मुख्य सामग्रीवर वगळा

लता अजून गाते...

उगवतीचे रंग

लता अजून गाते...

तसं तर लताचा आज जन्मदिन नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग मी का लिहितो तिच्यावर ? तर माझ्यासाठी ती अजूनही गातच असते. दिवसभरात कानावर तिची कुठली ना कुठली तरी गाणी पडत असतात. त्या माध्यमातून ती माझ्याशी बोलत असते आणि गातही असते. आता तुम्ही म्हणाल की लतासाठी एकेरी शब्द वापरणारा हा कोण शहाणा ? पण खरं सांगू ? आपल्या जवळच्या माणसाला कोणी आहो जाहो करतं का ? आपली आई आपल्याला सगळ्यात जवळची असते. तिला करतो का आपण आहो जाहो ? तशीच आहे लता माझ्यासाठी ! 

खरंतर आज ती आपल्यात नाही. पण असं कधीच वाटत नाही. ती अजूनही गात असते. तिचं कोणतेही गाणं कानावर पडलं की मन त्यात हरवून जातं. ते गाणं पूर्वी जरी ऐकलं असलं तरी आता ते ऐकताना त्यातील नवीन अर्थ, नवीन सौंदर्य प्रतीत होतं. त्यातून ती जणू बोलतच असते माझ्याशी ! हा अबोल संवाद असतो.  आणि बऱ्याच वेळा एकतर्फी. ती बोलत असते आणि मी ऐकत असतो. तो दैवी स्वर, त्यातील भावभावना जिवंत होऊन हृदयाला हात घालतात. ( लताचं लहानपणीच नाव हृदया होतं असं म्हणतात. किती सार्थ नाव ! ) गाणं ऐकताना कधी कधी डोळे नकळत पाणावतात, हातही नकळत जोडले जातात. तिच्या दिव्यत्वाला प्रणाम करण्यासाठी. कोणी असंही म्हणेल की असं कुठे असतं का ? याचं आपलं काहीतरीच ! कोणाला असंही वाटेल की हा वेडा आहे, भावनाप्रधान आहे. पण मला ते मान्य आहे. कुठलं तरी वेड असल्याशिवाय त्यातील आनंद कसा घेता येईल ? परमेश्वराच्या भक्तीत रंगलेल्या अनेकांची अवस्था, संशोधनात गढून गेलेल्या शास्त्रज्ञांची अवस्था  वेड्यासारखीच तर होती. जगाच्या दृष्टीने ते वेडेच होते आणि व्यवहारात कुचकामी. पण अशा अवस्थेमुळेच ते आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू शकले. भक्तांच्या पदरी भक्तीचा आनंद आणि फळ त्यांच्या पदरात पडलं. परमेश्वराची प्राप्ती झाली. शहाण्या आणि व्यवहारी माणसांपासून परमेश्वर बहुधा चार हात लांबच राहत असावा. 

लताच्या आठवणीशिवाय जावा असा एक दिवसही जात नाही. कोणीतरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिची आठवण करून देत असतोच. नाहीतर आपल्या गीतातून ती समोर येतेच. आपण एखादा काम करत असावं आणि  जवळपास हळू आवाजात एखादं गाणं सुरू असावं तसं लताचं एखादं ऐकलेलं गाणं काम करत असताना देखील मनामध्ये बॅकग्राऊंडला वाजत राहतं. त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात. 

 परवा कोणीतरी लतादीदी आणि पुलं देशपांडे यांनी एकमेकांना पाठवलेली पत्रे समाजमाध्यमांवर टाकली होती. या पत्रांनी लतादीदींच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. कधी फारशी शाळेत न गेलेली लता लंडनहून पुलंना किती सुंदर पत्र लिहिते ! त्यांची आपुलकीने चौकशी करते. पुलं तिच्यापेक्षा वयाने मोठे म्हणून पत्राची सुरुवात तिने त्यांना ' चरणस्पर्श 'असं म्हणून केली आहे. 

या पत्राला पुलंनी दिलेले उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणतात की मी वयाने मोठा असल्यामुळे तुला ' चरणस्पर्श ' असे म्हणू शकत नाही. " आणि तुझ्या लक्षावधी गीतातल्या एकाही चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे. पूर्वीचे राजे मुलुख पादाक्रांत करायचे. तू तर सारे जग ' पदाक्रांत ' केले आहे. तुझे हे सार्वभौमत्व चिरकाल टिको हीच इच्छा. " पुलंनी ' चरणस्पर्श ' जरी केला नसला तरी आपल्यासारख्या लाखो वाचकांच्या हृदयाला ' हृदयस्पर्श ' केला आहे इतके त्यांचे पत्र सुंदर आहे ! ते वाचल्यावर लताबाई आणि पुलं समोर असते तर त्यांचा ' चरणस्पर्श ' केल्याशिवाय राहवले नसते. असो. पण तो योग आता नाही. 

पुलंबद्दल सुद्धा रोज काही ना काही तरी समाजमाध्यमांवर येतच असते. कोणी त्यांच्यावरील एखादा लेख टाकतो, कोणी त्यांचे एखादे पत्र प्रसारित करतो, कुठेतरी त्यांच्या बटाट्याची चाळ किंवा सुंदर मी होणार यासारख्या नाटकांचे प्रयोग सुरू असतात. कोणीतरी कुठल्यातरी कार्यक्रमात त्यांच्या पत्रांचे वाचन करत असतो. कोणीतरी अप्रकाशित पुलं कार्यक्रम सादर करतो, कोणाच्यातरी कार मध्ये पुलंच्या कथांचा ऑडिओ सुरू असतो तर कुठेतरी जीए आणि सुनीताबाईंच्या पत्रांचा वाचन सुरू असतं. लतादीदी आणि पुलं सर्वव्यापी आहेत. लतादीदी आणि पुलं यांना चिरंजीवित्वाचा वर मिळाला आहे. त्यांनी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. पुण्यात एकदा रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या एका पुस्तक विक्रेत्याकडे मला पुलंचं रवींद्रनाथ: तीन व्याख्याने हे पुस्तक मिळालं. ते मला एवढं आवडलं की त्यावरून रवींद्रनाथांबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि त्यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच माझं आनंदयात्री रवींद्रनाथ हे पुस्तक जन्माला येतंय.

म्हणूनच म्हणतो की लता, खरं म्हणजे तू आणि पुलं म्हणजे जित्याजागत्या लिजन्ड्स आहात. रोज तुमचा कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठेतरी उल्लेख होतच असतो आणि हो केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ भारतातच राहील तर पुलंच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे तुम्ही दोघांनी जग पादाक्रांत केले आहे. पूर्वी मी बद्रीनाथ केदारनाथ सहल केली होती, तिथे त्या हिमालयातील उंच आणि दुर्गम शिखरांवर तुझे स्वर ऐकू येत होते. एवढेच काय पण गेल्या जूनमध्ये मी स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा तेथील आल्प्स पर्वतावर देखील तुझ्या गीतांचे स्वर कानी पडले. माझा रोम रोम पुलकित झाला. मन अभिमानाने भरून आलं. माझ्यासारख्या तुमच्या भक्ताला अजून काय हवं ! तुम्ही केवळ देश नाही जोडलात, तर विविध देशातील भारतीयांना एका सूत्राने बांधून ठेवलं. एकाने सुरांनी जग जिंकलं तर दुसऱ्याने शब्दांनी !

मी सुरुवातीला म्हटलं ना की तू अजूनही गातेस, माझ्याशी बोलतेस, ते खरंच आहे. अनेक लेखक, गीतकार तुझ्याबद्दल रोज काहीतरी बोलत असतात. अन्नू कपूर, शिरीष कणेकर, सुधीर गाडगीळ किंवा कोणीतरी तुझे किस्से किंवा आठवणी सांगत असतो. रंगोली कार्यक्रमातील निवेदिका तुझ्याबद्दल बऱ्याच वेळा काहीतरी सांगत असते. गावोगावी होणाऱ्या संगीत मैफलित तुझ्या गाण्यांशिवाय आणि आठवणींशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. गायिका आणि संगीतातील तज्ज्ञ असलेल्या मृदुला  दाढे यांच्यासारखं कोणीतरी तुझ्या गाण्यांचं विश्लेषण करीत असतं. ' कांटोसे खींचके ये आचल ' या गाईड चित्रपटातील गीताच्या सुरुवातीचा आलाप लताने कसा म्हटला आहे, आणि तोच किती योग्य आहे हे त्या सोदाहरण स्पष्ट करून सांगतात. पण मला वाटतं गाताना तू स्वतः देखील एवढा विचार कधी केला नसशील कारण तुझं गाणं हे नैसर्गिक होतं. एखाद्या फुलासारखं ते आपोआप आतून उमलून येत होतं. तुझं गाणं म्हणजे एखादी सुंदर कलाकृती ! एखादी सुंदर रांगोळी असावी किंवा एखादा अस्सल सोन्याचा सुंदर घडवलेला दागिना असावा तसं तुझं गाणं ! ज्यांना त्याचं विश्लेषण करायचं आहे त्यांनी ते खुशाल करावं. पण ज्याप्रमाणे परमेश्वर सर्व विश्व व्यापून दशांमुळे उरला आहे असं म्हटलं जातं तशीच तू देखील या विश्लेषणाच्या पलीकडे दशांगुळे उरलेली असतेसच ! 

कवयित्री बहिणाबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या. त्या निरक्षर होत्या असे म्हटले जाते. लौकिक अर्थाने त्या शिकलेल्या नव्हत्या. परंतु त्यांच्या कविता किती सुंदर आहेत ! अनेक शिकलेले लोक त्यांचा आपापल्या परीने अर्थ लावत बसतात. अनेक लोक त्यांच्यावर पीएचडी करतात. तसंच तुझ्या गाण्यांचं आणि संगीताचंही असावं असं मला वाटतं. 

तुझं संगीत म्हणजे खरोखरच नक्षत्रांचं देणं आहे. त्याचं मोल, त्याचं तेज कधीही कमी होत नाही. हे नक्षत्रांचं देणं कितीही वाटलं तरी रिक्त न होणारं. आमचीच ओंजळ अपुरी पडते ते घ्यायला. तुझ्या गीतांबाबत असं म्हणावसं वाटतं की तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. केवळ आयुष्य स्पर्शून नाही गेला तर आयुष्य समृद्ध करून गेला ! तुझ्या गीतांबाबत बोलायचं तर तूच गायलेल्या ' किनारा ' या चित्रपटातील गीताची आठवण येते. ' नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा 

 मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे...!

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१/११/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...