मुख्य सामग्रीवर वगळा

मुगल ए आजम

मुगले आजम - पुस्तक परिचय

डॉ मीना श्रीवास्तव हे नाव माझ्या माहितीनुसार बहुतेक मराठी वाचकांना परिचित आहे. त्यांची लेखनशैली आवडणारे अनेक वाचक आहेत. माझ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांवर त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेत परीक्षणे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे माझ्या लेखावर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया वाचक वर्गाची दाद घेऊन गेल्या आहेत. माझ्या ' रामायण महत्व आणि व्यक्तीविशेष' या आणि 'महर्षी वाल्मिकी' या दोन्ही पुस्तकांचे त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच प्रा. हेमंत सामंत यांच्या मराठी लेखांवर आधारित त्यांची दोन हिंदी अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन वाचताना वैद्यकीय व्यवसायात असलेली ही व्यक्ती इतके सुंदर मराठी लेखन करू शकते याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

मुगले आजम म्हणजे काळाच्या पडद्यावर अमिट ठसा उमटवून गेलेली अजरामर कलाकृती. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला असला तरी त्यातील कथा आजही ताजी आणि टवटवीत वाटते. ही प्रेम कथा म्हणजे कलेच्या प्रांतातील सगळ्याच कलाकारांनी पाहिलेले एक भव्य दिव्य स्वप्न असे म्हणता येईल. डॉक्टर मीना श्रीवास्तव यांनी या स्वप्नाचा प्रवास, त्यामागील निर्मिती प्रक्रिया आणि तो तयार होत असताना करावा लागणारा संघर्ष अतिशय सुंदर रीतीने उलगडला आहे. 

खरे म्हणजे एखाद्या चित्रपटावर एखादे सुंदर पुस्तक लिहिले जाऊ शकते ही कल्पनाच मुळात आपल्याला सुखद धक्का देणारी आहे. तेही १९६० मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाबद्दल लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्या काळात जाऊन, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ शोधून त्यांचे हे पुस्तक सिद्ध झाले आहे. त्यांचे हे पुस्तक वाचत असताना आपण थेट त्या काळात जाऊन पोहोचतो. हे भव्यदिव्य स्वप्न साकार करीत असताना निर्माते आणि कलाकार यांच्या मनातील दडलेल्या संवेदना, त्यांनी केलेला त्याग आणि के आसिफ यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक यांच्या जिवापाड केलेल्या प्रयत्नांची माहिती त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

हे पुस्तक पाहताक्षणीच आपले मन आकर्षून घेते. मधुबाला म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य ! मुखपृष्ठावरील आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावरील घुंघट बाजूला करणाऱ्या मधुबालाची आकर्षक छबी आपले मन मोहून घेते. तिचा हसतमुख चेहरा, बोलके डोळे हे चित्र जिवंत करतात. या पुस्तकात या चित्रपटाबद्दल सगळं काही सांगणारी माहितीपूर्ण अशी १५ प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी लेखिकेने दिली आहे. त्यातून तिची पारदर्शकता, प्रामाणिकपणा तर दिसतोच परंतु पुस्तकातील माहितीची अधिकृतता सुद्धा प्रमाणित होते. पुस्तकामध्ये ठिकठिकाणी या चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींची कृष्णधवल छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक बोलके होते.

या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखिकेने अपार कष्ट घेतले आहेत. मुगले आजम या चित्रपटाने लेखिकेच्या मनावर आधीपासूनच गारुड केले होते. परंतु हे पुस्तक लिहायचे ठरल्यानंतर संदर्भ ग्रंथ मिळवणे, आंतरजालावरील माहिती मिळवणे या सगळ्या गोष्टीत त्या कमालीच्या गढून गेल्या आणि जवळपास दोन वर्षे त्या मुगले आजमच्या जगातच मनाने वावरत होत्या याची साक्ष त्यांचे मनोगत वाचल्यानंतर मिळते.

शहजादा सलीम आणि दासी अनारकली तरुण वयामध्ये भेटतात. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते पण हे दोन प्रेमी जीव एकत्र येऊ शकत नाहीत. शहजाद्याचे वडील त्यांच्या प्रेमात भिंत बनून उभे राहतात आणि दोघांचे मार्ग वेगळे होतात. अशी ही खरंतर साधी सोपी कथा. परंतु या कथेमध्ये दिग्दर्शक के आसिफ यांनी इतके सुंदर रंग भरले की ही कथा पडद्यावर जिवंत झाली आणि युगानुयुगे लोकांना ती आठवत राहील अशा प्रकारे तिचे सादरीकरण त्याने आणि इतर कलाकारांनी केले. 

या चित्रपटाचे संगीत आणि गाणी हा सुद्धा एक वेगळ्याच संशोधनाचा आणि लेखनाचा विषय व्हावा इतके ते उच्च दर्जाचे आहे. ती गाणी आजही ताजी टवटवीत वाटतात. या सगळ्या गोष्टींचा मनोरम धांडोळा खास स्वतंत्र प्रकरणातून लेखिकेने घेतला आहे. चित्रपटाचे संगीतकार नौशाद अली यांच्याबद्दलची आणि गीतकार शकील बदायुनी यांच्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती लेखिकेने दिली आहे. लिहिण्याची शैली तर एवढी ओघवती आहे की वाचक उत्सुकतेने पुढे पुढे वाचत जातो.

आधी श्वेतधवल असलेला हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेने नंतर नवरंगात न्हाऊन आला. त्याचप्रमाणे त्याचे रंगमंचीय सादरीकरण देखील झाले. त्या चित्रपटाची ही सगळी रूपे लेखिकेला अपार भावली. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या के आसिफ यांच्या जीवन चरित्रावर लेखिकेने टाकलेला प्रकाशझोत, चित्रपटाला आर्थिक सहाय्य करणारे शापूरजी पालोनजी यांच्या बद्दलची माहिती आपल्याला चित्रपट कसा तयार झाला हे समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत करते.

त्याचप्रमाणे या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयासाठी अमर झालेले पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, निगार सुलताना यांच्यासारख्या कलाकारांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल लेखिकेने फार रोचक शब्दात माहिती दिली आहे. त्यांचे जीवनातील फारसे कोणाला माहीत नसलेले हृद्य प्रसंग सांगितले आहेत. 

या चित्रपटातील संवादांचे सौंदर्य लेखिकेने चित्रपटातील प्रत्यक्ष संवाद देऊन वाचकांच्या नजरेस आणले आहे. त्यामुळे चित्रपटातील कथा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

या चित्रपटाशी संबंधित छोटे-मोठे कलाकार, तंत्रज्ञ, त्यासाठी प्राणपणाने मेहनत करणारी सगळी माणसे या सगळ्यांची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. या चित्रपटाशी संबंधित कुठलीही छोटीशी माहिती देखील दुर्लक्षित होणार नाही याची काळजी हे पुस्तक लिहिताना लेखिकेने घेतलेली दिसते. त्यामुळेच चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे मस्ट रीड असे आहे. 

एकदा हातात घेतल्यानंतर हे पुस्तक सोडवत नाही. लेखन, भाषाशैली, चित्रे, छपाई या सर्व दृष्टीने पुस्तक अत्यंत देखणे झाले आहे. केवळ चित्रपट रसिकांसाठीच नव्हे तर साहित्य आणि कलेचा अभ्यास करणाऱ्या प्रांतातील सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

अशा या सुंदर पुस्तकासाठी मी लेखिका डॉक्टर मीना श्रीवास्तव आणि प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हे पुस्तक वाचकांना नक्कीच एक चांगले पुस्तक वाचल्याची अनुभूती देईल अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१८/३/२०२६

मो. ९४०३७४९९३२




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...