उगवतीचे रंग
योग आणि योग्यायोग्य
२१जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. या वर्षीही नुकताच आपण तो साजरा केला. योगाचे महत्व आज जवळपास संपूर्ण जगात मान्य झाले असून मोठया प्रमाणावर प्रतिसाद त्याला मिळतो आहे. त्याबद्दल मोठया प्रमाणात जनजागृती होते आहे ही आनंदाची गोष्ट आहे. योग म्हणजे केवळ योगासने आणि प्राणायाम नव्हे. ती एक जीवनशैली आहे. शरीराबरोबरच मनाचा विचार जिथे केला जातो अशी एक निरोगी आणि निरामय आयुष्य जगण्याची कला म्हणजे योग. समत्वम योग उच्चते असे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात. सुखदुःख, यशापयश आदी सर्व प्रसंगात मनाचे संतुलन राखून व्यवहार करता येणे म्हणजे योग. योगः कर्मसु कौशलम असेही म्हटले जाते. आपली नित्यकर्मे चांगल्या प्रकारे पाडता येणे हा सुद्धा योगच आहे.
योग ही जीवनशैली व्हावी. रोजच्या जगण्याचा तो एक अनिवार्य भाग व्हावा. त्याशिवाय योगाचे फायदे आपल्याला मिळू शकणार नाहीत. त्यासाठी त्यात नियमिततेची आवश्यकता आहे. पण त्यासाठी अतिशय काटेकोर राहून कठोरपणे ते पाळलेच गेले पाहिजे असा अट्टाहास नको. काही वेळा परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची लवचिकताही दाखवता यायला हवी. कारण ' अति सर्वत्र वर्ज्यते. ' आज याच विषयासंबंधी थोडे बोलणार आहे.
आपण घरात नियमितपणे योगासने, प्राणायाम करीत आहोत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण घरातील लहान नातू किंवा नात त्याच वेळी आपल्याला तिच्यासोबत खेळण्याचा आग्रह करते आहे. अशा वेळी नाक मुठीत धरून प्राणायाम करीत बसण्यापेक्षा थोडं तिच्यासोबत खेळलं तर त्या खेळातूनही व्यायाम आणि प्राणायाम घडू शकतो. अशा वेळी थोडं जलद चाला, थोडं धावा, थोड्या उड्या मारा, थोडी गाणी गा. व्यायामही घडेल आणि प्राणायामही. प्रत्येकच वेळी फार गंभीर राहण्याची आवश्यकता नाही. आपल्यातही एक लहान मूल दडलेलं असतंच ! त्या मुलाला व्यक्त व्हायला यापेक्षा दुसरी उत्तम संधी ती कोणती ? आपल्यातील अव्यक्त बालकाला व्यक्त होण्याची ही संधी नक्कीच आपला आनंद द्विगुणित करील आणि आपल्याला तरुण राहायला मदत करेल.
परवाच्या दिवशी रेडिओवर योगगुरू हंसाजी यांची मुलाखत लागली होती. त्यांनी एक फार सुदंर किस्सा सांगितला. त्या एके दिवशी जुहू बीचवर फिरत असताना एक प्रसिद्ध अभिनेत्री पण तिथे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी आली होती. तिचे लहान मूल तिच्यासोबत आलेली आया सांभाळत होती. ते मूल रडत होते. अशा वेळी त्याला आईची गरज असणार. पण ती आई हातात वजन घेऊन चालण्याचा सराव करीत होती. बहुधा आपल्या फिगरची तिला काळजी असावी. पण त्याच वेळी आपल्या त्या रडणाऱ्या बाळाला घेऊनही तिला चालता आलेच असते ना ! बाळाचीही शारीरिक आणि मानसिक गरज भागली असती आणि हिला सुद्धा व्यायाम घडलाच असता. म्हणून व्यायाम किंवा योग करताना थोडी लवचिकताही असणे गरजेचे आहे. समत्वम योग उच्चते याचे सार हेच आहे.
आपण आपल्या घरच्या माणसांना तरी काही वेळ देतो का ? वयोवृद्ध असणारे आईवडील यांच्याबरोबर केवळ दिवसातील पाच दहा मिनिटे जरी घालवली, तरी त्यांना केवढा आनंद होतो !मनपसंत संगीत ऐकणे, आपली आवडती पुस्तके वाचणे, मित्रांबरोबर वेळ घालवणे, सहलीसाठी जाणे या गोष्टीही आनंद देणाऱ्या आणि आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणाऱ्या आहेत. आपण जर शारीरिक दृष्ट्या सक्षम असू तर आपल्याला कोणासाठी शारीरिक मदत करता येईल, आर्थिक दृष्टया सक्षम असू तर कोणासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करता येईल. तेही नसेल तर इतरांसाठी थोडा वेळ देता येईल. आपल्या चेहेऱ्यावरचे हास्य, दोन प्रेमाचे शब्द हे तर आपण देऊच शकतो. त्यासाठी काही वेगळे खर्च करण्याची गरज नाही. ज्याला हे साधलं त्याला योग साधला.
आज मी जो काही आहे, त्यात सर्वांचा हातभार आहे. माझे यश हे माझे एकट्याचे कधीच असू शकत नाही. माझ्या आजच्या उन्नतीसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, त्यांच्यासाठी कृतज्ञतेची भावना माझ्या मनात असते का ? ती कधीतरी मी व्यक्त करतो का ? माझ्या ताटात येणारी पोळी, भाजी, भात आदी पदार्थ माझ्या पैशावर आलेले असतात हे जरी खरे असले तरी त्यामागे अनेकांचे कितीतरी परिश्रम असतात. शेतकरी मोठ्या कष्टाने शेत पिकवतो. धान्याची नेआण करणाऱ्या शेकडो हातांमुळे ते माझ्यापर्यंत पोहोचते. माझी आई, पत्नी, बहीण मोठया प्रेमाने माझ्यासाठी स्वयंपाक करते. तेव्हा कुठे हे सगळे पदार्थ माझ्या पानापर्यंत पोहोचतात. या सगळ्यांबद्दल प्रेम, कृतज्ञता आपण व्यक्त करतो का ? कधीतरी आई, पत्नी यांच्या जवळ जाऊन आजचं जेवण तू खूप छान बनवलं असं सांगतो का ? त्यांच्या चेहेऱ्यावरील समाधान, डोळ्यातील आनंद आपल्याला खूप काही देऊन जाईल. म्हणूनच योगदिन साजरा करताना जीवनातील हाही योग्यायोग्यतेचा योग ज्याला जमला, तो योगीच झाला. ज्ञानोबा माउली म्हणतात, ' अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ' यातच जीवनाचे सार्थक आहे.
© विश्वास देशपांडे
२३/०६/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा