्र होत नाही. आपलेच म्हणणे खरे करण्याच्या मागे अशा व्यक्ती असतात. असा अहंकार जिंकण्याचा काही मार्ग आहे का ? याचे उत्तर समर्थ पुढील ओळीत देतात. ते म्हणतात विवेकाने अहंकाराला जिंकावे. विवेक म्हणजे काय योग्य, काय अयोग्य याचे भान आणि ज्ञान असणे. विवेकी व्यक्ती दुसऱ्याचे मत सुद्धा काळजीपूर्वक ऐकतात. आपले जर कुठे चुकत असेल, तर त्यात दुरुस्ती करण्याची किंवा आपल्या विचारात बदल करण्याची त्यांची तयारी असते. 

म्हणून व्यक्तींना गौण स्थान असावे आणि चर्चेच्या विषयाला अधिक महत्व दिले गेले पाहिजे. पण बरेचदा असे होत नाही. संवादात भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या मनात स्वतःबद्दल, स्वतःच्या ज्ञानाबद्दल अहंकार असतो. अशा वेळी चर्चेतून काही तत्व हाती न लागता समोरच्या व्यक्तीचा द्वेष, मत्सर, तिरस्कार इ. प्रकारचे नाना विकार निर्माण होतात. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा समाजाने संन्याशाची मुले म्हणून छळ केला आणि वाळीत टाकले होते. आळंदीच्या विद्वानांना स्वतःच्या ज्ञानाबद्दल प्रचंड अहंकार होता. सुरुवातीला विठ्ठलपंतांनी केलेला युक्तिवाद किंवा नंतर ज्ञानेश्वरांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत ते नव्हतेच. अशा परिस्थितीत संवाद शक्यच नव्हता. तेव्हा ज्ञानेश्वरांना आळंदीच्या पंडितांनी पैठणहून शुद्धिपत्र आणायला सांगितले गेले. पैठणच्या विद्वानांसोबत त्यांची धर्मशास्त्रावर चर्चा झाली. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी पशु-पक्षी, प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये एकच आत्मतत्व असल्याचे प्रतिपादन केले. सुरुवातीला त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही परंतु जेव्हा ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून दाखवले, तेव्हा तेथील पंडितांना त्यांच्या सांगण्याची खात्री पटली. या चर्चेच्या वेळी सुरुवातीला तेथील पंडितांमध्ये स्वतःच्या ज्ञानाबद्दल अहंकार होता. पण ज्ञानेश्वरांनी अत्यंत नम्रपणे चर्चेच्या विषयाला अधिक महत्व देऊन आपला मुद्दा पटवून दिला. या चर्चेतून माणूस आणि इतर प्राणी यांच्यात एकच आत्मतत्व विद्यमान असल्याचा निष्कर्ष हाती लागला. ही चर्चा निकाली निघाली. हा विवेक आणि नम्रतेने अहंकारावर मिळवलेला विजय होता. असा संवाद हितकारक असतो असे समर्थांना सांगायचे आहे. 

अशा प्रकारच्या चर्चा कौटुंबिक किंवा सामाजिक संवादासाठी देखील उपयुक्त आहेत. त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण अधिक निकोप राहू शकेल. पण इथे वाद, संवाद यांचा हेतू अध्यात्म मार्गातील साधकांच्या शंका निवारण व्हाव्यात आणि ते परमार्थ मार्गावर अग्रेसर व्हावेत हा आहे. इतर व्यावहारिक चर्चा किंवा वादविवाद इथे अपेक्षित नाही. 

स्वसंवाद 

१. एखाद्या चर्चेत भाग घेताना माझा हेतू समोरच्या व्यक्तीला 'चुकीचे ठरवून स्वतःचा अहंकार सुखावणं' हा असतो, की विषयातील सत्य जाणून घेण्याचा असतो ? 

२. "विवेके अहंभाव यातें जिणावे" या समर्थांच्या सूत्राप्रमाणे, जर माझे कुठे चुकत असेल तर मी माझे विचार बदलण्याची किंवा माझी चूक मान्य करण्याची नम्रता दाखवतो का ? 

३. माझ्या बोलण्यामुळे किंवा वाद घालण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्या मनात नकळत समोरच्या व्यक्तीबद्दल द्वेष, मत्सर किंवा तिरस्कार यांसारखे 'नाना विकार' तर निर्माण होत नाहीत ना ? 

४. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा अभिमान बाजूला ठेवून सर्वांभूती एकच आत्मतत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो का ?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२९/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...