मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग अठ्ठावीस


भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग अठ्ठावीस 

जीवनावर  प्रेम करणारे संगीतकार : कल्याणजी आनंदजी 

कल्याणजी आनंदजी. जीवनावर आणि संगीतावर प्रेम करणारी आणखी एक संगीतकारांची जोडी. या जोडीने इतकी सुंदर सुंदर गाणी दिली की ती आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. सुखदुःख, आनंद, हर्षोल्हास, जीवनविषयक चिंतन या सारख्या विविध इंद्रधनुषी छटा असलेली गाणी या द्वयीने आपल्याला दिली. आयुष्याच्या अज्ञात सफरीवर प्रेम करणारे हे संगीतकार. ' जिंदगी तो बेवफा हैं एक दिन ठुकरायेगी, मौत मेहबुबा हैं अपनी साथ लेके जायेगी, हसके जीने की अदा  दुनिया को दिखलायेगा, वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलायेगा ...'जीवनाचं सत्य किती सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितलंय या गीतात. अशी जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी कल्याणजी आनंदजी यांची एकापेक्षा एक सरस गाणी आठवताहेत.  ' उपकार ' मधलं अभिनेता प्राणच्या तोंडी असलेलं ' कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातों का क्या...' कधी जुनं होईल का ? ' सरस्वतीचंद्र ' मधलं लतादीदींच्या आवाजातलं ' छोड दे सारी दुनिया किसी के लिये...' काय बोलावं या गाण्याबद्दल ! दीदींच्या मास्टरपीस गाण्यांपैकी एक. ' जब जब फुल खिले ' मधलं ते ' ये समा समा हैं ये प्यार का...' या गाण्यात सुरुवातीला वाजणारं ते प्रसन्न संगीत आणि मग लतादीदींच्या आवाजातलं ते गाणं खरंच ' एक समा बांधतं..' आपला मूड प्रसन्न करतं.  ' इशारा ' मधलं ' दिल बेकरार सा है..' तर लाजवाबच ! हे गाणं लता मंगेशकर आणि मो रफी या दोघांनीही स्वतंत्रपणे गायलं आहे. अशी विविधरंगी, आकर्षक गाणी देणारे हे संगीतकार. लतादीदींनी जवळपास तीनशे दोन गाणी या संगीतकार जोडीबरोबर म्हटली आहेत. 

हिंदी चित्रपटसृष्टीत काही काळ राज्य करणारी गुजरातच्याकल्याणजी आणि आनंदजी शाह या  बंधूंची ही कहाणी. जवळपास पन्नास वर्षे आपल्या सुमधुर गीतांची बरसात या दोन्ही भावांनी चित्रपट रसिकांवर केली. या वाटचालीत ते अनेक पुरस्कारांचे मानकारीही ठरले पण त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत आणि राहतील. त्यांचे वडील एक गुजराती व्यावसायिक होते. ते गुजरातमधील कच्छ मधून मुंबईला व्यापारासाठी आले. गिरगावला त्यांनी एक किराणा मालाचे दुकान टाकले. आपल्या मुलांनी पुढे चालून आपल्या व्यवसायात मदत करावी अशी इच्छा त्यांच्या मनात असावी. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कल्याणजी आनंदजी यांच्या आजोबांकडे असणारा गुजराती लोकसंगीताचा वारसा या मुलांमध्ये उतरला होता. 

त्यांच्या दुकानावर येणाऱ्या एका व्यक्तीकडून सामानाचे पैसे न घेता वीरजीभाईंनी ( कल्याणजी आनंदजींचे वडील ) त्या बदल्यात त्या व्यक्तीकडे संगीत शिकण्यासाठी पाठवले. ती व्यक्ती संगीतातली फार तज्ज्ञ नव्हती पण संगीताचे प्राथमिक धडे आणि आवड मात्र त्यांनी या मुलांच्या मनात निर्माण केली. कल्याणजींना तर आधीपासूनच निरनिराळी वाद्ये वाजवण्याची आवड होती. त्यांनी त्याचा सराव करून आपले कौशल्य वाढवले. नंतर निरनिराळ्या संगीतकारांकडे त्यांनी काम केले. त्यातून त्यांना बरेच शिकायला मिळाले. विशेषतः शंकर जयकिशन यांच्याकडे काम करताना त्यांना खूप शिकायला मिळाले. त्यांच्या संगीत शैलीचा प्रभावही या दोघांवर सुरुवातीच्या काळात होता.  ' नागीन ' चित्रपटासाठी हेमंतकुमार संगीतकार म्हणून काम करीत होते. या दरम्यान क्ले व्हायोलिन वर त्यांनी वाजवलेली बीन ची धून संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली. पुढे अनेक संगीतकरांनी या धून चा उपयोग करून घेतला. सुरुवातीचे काही चित्रपट संगीतकार म्हणून एकट्या कल्याणजींनी केले. पण पुढे त्यांनी आपल्या आनंदजी या भावालाही आपल्याबरोबर घेतले आणि मग कल्याणजी आनंदजी म्हणून ते जोडीने संगीत देऊ लागले. 

' सम्राट चंद्रगुप्त ' (१९५८ ) या चित्रपटात भारतभूषण आणि निरुपा रॉय हे कलाकार होते. या चित्रपटाचं संगीत कल्याणजींनी दिलं.  या चित्रपटात ' चाहे पास हो, चाहे दूर हो..' यासारखी लतादीदींच्या आवाजात असणारी मधुर गाणी आहेत. त्याच वर्षी ' पोस्ट बॉक्स ९९९ ' या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. त्यातील ' मेरे दिल मे एक बात ' हे लतादीदी आणि मन्ना डे यांच्या आवाजातील तर ' ओ नींद न मुझको आये..'  हेमंतकुमार आणि लतादीदींच्या आवाजातील गाणी लोकप्रिय झाली. १९५९ मध्ये त्यांनी ' घर घर की कहानी ', ' चंद्रसेना ', ' बेदर्द जमाना क्या जाने ' या चित्रपटांना संगीत दिलं. या चित्रपटातील ' नैना हैं जादूभरे..', कैद मे हैं बुलबुल सैय्याद मुस्कुराये', ' दूर कहीं तू चल, दिल रहा मचल ' यासारखी गाणी लोकप्रिय झाली. पुढे मग ' मदारी ' चित्रपटापासून आनंदजी पण सोबत आले. मदारी चित्रपटातील ' दिल लुटनेवाले जादूगर...' हे लतादीदींच्या आवाजातील गाणं गाजलं, सुपरहिट ठरलं आणि बिनाका गीतमालात समाविष्ट झालं. 

१९५९ मध्येच मीनाकुमारी आणि बलराज साहनी यांचा ' सट्टाबझार ' हा चित्रपट आला. या चित्रपटाला या संगीतकार जोडीने अतिशय अप्रतिम असं संगीत दिलं. त्यातील ' तुम्हे याद होगा कभी हम मिले थे..' हे हेमंतकुमार आणि लतादीदींनी गायलेलं गाणं आणि इतरही गाणी लोकप्रिय ठरली. पुढच्याच वर्षी म्हणजे १९६० मध्ये आलेल्या ' छलिया '  चित्रपटातील गाण्यांनी त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. यात लतादीदींनी गायलेली  ' बाजे पायल छम छम होके बेकरार...' आणि ' 'तेरी राहों में खडे हैं दिल थाम के..' ही गाणी रसिकांनी उचलून डोक्यावर घेतली. तर याच चित्रपटातील मुकेश यांनी गायिलेले ' डम डम  डिगा डिगा ..' , ' मेरे टुटे हुए दिलसे..', छलिया मेरा नाम ही गाणी सदाबहार ठरली. या सगळ्या गीतांवर शंकर जयकिशन यांच्या संगीत शैलीचा प्रभाव होता असे म्हटले जाते. कल्याणजी आनंदजी यांचा एकापेक्षा एक सरस गाणी देण्याचा सिलसिला सुरूच होता. याच वर्षी त्यांनी संगीत दिलेला ' दिल भी तेरा हम भी तेरे ' हा चित्रपट देखील आला. या चित्रपटातील मुकेश आणि लतादीदींनी स्वतंत्रपणे म्हटलेली ' मुझको इस रात की तन्हाई में आवाज न दो ' ही गाणी गाजली.  १९६४ मध्ये आलेल्या ' दुल्हा दुल्हन ' या चित्रपटातील ' हमने तुझको प्यार दिया हैं जितना..' ही तिलक कमोद रागावर आधारित असलेली आणि लतादीदी आणि मुकेश यांनी गायलेली सोलो गाणी रसिकांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचली. 

एकापेक्षा एक सरस चित्रपटातील गाणी देऊन ही जोडी रसिकांना मंत्रमुग्ध करीतच राहिली. यानंतर त्यांनी संगीत दिलेल्या  ' हिमालय की गोदमे ' या चित्रपटातील सगळ्या गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. या गाण्यांसाठी त्यांना उत्कृष्ठ संगीताचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात कल्याणजी आनंदजी यांनी आनंदी आणि दुःखी या दोन्ही मुडमधील राग ' चारुकेशी ' वर आधारित गाणी दिली. 'एक तू जो मिला सारी दुनिया मिली..' हे आनंदी आणि ' एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या हैं ..' हे दर्दभरे गाणे देवून त्यांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला. जशी ही एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देत राहिली, तशीच त्यांच्या अपेक्षेपेक्षा सगळी गीतं उत्तम गाऊन लतादीदींनी त्यांच्या संगीताचे सोने केले. मो. रफी, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले,मन्ना डे, महेंद्र कपूर  आदी साऱ्या आघाडीच्या गायकांकडून या संगीतकार जोडीने गाणी तर गाऊन घेतलीच पण त्यांचे वैशिष्ट्य हे होते की त्यांनी अनेक नवीन कलाकारांना पण संधी देऊन चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवून दिला. अशा कलाकारांमध्ये कमल बारोट, बाबला, कंचन, साधना सरगम, सुरेश वाडकर, नितीन मुकेश, अलका याज्ञीक असे गायक आहेत. 

१९६५ मध्ये कल्याणजी आनंदजींनी संगीत दिलेला ' जब जब फुल खिले ' चित्रपट आला आणि त्यातील गाणी लगेच रसिकांच्या ओठांवर खेळू लागली. यातील ' एक था गुल और एक थी बुलबुल..', परदेसियोंसे ना अखियां मिलाना ', यहाँ मै अजनबी हूँ ' , ' ये समा समा हैं ये प्यार का ', ' ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे..' या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. अशी खूप रसिकांच्या हृदयाला हात घालणारी, तरुणांना आपलीशी वाटणारी गीते या जोडीने दिली. या जोडीने तब्बल २५० चित्रपटांना संगीत दिले. सगळ्याच चित्रपट आणि गाण्यांची नावं देणं कठीण आहे पण तरीही त्यांच्या संगीत कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेले चित्रपट आणि गाणी आपण बघण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. १९६८ मध्ये मनोजकुमारचा ' उपकार ' चित्रपट आला. या चित्रपटातील गाण्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. महेंद्र कपूर यांच्या आवाजातील ' मेरे देश की धरती..' आजही देशभक्तीपर गीतात आपला अव्वल क्रमांक राखून आहे. मुकेश यांचा ' दिवानों से ये मत पूछो..' मधील स्वर काळजाला भिडतो. मन्ना डे यांच्या ' कस्मे वादे प्यार वफा सब..' आणि लतादीदींच्या ' हर ख़ुशी हो वहा तू जहाँ भी  रहे..'या गाण्यांबद्दल तर काही बोलण्यापेक्षा फक्त ती ऐकावीत आणि आनंद घ्यावा अशी आहेत. 

१९६८ मध्ये ' सरस्वतीचंद्र ' हा ही  सुपरहिट गाणी देणारा चित्रपट कल्याणजी आनंदजींनी दिला. यातील राग यमन मधील लतादीदी आणि मुकेश यांच्या स्वतंत्र आवाजातील चंदन सा बदन, चंचल चितवन ... या गाण्याने रसिकांच्या हृदयावर राज्य केले. आजही ही गाणी रसिकप्रिय आहेत. याच चित्रपटातील ' मैं तो भूल चली बाबुल का देस ...' या गाण्यात गुजराती लोकसंगीत आणि गरबा नृत्याचा वापर करून आपल्या कच्छ या प्रदेशाचा एक प्रकारे सन्मान केला. याच चित्रपटातील ' फुल तुम्हे भेजा हैं खत में ..' आणि ' छोड दे सारी दुनिया किसी के लिये..' ही अवीट गोडीची गाणी कोण विसरू शकेल ? या चित्रपटासाठी कल्याणजी आनंदजी यांना उत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७४ मध्ये आलेल्या ' कोरा कागज ' चित्रपटातील गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. यातील किशोरकुमार यांनी गायीलेलं ' मेरा जीवन कोरा कागज..' हे गाणं , ' रुठे रुठे पिया.. ' आणि ' मेरा पढने में नही लागे दिल..' ही लतादीदींनी गायलेली गाणी सदाबहार आहेत. त्यांची दीदींनी गायिलेली आणखी काही लोकप्रिय गाणी नमुन्यादाखल देत आहे. 

बाबुल प्यारे.. ( जॉनी मेरा नाम, १९७० ), गंगा मैया में जब तक ( सुहागरात, १९६८ ), हम थे जिनके सहारे ( सफर , १९७० ), जा रे जा ओ हरजाई ( कालिचरण, १९७६ ), जिसका मुझे था इंतजार ( डॉन १९७८ ), किसी राह में किसी मोड पर  ( मेरे हमसफर, १९७० ), मुझे ऐसा मिला मोती ( पिघलता आसमान, १९८५ ), तू क्या जाने ( हाथ की सफाई, १९७४ ), थोडा सा ठहरो ( व्हिक्टोरिया नं २०३, १९७२ ), वादा कर ले साजना  ( हाथ की सफाई, १९७४ ), युहीं तुम मुझसे बात करती हो ( सच्चा झूठा, १९७० ), सुबह और शाम काम ही काम ( उलझन , १९७५ ), दिल बेकरार सा हैं  (इशारा, १९६४ ), आज की रात सजन मन चाहे ( विश्वास, १९६९ )

कल्याणजी आनंदजी यांनी जगभरात संगीताचे पाच हजाराहून अधिक कार्यक्रम केले. या कार्यक्रमातून त्यांना प्रचंड पैसा आणि लोकप्रियता देखील मिळाली. पण आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पंचवीस कोटी हून अधिक रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ' लिट्ल वंडर्स ' हा कार्यक्रम सुरु केला. १९९४ मध्ये आलेला ' उल्फत की नयी मंजीले ' हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. २००३ मध्ये कल्याणजी यांचे निधन झाले. या जोडीला त्यांच्या संगीतातील अद्वितीय कार्यासाठी ' लता मंगेशकर पुरस्कार ' आणि पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांची गाणी रसिकांच्या हृदयावर कायम राज्य करीत राहतील. 

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
१९/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 





















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...