मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग चार

उगवतीचे रंग  

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग चार 

भाग तीनमध्ये लंडन शहराचे दर्शन आपण घेतलं. लंडनच्या थेम्स नदीचा नेत्रसुखद नजारा, बेकर स्ट्रीट, बकिंगहॅम पॅलेस, मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम पाहिलं. बर्ड आय व्ह्यू सारखा लंडन आय मधून दिसणारा मनमोहक नजारा न्याहाळला. संध्याकाळी मस्तपैकी क्रूझमधून थेम्सनदीच्या परिसरात भ्रमंती केली. काही गोष्टी बसमधून ओरिएन्टेशन टूरचा एक भाग म्हणून पाहिल्या. हॉटेल मुमताज मध्ये भारतीय पद्धतीचे जेवण घेतलं. खूप काही पाहिलं आणि खूप काही पाहायचं राहिलं ही काहीशी सुखद आणि काहीशी हुरहूर लावणारी भावना सोबत घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच लंडनला बाय बाय करणार होतो. दिवसभराचे दमलेले आम्ही आता हॉटेल मॅरिएट मध्ये छानपैकी आराम करू असे मनाशी ठरवले होते. पण ट्रीपच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्हाला वागावंच लागणार होतं. आमचे सहल व्यवस्थापक राहुल देसाई यांनी सांगितलं की उद्या सकाळी सगळ्यांनी अडीच वाजताच उठून तयार होऊन ३. २० ला बसमध्ये बसायचं आहे. लंडन स्टेशनवरून आम्ही फ्रान्सला जाण्यासाठी युरोस्टार ट्रेन पकडणार होतो. सुदैवानं या वेळी वीणा वर्ल्डला युरोस्टार ट्रेनची तिकिटं मिळाली होती. युरोस्टार ट्रेन ही अत्यंत वेगवान अशी युरोपातील रेल्वे आहे. केवळ अडीच-तीन तासात ती साडेचारशे ते पाचशे किमी चे अंतर पार करून आम्हाला पॅरिसला घेऊन जाणार होती. या गाडीबाबत आणखीही एक उत्सुकता होती. ती म्हणजे या गाडीचा 20 ते 25 मिनिटांचा प्रवास चक्क समुद्राखालून होतो. एका चॅनल टनेल मधून ही गाडी जाते. त्यामुळे या गाडीत बसण्याची खूपच उत्कंठा वाढली होती. 

सकाळी अडीचला उठायचं आहे हे मनात असल्यामुळे झोप अशी फारशी झालीच नाही. पण सगळे तयार होऊन तीन वीसला बसमध्ये बसले होते. लगेच बस निघाली सुद्धा. दहा पंधरा मी. त आम्ही लंडन स्टेशनवर पोहोचलो. लंडन स्टेशन, तिथली धावपळ, शिस्त पाहून जरा धडकीच भरली होती. विमानतळावर असते तशाच प्रकारचे चेकिंग या ठिकाणी झाले. रेल्वे स्टेशनवर गौरवर्णीय, कृष्णवर्णीय असे सर्व प्रकारचे कर्मचारी होते. प्रत्येकजण अतिशय शिस्तीत आपलं काम करीत होता. कुठेही गोंधळ, आरडाओरड नव्हती. कलकलाट नव्हता. सर्वत्र स्वच्छता नजरेत भरत होती. सर्वांचे पासपोर्ट तपासले गेले. त्यावर इमिग्रेशनचे शिक्के मारले गेले. त्या सगळ्या तपासणीतून पार पडून मग एका ठिकाणी निवांत बसलो. सगळयांनी बसल्या बसल्याच नाश्ता केला. आपल्याकडे जसे चहाचे स्टॉल्स सगळीकडे असतात, तसे इथे नाहीत. किंबहुना आपल्याकडे मिळतो तसा चहा इकडे मिळतच नाही. त्यामुळे एक चहाची उणीव सोडली तर सगळे वातावरण अतिशय चैतन्यदायी होते. आमची गाडी सहा वाजता होती. 

गाडी येण्याची सूचना मिळताच आम्ही प्लॅटफॉर्मवर दाखल झालो. एखाद्या राणीच्या दिमाखात युरोस्टार ट्रेन स्टेशनवर उभी होती. गाडी थांबल्यावर आपोआप दरवाजे उघडले गेले. दरवाज्याजवळच आपले सामान ठेवण्यासाठी जागा असते. तिथे सर्वांनी आपापल्या बॅग्स ठेवल्या. सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. गाडीची वेळ झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत दरवाजे बंद झाले आणि गाडी निघाली. गाडीचे सीट्स आरामदायी होते. बाजूला असणाऱ्या काचेच्या स्वच्छ खिडक्यांतून बाहेरच्या निसर्गाचे रम्य दर्शन घडत होते. चार जून २०२४ ची ती सकाळ होती. सकाळच्या सूर्याचं मनोहरी दर्शन घडत होतं. सूर्योदयाच्या वेळचे दृश्य अतिशय प्रसन्न होते. पाहता पाहता गाडीने केव्हा वेग घेतला ते कळले नाही. मध्ये बसल्यानंतर गाडीच्या प्रचंड वेगाची जाणीव होत नव्हती. दोन्ही बाजूला शेतांचे हिरवेगार गालिचे पसरलेले होते. कुठे कुठे शेतांमध्ये गवताचे कापून छान गठ्ठे बांधून ठेवले होते. शेतांमध्ये क्वचितच कुठेतरी गायी नजरेस पडत होत्या. शेतांमध्ये माणसे मात्र अभावानेच आढळली. भराभर शेतं, झाडं मागे पडत होती. गाडीमध्ये ओरडणारे विक्रेते, भीक मागणारे भिकारी नव्हते. शांत, सुखद असा प्रवास सुरु होता. मध्येच गाडी केव्हा टनेल मध्ये शिरूर तिनं समुद्राखालून ( किंवा खाडी खालून ) वाटचाल केली हे कळे सुद्धा नाही. फक्त ती एका बोगद्यात शिरते आहे एवढी जाणीव झाली आणि कल्पनेनेच आपण समुद्रा खालून किंवा खाडीच्या खालून जात आहोत असे वाटून अंगावर रोमांच उभे राहिले. समुद्राखालून अशा प्रकारचा भुयारी मार्ग तयार करणे ही खरोखर आधुनिक विज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल.बरोबर साडेनऊ वाजता गाडी पॅरिसच्या स्टेशनवर पोहोचली. 

पॅरिस स्टेशनवरून आमचे सर्व सामान घेऊन आम्ही आमची बस उभी होती तिकडे निघालो. त्यावेळी लवकरच फ्रान्समध्ये ऑलिम्पिक गेम्स सुरु होणार होते, त्याची तयारी ठिकठिकाणी सुरु दिसली. सगळीकडे स्वच्छता, सुशोभीकरण सुरु होते. आमचा आजचा मुक्काम हॉटेल मर्क्युअर मध्ये असणार होता. हे फोर स्टार दर्जा असलेले उत्तम प्रकारचे हॉटेल होते. आम्ही आपापल्या रूममध्ये दाखल झालो. फ्रेश होऊन जेवण आणि शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो. पॅरिसमध्ये ' वेलकम इंडिया ' या हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी गेलो. या ठिकाणी भारतीय पद्धतीचे जेवण मिळते. युरोपमध्ये भारतीय पद्धतीचे जेवण अतिशय महाग आहे असे समजले. 

पॅरिस हा अतिशय प्रगत आणि विकसित देश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या देशाला भेट देतात. फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा संदेश फ्रान्सने दिला. हा देश पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते. इतिहासाच्या अभ्यासातून याच देशात व्हर्सायचा तह झाला होता हे माहिती होते पण प्रत्यक्षात तो देश, त्याची राजधानी पॅरिस, व्हर्सायचा राजवाडा, आयफेल टॉवर आदी गोष्टी आता प्रत्यक्ष पाहता येणार होत्या त्याची उत्सुकता होती. युरोपमध्ये स्ट्रीट लाईट्स प्रथम पॅरिसमध्येच लागले. त्यामुळे पॅरिसला सिटी ऑफ लाईट्स असेही म्हटले जाते. फॅशन, खाद्यसंस्कृती आदींचे हे माहेरघर आहे. निरनिराळ्या प्रकारची वारुणी ( मद्य ), सुगंधी द्रव्ये ( परफ्यूम्स ) यांची पॅरिस ही जननी आहे. जगातील उत्तमोत्तम परफ्युम्सची निर्मिती प्रथम फ्रान्समध्येच होते. शेनेल, नीना, रिची, पॉयझन असे अनेक. चित्र, संगीत, शिल्प, नृत्य,नाट्य आदी कलांचे पॅरिस हे माहेरघर आहे. अनेक प्रकारच्या चैनीच्या आणि हौसमौजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे आगर म्हणजे पॅरिस. पॅरिसबद्दल बोलताना एका प्रवाशाने असे उद्गार काढले आहेत की जर्मनी म्हणजे वंश, इटली म्हणजे भाषा, इंग्लंड म्हणजे एक बेट तर फ्रांस म्हणजे एक महान तेजस्वी परंपरा. चांदणीच्या आकार असलेला हा देश जगाच्या नकाशात एखाद्या तेजस्वी हिऱ्यासारखा वाटतो. All other cities are towns but Paris is a world  असे उद्गार एका राजाने काढले होते. असं हे जगातील महत्त्वाचे शहर पॅरिस आम्हाला खुणावत होतं आणि त्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो होतो. अशा या फ्रान्स आणि पॅरिसबद्दल अधिक जाणून घेऊ या पुढील भागात. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

२९/७/२०२४

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 





टिप्पण्या