मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास - भाग चार

उगवतीचे रंग 

उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास - भाग चार 

आजचा आमच्या सहलीचा पाचवा दिवस होता. कौसानीच्या निसर्गरम्य परिसराचा आज आम्हाला निरोप घ्यायचा होता. निघण्यासाठी मन राजी नव्हते. पण सहलीच्या नियोजित कार्यक्रमानुसार निघावेच लागणार होते. पहाटे लवकर उठून परत एकदा कौसानीचा सुंदर सूर्योदय अनुभवला. ती दिव्य पहाट नेत्रात साठवली. निसर्गातील भव्यतेत आणि सौंदर्यात आपल्याला परमेश्वराचाच साक्षात्कार होत असतो. विविध रूपात तो प्रकट होत असतो. फक्त तो अनुभवता आला पाहिजे. हॉटेल सुमन रॉयल रिसॉर्टच्या खाली असलेल्या बागेत आम्ही परत एक फेरफटका मारला. सहकाऱ्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. नाश्ता घेतला आणि तयार होऊन बसमध्ये बसलो. आज आम्ही रानीखेत या ठिकाणी भेट देऊन पुढे जिम कॉर्बेटला जाणार होतो. आजही दिवसभर प्रवासाची तयारी ठेवावी लागणार होती. 

डोंगरातील अरुंद पण निसर्गरम्य रस्त्यातून वाट काढत बस भराभर रानीखेतच्या दिशेने वाटचाल करीत होती. वेळोवेळी आमच्या बस चालकाचे कुशल सारथ्य निदर्शनास येत होते. कौसानी ते रानीखेत अंतर साधारणपणे ५८ किमी असले तरी डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांमुळे तिथे पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. राणी पद्मिनी हिच्या नावावरून रानीखेत हे नाव पडल्याचे सांगितले जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे ६००० फूट उंचीवर वसलेले हे  एक शांत आणि निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे. उत्तराखंड मधील अलमोडा जिल्ह्यात ते आहे. 

इथे कुमाऊं रेजिमेंटचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात उंचीवरील उपट गोल्फ कोर्स हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे. आम्ही गेलो त्या दिवशी मात्र काही कारणाने हे गोल्फ कोर्स बंद होते. त्यामुळे आम्हाला ते पाहता आले नाही. परंतु आमच्या विनंतीनुसार बसने या गोल्फ कोर्स मैदानाला एक फेरी मारली. त्याचा परिसर अतिशय भव्य आणि विशाल असल्याचे त्यातून लक्षात आले. 

रानीखेतला त्याचे एक आगळेवेगळे सौंदर्य आहे. सर्वत्र सुंदर हिमालयाच्या शिखरांचे दर्शन घडते. देवदार, बलुत आदी उंचच उंच वाढलेले वृक्ष आपले स्वागत करतात. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. झुलादेवी, मनकामेश्वर, बालाजी आदी मंदिरे आहेत. आम्ही येथील कुमाऊं रेजिमेंट सेंटरला भेट दिली. १९७० च्या दशकात स्थापन झालेले हे एक युद्ध संग्रहालय आहे. येथे कारगिल युद्धाशी संबंधित गोष्टी, कागदपत्रे, ऐतिहासिक शस्त्रे, नाणी आदी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कुमाऊं रेजिमेंट मधील आपले शूर सैनिक आणि अधिकारी यांची शौर्यगाथा या ठिकाणी आपल्याला वाचायला, बघायला मिळते. ते पाहिल्यानंतर ऊर अभिमानाने भरून येतो. 

हे पाहून झाल्यानंतर आम्ही जिम कॉर्बेटच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी जेवणाचा आनंद घेतला. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही जिम कॉर्बेटला पोहोचलो. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रामनगर या शहराजवळ हा जिम कॉर्बेट पार्क आहे. इथे आमचा मुक्काम द बनियान रिट्रीट या आलिशान हॉटेलमध्ये होता. या हॉटेलचा परिसर अत्यंत विशाल आणि भव्य आहे. अनेक इमारती आहेत. राहण्याच्या खोल्या, जेवणाचे हॉल, लॉन्स इ.गोष्टी अत्यंत देखण्या आणि प्रेक्षणीय आहेत. इथे पोहोचल्यावर हे सगळे वातावरण पाहूनच आमचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी जेवणाच्या हॉलमध्ये एकत्र आलो. तो दिवस होता २३ एप्रिलचा. योगायोगाने याच दिवशी माझा वाढदिवस होता. आमचा टूर मॅनेजर अक्षय आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र येऊन मला शुभेच्छा दिल्या. एका आगळ्यावेगळ्या वातावरणात वाढदिवस साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच जिम कॉर्बेटच्या जंगल सफारीसाठी जायचे होते. जिम कॉर्बेटचे जंगल कसे असेल, तिथे कोणते प्राणी दृष्टीस पडतील या गोष्टींची उत्सुकता होतीच. या विचारात केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. ( क्रमशः )

Ⓒविश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१२/५/ २०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...