मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग तीस

 भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग तीस 

सुमधुर गीते देणारा संगीतकार : रोशन 

हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ म्हणजे साधारणपणे १९५० ते १९७० चा काळ मानला जातो.  काळात शंकर जयकिशन, अनिल विश्वास, मदन मोहन नौशाद असे एकाहून एक सरस संगीतकार हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या प्रतिभेने कायमची अजरामर गाणी देण्यात व्यस्त होते. याच काळात रोशन लाल नागरथ उर्फ प्रसिद्ध संगीतकार रोशन यांनी देखील आपली सुमधुर गाण्यांची बरसात करून रसिकांना अजरामर गीते दिली. ज्याप्रमाणे लतादीदी या अनेक संगीतकारांच्या आवडत्या गायिका होत्या त्याचप्रमाणे रोशन  लतादीदींच्या आवडीचे संगीतकार होते. रोशन यांना आपल्या स्वतःच्या संगीतावर जेवढा विश्वास होता, त्यापेक्षाही जास्त त्यांच्या संगीतावर लतादीदींचा विश्वास होता. ज्यावेळेला लतादीदींनी आपल्या ' भैरवी ' या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले, त्यावेळी त्याकाळात असलेले सगळे दिग्गज संगीतकार सोडून त्यांनी त्या चित्रपटाच्या संगीतासाठी रोशन यांची निवड केली यावरून रोशन यांची योग्यता लक्षात यावी. 

लतादीदींनी महाराष्ट्र टाइम्सला एक मुलाखत दिली होती. लतादीदी रोशन यांच्याबद्दल म्हणतात, ' शंकर जयकिशन, मदन मोहन  या प्रतिभावान संगीतकारांप्रमाणेच सदाबहार गाणी देण्याची क्षमता त्यांच्यात होती. पण तरीही हा गुणी संगीतकार तसा उपेक्षितच राहिला. त्यांची म्हणावी तशी दखल चित्रपटसृष्टी किंवा संगीतक्षेत्राने घेतली नाही. ' 

दीदी म्हणाल्या, ' सुरुवातीच्या काळात ते संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे नेहमी येत असत. प्रत्येक भेटीत ते मला म्हणायचे की दीदी बघा, मी मी तुमच्यासाठी किती सुंदर आणि गोड चाली रचल्या आहेत. पण तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही. त्यांची ही तक्रार अतिशय रास्त होती कारण मी त्यावेळी कामात खूपच व्यस्त होते. पण मला सवड मिळाल्यावर त्यांची अनेक गाणी मी गायली. ' नौबहार ' मधील ' ए री मैं तो प्रेमदिवानी ' हे गाणे आजही अनेक रसिकांच्या स्मरणात असेल. कभी तो मिलेगी, बार बार तोहे क्या समझाये पायल की झनकार, जो वादा किया वो, पाँव छू लेने दो, जुर्म -ए-उल्फत  पे , जिंदगीभर नही भुलेगी, संसार से भागते फिरते हो, सखी री मेरा मन उलझे तन डोले अशी अनेक सुंदर गाणी मी त्यांच्याकडे गायले. ' दीदींनी पुढे आपल्या आठवणीत सांगितले की आपल्या ' भैरवी ' या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या जबाबदारी बरोबरच एका मराठी चित्रपटाच्या गाण्यांची जबाबदारी त्यांनी रोशन यांच्यावर सोपवली होती. पण दुर्दैवाने दोन्ही चित्रपट पूर्ण झाले नाहीत. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा साधलेला उत्तम मेळ हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य होते. त्यांचा वाद्यवृंदही मोजकाच पण प्रभावी असे. अशा या गुणी संगीतकाराची म्हणावी तशी कदर झाली नाही. 

संगीतकार रोशन म्हणजे आताच आघाडीचा अभिनेता हृतिक रोशन याचे आजोबा आणि निर्माता, दिग्दर्शक राकेश रोशन आणि संगीतकार राजेश रोशन यांचे वडील.  रोशन यांचा जन्म १४ जुलै १९१७ मध्ये गुजरानवाला पंजाब ( आता पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतात ) झाला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती.  त्यांनी लखनौतील मॉरिस कॉलेजात ( आजची भातखंडे संगीत संस्था ) संगीताचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी मेहेर घराण्याचे प्रवर्तक आणि महान सरोदवादक उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. पंडित रविशंकर आणि निखिल बॅनर्जी हे त्यांचे शिष्य होत. त्यांच्याकडील शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोशन यांनी उस्ताद बुंदू खान आणि मनोहर बर्वे यांच्याकडे शास्त्रीय संगीतातले बारकावे समजून घेतले. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीत आणि रागदारी चा वापर चित्रपट संगीतात कसा करावा याचे उत्तम ज्ञान मिळाले. 

दिल्लीत शिक्षण घेत असताना रोशन आणि मुकेश माथूर ( प्रख्यात गायक मुकेश ) यांची वर्गमित्र म्हणून मैत्री झालीच होती. या दोन्ही मित्रातला एक पुढे उत्तम गायक झाला तर दुसरा महान संगीतकार. रोशन यांनी काही काळ आकाशवाणीवर पण नोकरी केली. याच दरम्यान त्यांची तिथे इरा या बंगाली गायिकेशी ओळख झाली. इरा त्यांची जीवनसाथी बनली. इरासोबतच बंगाली संगीताचा प्रभाव  त्यांच्यावर पडला. पुढे ते संगीतकार अनिल विश्वास यांच्या संपर्कात आले. अनिल विश्वास यांच्या सांगण्यावरून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर योगायोगाने त्यांची दादर स्टेशनवर निर्माता दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याशी भेट झाली. रोशन यांचा स्वभाव अत्यंत साधा होता. कोणाजवळही कामासाठी का होईना पण स्वतःचे मोठेपण ते कधी सांगत नसत. मग काम मागणे तर दूरच एवढा संकोची स्वभाव त्यांचा होता. आपल्या कामाचे पैसे किंवा मोबदला देखील ते कधी स्वतःहून मागत नसत. केदार शर्मा यांनी रोशन यांच्यातील कलागुण ओळखले आणि आपल्या ' नेकी और बदी ' या नवीन चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. दुर्दैवाने हा चित्रपट चालला नाही. रोशन यांना थोडे नैराश्य आले होते. त्या अवस्थेत समुद्रकिनारी भटकत असताना त्यांना एक धून सुचली. ' तेरी  दुनिया में दिल लगता नही, वापस बुला ले...'  जणू त्यांच्या मनातील भावनाच या गीतात व्यक्त झाल्या होत्या. 

केदार शर्मा यांनी पुन्हा एकदा आपल्या नशिबाशी जुगार खेळण्याचे ठरवले आणि आपल्या ' बावरे नैन ' या चित्रपटासाठी रोशन यांना संधी दिली. या चित्रपटात राजकपूरच्या तोंडी असलेल्या ' तेरी दुनियामे दिल लगता नही ...' या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली. यानंतर त्यांच्याकडे नौबहार, रास-रंग, हम लोग सारखे अनेक चित्रपट चालून आले. रोशन यांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी या चित्रपटातील गाण्यांमध्ये बासरी आणि सारंगी या वाद्यांचा वापर केला. आपल्या वाद्यवृंदाचा माफक आणि संयमित वापर हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ' बार बार तोहे क्या समझाये पायल की झनकार ..' या गीतात त्यांनी पं हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी आणि पं रामनारायण यांच्या सारंगी वादनाचा अतिशय सुंदर वापर केला. 

याच दरम्यान रोशन यांच्याकडे ' महेबुबा ' या चित्रपटाची जबाबदारी आली होती पण ती जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेऊन ओ पी नय्यर यांच्याकडे देण्यात आली. रोशन यांच्याबद्दल लतादीदींच्या मनात अपार आदर होता. त्यांना एक प्रकारे हा रोशन यांचा अपमान वाटला. त्यामुळे दीदींचे ओ पी नय्यर यांच्याशी जे संबंध बिघडले ते कायमचेच. रोशन यांच्या संगीत कारकीर्द यशस्वी होण्यामध्ये  लतादीदींचा मोठा वाटा आहे. रोशन यांनीही या संधीचे सोने केले. लतादीदींच्या मधुर स्वरांच्या जोडीला त्यांनी आपल्या आवडत्या सारंगी, दिलरुबा, हार्मोनियम इ वाद्यांचा सुरेख वापर करून एकापेक्षा एक सरस गाणी दिली. लतादीदींनी तब्बल १४६ गाणी त्यांच्या संगीत निर्देशनात गायली आहेत. गीतकार साहिर लुधियानवी यांच्याबरोबर अनेक मधुर गाणी रोशन यांनी केली. त्यांचं 'बाबर ' या चित्रपटातील ' सलामे हसरत कुबुल कर लो...' हे गीत खूप गाजलं. नंतर चित्रलेखा, ताजमहल, बहू बेगम, दिल ही तो हैं, बरसात की रात या चित्रपटातील गाणी हिट झाली. दिल ही तो हैं  या चित्रपटातील ' लागा चुनरी में दाग ' भुले से मोहब्बत कर बैठा, निगाहे मिलाने को जी चाहता हैं, तुम्हारी मस्त नजर इ गाणी कोण विसरू शकेल ? त्यातील ' लागा चुनरी में दाग ' तर मास्टरपीस आहे तर ' निगाहे मिलाने को...' एक सुपरहिट कव्वाली. 

सुपरहिट गझला देण्यात रोशन यांचा हातखंडा होता. बहू बेगम मधील 'दुनिया करे सवाल ' ही सदाबहार गजल कोण विसरू शकेल ! त्यांच्या कव्वाली तर एक से बढकर एक अशा होत्या.  बरसात की रात मधील ' ना तो कारवाँ की तलाश हैं ', जी चाहता हैं चुम लू ', ये इश्क इश्क हैं ...' यासारख्या कव्वाली रसिकांच्या मनावर आजही राज्य करीत आहेत. 

१९५४ मध्ये रोशन यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. त्यासाठी बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. पण रोशन यांच्या साध्या स्वभावामुळे आणि निर्मात्यांकडून मिळेल त्या मानधनावर समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे फारसा पैसा त्यांच्याजवळ नव्हता. या त्यांच्या गरजेच्या काळात त्यांचे मित्र ख्वाजा खुर्शीद अन्वर आणि अभिनेते बलराज साहनी यांनी सगळ्या खर्चाची व्यवस्था करून त्यांना रशियाला पाठवले आणि तिथे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली. परत आल्यानंतर रोशन यांनी पुन्हा आपल्या कामाला वाहून घेतले आणि अनेकानेक सुंदर गीते रसिकांना दिली. ' चित्रलेखा ' मधील शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांची गाणी सदाबहार आहेत. ' काहे तरसाये ' हे आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गीत तर ' मन रे तू काहे न धीर धरे ' हे मो. रफींच्या आवाजातील गीतं अप्रतिम आहेत.  ' ममता ' चित्रपटातील लतादीदींनी गायलेली रहे ' ना रहे हम ' आणि रहते थे कभी .. ही गाणी तर प्रचंड लोकप्रिय झाली. त्यासोबतच नूरजहाँ आणि बहू बेगम या चित्रपटातील गाणी पण खूप गाजली. ' अनोखी रात ' ( १९६८ ) हा रोशन यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रदर्शित झाला. 


 ' ताजमहल ' चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण वाईट या गोष्टीचे वाटते की या गुणी संगीतकाराला अल्पायुष्य लाभले.१६ नोव्हेंबर १९६७ या दिवशी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षीच ते वारले. पण त्यांची गाणी अजरामर आहेत. मुलाच्या रूपाने आपला संगीत वारसा ते मागे ठेवून गेले आहेत.  ' रहे ना रहे हम ' या त्यांच्या गीतातील शब्दांप्रमाणेच आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांची गाणी नेहमीच त्यांची स्मृती जागती ठेवतील. 

©️विश्वास  देशपांडे,चाळीसगाव 
२३/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

सी रामचंद्र, रोशन आणि लता मंगेशकर 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...