मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ३२

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३२

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली| पदी लागता दिव्य होऊन गेली |

जया वर्णिता शीणली वेदवाणी |नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३२|

अर्थ 

श्रीरामांच्या पदाचा स्पर्श होताच शिळा झालेली शापित अहिल्या मुक्त झाली. त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशा या भगवंताचे वर्णन करताना वेद सुद्धा शीणले आहेत म्हणजे थकले आहेत किंवा त्याचे वर्णन ते करू शकत नाहीत. असा हा अहिल्येचा उद्धार करणारा भगवंत आपला देखील उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.

विवेचन 

या श्लोकांमध्ये समर्थ भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करत आहेत आणि आपल्या भक्तांना तो कशाप्रकारे तारतो हेच यातून आपल्या मनावर ठसवत आहेत. आधीच्या श्लोकामध्ये भगवान रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले असे समर्थांनी सांगितले. या श्लोकात श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा कसा उद्धार झाला ही गोष्ट ते आपल्याला सांगत आहेत.

अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अत्यंत रुपवती आणि शीलवती होती तसेच ती महान साध्वी आणि पतिव्रता होती. इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात आला. परंतु काही कथांनुसार इंद्राने तिचे शीलभ्रष्ट करण्याआधीच अहिल्येने त्याला ओळखले आणि तो परत फिरला. तर काही कथांनुसार इंद्राच्या कृत्याला ती बळी पडली आणि तिचे पातिव्रत्य भंग झाले असे म्हटले जाते. याच सुमारास गौतम ऋषी आपल्या आश्रमात परत आले आणि त्यांना अहिल्येच्या पातिव्रत्यावर संशय आला आणि त्यांनी तिला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला. वास्तविक हे सगळे जे काही घडले यात अहिल्येचा काहीही दोष नव्हता.

खरंतर मूळ वाल्मिकी रामायणात गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिल्याची आणि ती शिळा होऊन पडल्याची नोंद नाही. तुलसी रामायणात आणि इतरही अनेक ठिकाणी मात्र ही कथा सांगितली गेली आहे. 

समर्थांनी मूळ वाल्मिकी रामायणाचा बारकाईने अभ्यास केला होता. अशा प्रकारची घटना त्यात नाही हे माहीत असताना देखील ते या ठिकाणी त्या घटनेचा उल्लेख करतात. त्याचे कारण म्हणजे ही घटना सर्वांनी स्वीकारली आहे. दुसरी म्हणजे ती रामाची महती सांगणारी आहे. समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी कोणतीही गोष्ट असेल तरी त्यांना ती मान्य होते.

श्रीराम हे पतितांना पावन करणारे होते. अहिल्येला इतरांनी जरी शीलभ्रष्ट मानले तरी श्रीरामांनी तिचा तिरस्कार कधी केला नाही. आणि तिला आपल्या पदस्पर्शाने पावन करून तिचा उद्धार केला. या साध्वीचे नाव अत्यंत आदराने पाच पतिव्रतांमध्ये घेतले जाते. 

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा 

पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनं 

तेव्हा जो भगवंत शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार करतो, तो आपला सुद्धा उद्धार करेल हा विश्वास समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात.पतितांना पावन करणारा असा हा भगवंत आहे त्याच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा कमी पडतात. त्याचे गुण वर्णन करताना ते थकतात. अशा या परमेश्वराची भक्ती जर आपण मनापासून केली तर तो आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी समर्थ आपल्याला देतात. म्हणून प्रत्येकाने एकाग्रतेने आणि मनापासून श्रीरामांची भक्ती करावी. मग तो आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगी सोबत राहील. संत तुकारामांना असा अनुभव आला होता म्हणूनच ते " जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं म्हणतात."

स्वसंवाद 

१) अहिल्येचा दोष नसताना तिला शाप मिळाला. माझा दोष नसताना माझ्या आयुष्यातही असे अन्यायकारक प्रसंग आले तर माझी परमेश्वरावरील श्रद्धा टिकून राहते का ?

२) श्रीरामांनी इतरांनी तिरस्कारलेल्या अहिल्येचा स्वीकार केला. मी माझ्या जीवनात अशा उपेक्षित व्यक्तींशी कसा वागतो ?

३) "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" अशी माझ्या दैनंदिन व्यवहारात मला भगवंताची सोबत जाणवते का (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२७/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा


टिप्पण्या