उगवतीचे रंग
स्वातंत्र्याची पहाट
स्वातंत्र्याची पहाट उजळली
सूर्यप्रभा सोनेरी
सडा रांगोळी करून दारी
तिरंगा फडके घरावरी.
दिवाळी दसरा आम्हासाठी
तसाच असे हा स्वातंत्र्यदिन
किंचित झुकवूनी मान तयाला
राष्ट्रध्वजा या करू नमन.
दिवस आजचा अती पवित्र
बांधले तोरण स्वातंत्र्याचे
पत्करले हौतात्म्य ज्यांनी
स्मरण त्या शूरवीरांचे.
देशाने मज काय दिधले
नका विचारू असे कुणी
देशासाठी तन-मन माझे
सदैव त्याचा असे ऋणी.
जगी थोर हा देश माझा
उन्नत ठेवू त्याचा माथा
बलाढ्य असो जरी शत्रू कितीही
आम्हांपुढे त्याची काय कथा.
ही भारतमाता मजला प्यारी
लेकरे तिचीचआम्ही सारी
देहात वसे या प्राण जोवरी
करू गर्वाने तिची चाकरी.
वेदमंत्राहून वंद्य आम्हाला
वंदे मातरम प्रिय असे
कोटी कोटी कंठातून घुमते
मातृगान हे सुंदरसे.
गंगा यमुना कृष्ण कोयना
गाती गीत खळखळते
उज्वल दिव्य परंपरेचे
रक्त नसानसातून सळसळते.
देश रक्षणासाठी सदैव
सिद्ध हिमालयाचे धवल कडे
देशासाठी प्राणही द्याया
पाऊल मराठी पडते पुढे.
या रे यारे सारे यारे
या तिरंग्या ध्वजातळी
नमन करू त्या क्रांतीवीरांना
माती भूमीची लावू भाळी.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५ ऑगस्ट २०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा