मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ३०

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३०

समर्थाचिया सेवका वक्र पाहे |

असा सर्व भूमंडळी कोण आहे ? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०|

अर्थ 

एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.

विवेचन 

"नुपेक्षी कदा राम दासाभिमानी"या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे. 

सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा निस्सीम भक्त हनुमान याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूया. 

हनुमंत रामाचा सेवक आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो त्याच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या धन्यावर म्हणजे मालकावर ज्याची प्रचंड निष्ठा आहे. असा सेवक म्हणजे हनुमंतराय !मग साहजिकच अशा सेवकावर मालकाचे देखील प्रेम असणारच ! 

सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीराम हनुमंताला विचारतात की बोल तुझी काय इच्छा आहे ? तेव्हा हनुमंत फक्त त्याची भक्ती मागतात. श्रीराम त्याला उराशी धरतात. आपला लहान बंधू म्हणून आलिंगन देतात केवढे हे प्रेम ! मारुतीरायांची केवढी ही निरपेक्ष सेवा !

समर्थांचा (भगवंताचा ) जो भक्त असतो तो देखील त्यांच्या कृपेने समर्थच होतो. त्यामुळे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नसते. त्याच्यावर संकटे येत नाहीत असे नाही. पण जीवनातील दुःखांना, संकटांना तो धैर्याने सामोरा जातो. हा देह माझा नाहीच. तो भगवंताचा आहे अशी त्याची धारणा झालेली असते. त्याच्या सेवेसाठीच त्याचा उपयोग तो करत असतो. म्हणून देहाला दुःख झाले तरी तो विचलित होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे... अशी त्याची वृत्ती होते.

सेवक व्हावे तर अशा व्यक्तीचे व्हावे जो आपली कधीही उपेक्षा करीत नाही. व्यवहारात चाकरी भलेही कोणाची करा. परंतु सेवक मात्र त्या भगवंताचे व्हा. कसा आहे हा भगवंत ? ज्याचा सेवक आपल्याला व्हायचे आहे ? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही... असे समर्थ म्हणतात. या ठिकाणी लीला म्हणजे चरित्र असा अर्थ घेता येतो. हा भगवंत असा आहे की त्याच्या चरित्राचे, सामर्थ्याचे, पराक्रमाचे गुणगान तिन्ही लोक करतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत त्याच्या पराक्रमाचा डंका वाजतो.

 सर्वसाधारणपणे दास होणे, किंवा सेवक होणे म्हणजे कमीपणाची गोष्ट असे आपण समजतो. परमेश्वर हा असा स्वामी आहे की ज्याचा दास किंवा सेवक होण्यात सुद्धा अभिमान वाटावा, धन्यता वाटावी. एखाद्या अधिकाऱ्याचे किंवा मंत्र्याचे नोकर असलेल्या व्यक्तीला लोक केवढा मान देतात ! ( अर्थात तो तात्पुरता असतो हा भाग वेगळा )परंतु तो नोकर त्या अधिकाऱ्यापर्यंत किंवा मंत्र्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो, म्हणून आपण त्याला मान देतो. मग भगवंताचा जो सेवक असेल त्याचा मान केवढा ! त्याचे वर्णनच करता येणार नाही.

 एकदा का आपण त्याचे सेवक झालो की तो आपली कधीही उपेक्षा करत नाही. सेवक म्हणजे भगवंताचा भक्त ! खरा भक्त भगवंताकडून काही हवे म्हणून भक्ती करीत नाही. तर मला भगवंत हवा आहे, त्याच्याशिवाय दुसरे काही नको अशा समर्पण भावनेने त्याची भक्ती असते. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त ! असा सेवक, असा भक्त जो असतो, त्याची सुखदुःखे, काळजी, चिंता आपोआप कमी होत जातात. म्हणजे त्याला त्याची पर्वा नसते. भगवंत त्याची काळजी वाहतो. भगवंताच्या नामात तो रंगून गेलेला असतो. अशा या भगवंताकडे भक्ताकडे भगवंत देखील लक्ष ठेवून असतो. तो त्याची उपेक्षा करीत नाही. त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी ज्याची खात्री असते तो निर्भयपणे जीवन जगू शकतो. लोकांनी स्तुती केली किंवा निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांपासून असा भक्त कोसो दूर असतो. आपल्या कर्तव्यात रत असताना त्याची आठवण ठेवावी. कर्तेपण आपल्याकडे न घेता राम कर्ता आहे, तोच हे करून घेतो आहे ही भावना ठेवावी.

स्वसंवाद 

१) मी भगवंताचा “सेवक” आहे की केवळ “अपेक्षा करणारा भक्त”? 

२) माझ्या भक्तीत निरपेक्षता आहे का, की काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे? 

३) मी माझ्या चिंता खरोखरच परमेश्वरावर सोपवतो का, की फक्त शब्दांत बोलतो? 

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

 २५/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...