उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०९
जनीं वाद वेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं सूखसंवाद सुखें करावा ।
जगीं तो चि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।१०९।।
अर्थ : वादविवाद किंवा व्यर्थ चर्चा करणे सोडून द्यावे. ज्यामुळे संवाद हा सुखसंवाद होईल अशा प्रकारे चर्चा करावी. अशा सुखसंवादामुळे मनाचे ( शोक, संताप आदी )क्लेश दूर होतात. ज्यामुळे वादाचे किंवा शंकेचे निरसन होऊन परमार्थ मार्गावर चालणे सुकर होते, अशी चर्चा किंवा संवाद हितकारक असतो.
वादविवाद - उलटसुलट प्रश्नोत्तरे /निरर्थक चर्चा, सुखसंवाद - मनाला समाधान देणारी चर्चा )
विवेचन
आधीच्या श्लोकात समर्थांनी संत, सज्जनांच्या सहवासात राहिल्याने आपल्या अंतरंगात जो बदल होतो तो परमार्थ मार्गावर चालण्यासाठी आपल्याला अत्यंत उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे संतांशी निरर्थक वाद घालू नये असे सांगितले. या श्लोकामध्ये ते कोणता वाद किंवा चर्चा आपल्यासाठी हितकारक आहे ते सांगत आहेत. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. त्यामुळे इतर प्राण्यांसारखे केवळ आहार, भय, मैथुन आणि निद्रा एवढ्याच गोष्टी त्याला जीवन जगण्यासाठी पुरेशा होत नाहीत. काहीतरी बौद्धिक खाद्य मिळाल्याशिवाय त्याची बौद्धिक भूक भागत नाही. जेव्हा मनुष्य परमार्थ मार्गावर वाटचाल करायची ठरवतो, तेव्हा अनेक शंका त्याच्या मनात घर करून असतात. एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून त्या शंकांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, तोपर्यंत अध्यात्म मार्गात त्याची प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील शंका दूर होऊन आपल्याला मार्गदर्शन मिळावे या हेतूने आपण गुरूंकडे जातो.
परंतु काही लोकांचा स्वभाव व्यर्थ वाद घालण्याचा असतो. अशा लोकांच्या वाद घालण्यात ज्ञानाची जिज्ञासा कमी आणि आपले ज्ञान दाखवण्याची वृत्ती जास्त असते. गुरूंकडे गेल्यावरही त्यांच्या या वृत्तीत बदल होत नाही. पण जे खरे संत असतात, ते फार बोलत नाहीत. ते साधकांच्या जिज्ञासेचे योग्य प्रकारे समाधान करतात. त्यातूनच साधकाने योग्य तो बोध घ्यायचा असतो.
अशा प्रकारची उदाहरणे समर्थ रामदास, स्वामी समर्थ किंवा गजानन महाराज यांच्या चरित्रात वाचायला मिळतात. ज्या विद्वान किंवा पंडितांना आपल्या ज्ञानाचा गर्व होता, त्यांचा गर्व त्यांनी हरप्रकारे उतरवला आहे. मंडन मिश्रा हे अत्यंत विद्वान होते. ते निरनिराळ्या पंडितांशी वाद घालून त्यांना चर्चेत हरवत असत. परंतु शंकराचार्यांबरोबर झालेल्या चर्चेत त्यांच्या ज्ञानाचा अहंकार गळून पडला आणि ते पुढे शंकराचार्यांचे अनुयायी झाले. अशी अनेक उदाहरणे संत चरित्रात आपल्याला सापडतात.
अशा चर्चांमधून जेव्हा शंकांचे निरसन होते, काहीतरी सार हाती लागते तेव्हा मनातील शोक, संताप आदी व्याधी साहजिकच दूर होऊन मन समाधानी होते, तृप्त होते. कोणत्याही शंका शिल्लक राहत नाहीत. असे निःशंक झालेले मन मग परमार्थ मार्गावर अधिक चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकते. पण ज्यांना केवळ वादच घालायचा असतो, अशा लोकांबरोबर केलेल्या चर्चा या शोक संतापाचे कारण ठरतात. शाब्दिक हमरातुमरी होऊन बरेचदा चर्चा हातघाईवर येते अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. अनेक संघटनांच्या, पतसंस्थांच्या किंवा गृहनिर्माण सोसायट्यांच्या वार्षिक सभांमध्ये वाद वाढत जाऊन अगदी हाणामारीची वेळ येते. अशा वेळी शोक आणि संताप या मानसिक क्लेश देणाऱ्या गोष्टी उद्भवतातच.
' वादे वादे जायते तत्वबोध: ' असे आपण म्हणतो. ज्या वादातून किंवा चर्चेतून काहीतरी आवश्यक किंवा हितकारक असे तत्व हाती लागते अशाच चर्चा साहजिकच हितकारक ठरतात. अशा चर्चांना समर्थांनी ' सुखसंवाद ' असा अतिशय सुंदर शब्द वापरला आहे.
असा सुखसंवाद जेव्हा होतो, तेव्हा तो अतिशय हितकारक ठरून साधकाला परमार्थ मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शक होतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या आश्रमात त्यांचे आणि शिष्यांचे असे ' सुखसंवाद ' होत असत. त्यातूनच पुढे राम, कृष्ण यांच्यासारखे शिष्य निर्माण झाले. अशा शिष्यांनी आपल्या वागण्याने आदर्श निर्माण करून संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन केले.
स्वसंवाद
१. मी चारचौघांत किंवा समाजमाध्यमांवर जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा करतो, तेव्हा त्यात माझा हेतू केवळ 'माझे ज्ञान दाखवून वाद जिंकण्याचा' असतो, की काहीतरी चांगले शिकण्याचा असतो?
२. संतांचे ग्रंथ वाचताना किंवा ज्येष्ठांशी बोलताना माझ्या मनात 'जिज्ञासा' असते, की मी केवळ माझेच मत खरे करण्यासाठी 'तर्क-कुतर्क' लढवत राहतो?
३. माझ्या घरातील किंवा कार्यालयातील चर्चा बऱ्याचदा 'शोक-संताप' वाढवणाऱ्या वादात बदलतात, की मन शांत करणारा 'सुखसंवाद' ठरतात?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, मनातल्या शंकांचे वेळीच योग्य व्यक्तींकडून निरसन करून घेऊन, मी 'निःशंक' मनाने परमार्थ मार्गावर चालावे असे मला वाटते का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/६/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा