भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकतीस
मूड फ्रेश करणारी गाणी देणारा संगीतकार : राजेश रोशन
मागील भागात आपण अजरामर गीते देणारा संगीतकार म्हणून रोशन यांचा परिचय करून घेतला होता. या भागात त्यांचे सुपुत्र राजेश रोशन यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. बहुतेक घराण्यात जसा वडिलांचा वारसा मुलं चालवतात तसंच संगीत क्षेत्रातही हा वारसा पुढच्या पिढयांना मिळत जातो. मास्टर दीनानाथांचा वारसा मंगेशकर भावंडे चालवत आहेत. एस डी बर्मन यांचा वारसा पुढे पंचमदा उर्फ आर डी बर्मन यांनी चालवला. त्याचप्रमाणे रोशन यांच्या संगीताचा वारसा त्यांच्या मुलाने म्हणजे राजेश रोशन यांनी सुरु ठेवला. नुसताच सुरु ठेवला नाही तर त्यात मोलाची भर घातली आणि संगीतक्षेत्रात आपले नाव खऱ्या अर्थाने ' रोशन ' केले.
राजेश रोशन यांच्या पित्याचे म्हणजेच संगीतकार रोशन यांचे जीवन अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी ते हे जग सोडून गेले. अर्थात त्यांची अजरामर गाणी रसिक कधीही विसरणार नाहीत. राजेश रोशन यांनी वडिलांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला. त्यांची आई इरा ही त्यांची संगीतातली पहिली गुरु. आपल्या पतीच्या निधनानंतर इरा या संगीत शिकण्यासाठी उस्ताद फैयाज अहमद खान यांच्याकडे संगीत शिकण्यासाठी जात असत. जाताना आपल्या सोबत त्या छोट्या राजेशला देखील घेऊन जात. राजेश यांच्या रक्तात मुळातच आईवडिलांच्या संगीताचा वारसा होताच. फैयाज अहमद खान यांच्या सहवासात आल्यानंतर राजेश यांची शास्त्रीय संगीताची जाणीव आणि ज्ञान समृद्ध होत गेले. ते अनेक वाद्ये वाजवायला शिकले. पुढे प्रख्यात संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी काही वर्षे सहाय्यक म्हणून काम केले. या काळात संगीतातले अनेक बारकावे त्यांनी जाणून घेतले. संगीताचा चित्रपट गीतांमध्ये परिणामकारकपणे वापर कसा करावा हे ज्ञान या काळात त्यांना प्राप्त झाले.
गमतीचा भाग म्हणजे राजेश यांना चित्रपट क्षेत्रात यायची इच्छा नव्हती. त्यांची स्वप्ने वेगळी होती. एखादा मोठा अधिकारी होऊन सरकारी नोकरी करावी असे त्यांच्या मनात होते. पण आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राजेश आपसूकच संगीत क्षेत्राकडे वळला. चित्रपट सृष्टीला त्याच्या रूपाने एक फ्रेश गाणी देणारा संगीतकार मिळायचा होता. आपल्या वडिलांच्या अकाली निधनाचे मोठे दुःख राजेशच्या हृदयात सलत होते. त्यांचे पारंपरिक आडनाव नागरथ होते. आपल्या वडिलांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांनी आपले नागरथ हे आडनाव बदलून रोशन ठेवले. वडिलांच्या स्मृतीसाठी आपले आडनाव बदलून वडलांचे नाव आडनाव म्हणून ठेवण्याचे हे दुर्मिळ उदाहरण असावे. आणि खरोखरच रोशन यांचे नाव राजेश रोशन, राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांनी ' रोशन ' केले.
राजेश हे अत्यंत प्रतिभावान संगीतकार. ७० ते ८० च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत संगीतकार कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन यासारखे दिग्गज संगीतकार कार्यरत होते त्यावेळी राजेश रोशन यांनी चित्रपट संगीत क्षेत्रात प्रवेश केला. बघता बघता आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने श्रोत्यांची मने जिंकली आणि चित्रपट सृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. महान विनोदी अभिनेता मेहमूद या सुमारास आपल्या ' कुंवारा बाप ' या चित्रपटाची निर्मिती करीत होते. त्यांना त्यातील ' सज रही गली मेरी मां ' या गीतासाठी उत्तम धून देणारा संगीतकार हवा होता. त्यांना कुणीतरी राजेश रोशन यांचे नाव सुचवले. मेहमूद यांनी राजेश यांना बोलावून घेतले आणि त्यांना त्या गाण्यासाठी धून तयार करण्यास सांगितली. राजेश यांनी अल्पावधीतच त्याची चाल तयार करून मेहमूद यांना ऐकवली. ती ऐकून मेहमूद एवढे खुश झाले की त्यांनी आनंदाने राजेश यांना मिठी मारली. मग ' कुंवारा बाप ' या चित्रपटाची गाणी अर्थातच राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केली. या चित्रपटातील किशोर कुमार आणि लतादीदींच्या आवाजातील ' आ री निंदिया...' या लोरी गीताने तर रसिकांच्या काळजाला हात घातला. हे गीत ऐकताना वात्सल्य आणि ममतेचा तो स्वर ऐकून नकळत डोळे पाणावतात. तर ' मैं हूँ घोडा ये है गाडी...' या गाण्यात किशोर कुमार यांच्या गायकीचा अतिशय सुंदर वापर राजेश यांनी करून घेतला आहे.
पण राजेश रोशन यांना संगीतकार म्हणून खरी ओळख मिळवून दिली ती १९७५ मध्ये आलेल्या ' जुली ' चित्रपटाने. या चित्रपटातली सगळी गाणी लोकप्रिय झाली. लतादीदींच्या आवाजातील ' ये राते नयी पुरानी..'आजही रसिकांच्या ओठांवर आहे. तर ' दिल क्या करे ', ' भूल गया सब कुछ ', ' माय हार्ट इज बीटिंग ', ' साचा नाम तेरा ' ही गाणी आजही मोठ्या आवडीने ऐकली जातात. ' जुली ' नंतर राजेश रोशन यांना एकामागून एक उत्तम चित्रपट मिळतच गेले. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायिलेली अनेक चित्रपट गीते आहेत. पण त्यांना पहिल्यांदा गीत गाण्यासाठी राजी केले ते राजेश रोशन यांनी. अमिताभ यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे, ' मैं गा नही सकता. आप मुझसे गाना मत गवाइये ऐसा मैने बार बार कहा. लेकिन राजेशजी ने मेरी एक न मानी. ' मि. नटवरलाल ' या १९७९ मध्ये आलेल्या चित्रपटातील ' मेरे पास आओ मेरे दोस्तो..' हे गीत अमिताभ यांच्याकडून गाऊन घेतले. अमिताभ यांच्या गीतात हे गीत आजही वरच्या क्रमांकावर आहे. गायकाच्या प्रतिभेचा सर्वोत्तम वापर करून घेणं हे राजेश रोशन यांचं वैशिष्ट्य ! लतादीदींनी एकशे बत्तीस गाणी राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनात गायली आहेत. किशोरकुमार हा तर हरहुन्नरी आणि अवलिया कलाकार. त्याच्या प्रतिभेचा वापर अनेक गाण्यात राजेश रोशन यांनी करून घेतला. मग ती कुंवारा बाप मधील गाणी असोत की ' दो और दो पाँच ' मधील अमिताभवर, शशीकपूर, हेमा मालिनी आणि परवीन बाबी यांच्यावर चित्रित ' तुने अभी देखा नही ..' या गाण्यात किशोर कुमार यांच्या अफलातून गायकीची कमाल आपल्याला अनुभवता येते.
संगीतकार म्हणून राजेश रोशन यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. आशा भोसले सारख्या अष्टपैलू गायिकेकडून त्यांनी ' खेल ' चित्रपटात ' इडली डू ...' हे कॅब्रे गीत आणि तेच गाणं भजन स्वरूपात गाऊन घेतलं. तसंच ' लूटमार ' चित्रपटातलं ' जब छाये मेरा जादू..' हे गाणं. ' इन्कार ' मधलं उषा मंगेशकरांच्या आवाजातील ' मुंगडा मुंगडा ' तर रसिकांना ठेका धरायला लावणारं. ' कामचोर ' मधलं ' तुमसे बढकर दुनिया में ..' हे ही असंच एक अप्रतिम गीत. अशी खूप गाणी राजेश रोशन यांनी दिली. त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये बासरी, तबला, हार्मोनियम, दिलरुबा, सारंगी, बोन्गो, कोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आदी वाद्यांचा सुरेख वापर केला. भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा सुरेख संगम त्यांच्या गीतांमध्ये पाहायला मिळतो. या विविध वाद्यांच्या माध्यमातून अवीट गोडीची सुरावट आणि सहज गुणगुणता येतील अशा चाली देणे हे राजेश रोशन यांच्या संगीताचे वैशिष्ट्य. किशोर कुमार, लता मंगेशकर, मो रफी, आशा भोसले यांच्यापासून तर अगदी आजच्या उदित नारायण, अलका याज्ञीक, कुमार सानू, लकी अली, केके आदी गायकांकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली आहेत.
पण राजेश रोशन यांच्या आयुष्यातील एक काळ असाही आला होता की ज्यावेळी त्यांना काही काम मिळेनासं झालं होतं. अशा वेळी महेश भट्ट यांच्या ' डॅडी ' चित्रपटाने त्यांना हात दिला. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या तोंडी असलेली तलत अजीज यांच्या आवाजातील ' आईना मुझसे मेरी पहेली सी सुरत मांगे...' ही त्यांनी दिलेली गजल तर केवळ अप्रतिम ! हृतिक रोशन यांच्या लोकप्रियतेत राजेश रोशन यांच्या संगीताचा मोठा वाटा आहे. ' कहो ना प्यार हैं ' मधील त्यांची सगळी गाणी गाजली. राजेश रोशन यांच्या संगीताने स्वतः राजेश, राकेश रोशन आणि हृतिक रोशन या तिघांनाही लोकप्रियता आणि यश मिळवून दिले. स्वामी, देस परदेस, मि नटवरलाल, खून भरी मांग, करण अर्जुन, काला पत्थर, कहो ना प्यार हैं, कोई मिल गया, क्रिश, काईट्स, कोयला, दाग द फायर यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. जगप्रसिद्ध अशा ' टायटॅनिक ' चित्रपटातील धून चोरल्याच्या आरोपालाही त्यांना सामोरे जावे लागले. त्यांची काही लोकप्रिय गाणी अशी आहेत
परदेसीया ( मि नटवरलाल ), तुझ संग प्रीत लगाई सजना ( कामचोर ), दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया हैं ( आखिर क्यों ), माँ अब तो मैं भी ( उधार का सिंदूर ), आँखो मे काजल हैं , नजरों से कह दो, चल कहीं दूर निकल जाये ( दुसरा आदमी ), उठे सब के कदम ( बातों बातों में ), मेरे दिल मे जो होता हैं ( आप के दिवाने ), बाहो में तेरी मस्ती के ( काला पत्थर ), आओ मनाये जशने मोहोब्बत ( दुसरा आदमी ), आज का दिन ( लूटमार )
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२६/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा