मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग तेहेतीस

उगवतीचे रंग 

 भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग तेहेतीस 

निवडक पण दर्जेदार गीते देणारा संगीतकार : खय्याम 

चित्रपटगीतांचे दर्दी असणाऱ्या रसिकांना खय्याम हे नाव निश्चितपणे परिचित असणार. खय्याम यांची गीतं म्हणजे बावनकशी सोनं. हिणकस कुठेही आढळणार नाही. लतादीदींची संगीत कारकीर्द म्हणजे आकाशाचा एक विस्तीर्ण पट म्हटला तर निरनिराळ्या संगीतकारांची लखलखती नक्षत्रे आपल्याला या आकाशात चमकताना दिसतील. या नक्षत्रांमध्ये आपल्या तेजाने लक्ष वेधून घेणारे एक नक्षत्र म्हणजे संगीतकार खय्याम. 

लतादीदींना एका मुलाखतीमध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी विचारले की तुम्ही आजपर्यंत हजारो गाणी गायलीत. या सगळ्या गाण्यांमध्ये तुम्हाला सर्वात जवळचं वाटणारं गाणं कोणतं ? दीदी म्हणाल्या, ' तशी तर मला खूप गाणी आवडतात. पण मी जेव्हा एकटी असते किंवा प्रवासात असते तेव्हा ' रझिया सुलतान ' मधलं ' ऐ दिले नादान...' हे गाणं गुणगुणायला मला खूप आवडतं. ' दीदींचं हे उत्तर ऐकून जावेद अख्तर खुश झाले कारण या गाण्याचे गीतकार होते जावेद अख्तर यांचे वडील जां निसार अख्तर आणि संगीतकार होते खय्याम. खय्याम म्हटलं की चित्रपट रसिकांसमोर त्यांचे नुरी, त्रिशूल, बाजार असे अनेक संगीतमय चित्रपट डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागतात. पण प्रामुख्याने डोळ्यापुढे येतात ते म्हणजे ' कभी कभी ' आणि ' उमराव जान. ' या दोन्ही चित्रपटातील गाणी म्हणजे खय्याम यांचे मास्टरपीस. 

लता मंगेशकर आणि आशा भोसले या खैय्याम यांच्या अतिशय आवडत्या गायिका. एका ठिकाणी त्यांच्याबद्दल खैय्याम म्हणतात,' या दोन्ही बहिणींबद्दल काय बोलावं ? एक संगीताची पट्टराणी तर दुसरी संगीताची महाराणी. ' काही वर्षांपूर्वी खय्याम यांना पं हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ' जगभरात खय्याम यांच्या नावाचा जो डंका वाजतो, ते नाव मोठे होण्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन नावांचा मोठा वाटा आहे. लता मंगेशकर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत पण मी त्यांना ' माँ ' म्हणूनच हाक मारतो. देवानेच त्यांना मोठी पदवी देऊन पाठवले आहे. ' लतादीदींबद्दल यापेक्षा सुंदर आणि उदात्त उद्गार कोणते असू शकतील ! 

खय्याम यांची चित्रपट संगीताची कारकीर्द तशी साठ वर्षांची. पण एवढ्या प्रदीर्घ कालावधीत या माणसाने अवघे ५३/५४ चित्रपट केले असतील. त्यांनी आपल्या संगीताच्या दर्जाशी कधीही तडजोड केली नाही. जे द्यायचे ते सर्वोत्तमच द्यायचे हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे या महान संगीतकाराच्या आयुष्यात काही काळ असा आला की दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडावी. त्यांच्या पत्नी म्हणजे प्रसिद्ध गायिका जगजीत कौर. जगजीत कौर या अत्यंत श्रीमंत अशा पंजाबी कुटुंबातून आलेल्या. त्यांच्या आणि खय्याम यांच्या  संगीताच्या कार्यक्रमामुळे भेटी झाल्या. दोघांचे सूर जुळले आणि दोघे एकमेकांचे जीवनसाथी बनले. त्यांच्या विवाहाच्या आड त्यांचा धर्म, पैसा काही काही येऊ शकले नाही. जगजीत कौर आणि खय्याम म्हणजे जणू ' मेड फॉर इच ऑदर ' दोघांनी एकमेकांना सांभाळले, एकमेकांची प्रतिष्ठा जपली. २०१३ मध्ये खैय्याम यांच्या प्रदीप या मुलाचे अत्यंत दुःखद आणि अकाली निधन झाले. तो काळ या दोघांसाठी अतिशय वेदनादायी होता. पण जगजीत कौर यांनी प्रत्येक परिस्थितीत खैय्याम यांची साथ दिली. जगजीत कौर यांनी ' तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे देदो ' हे ' शगुन ' चित्रपटातलं गाणं जणू खय्याम यांच्यासाठीच गायलं असं त्यांचं खैय्याम यांच्या प्रति असलेलं समर्पण आणि निष्ठा पाहून म्हणावसं वाटतं. 

मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी हे पूर्ण नाव असलेल्या खैय्याम यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२७ रोजी पंजाबातल्या नवांशहर जिल्ह्यात झाला. इतर बऱ्याचशा कलंदर संगीतकारांप्रमाणे खैय्याम यांचेही शिक्षणात मन लागत नव्हते. चित्रपट पाहण्यासाठी ते घरातून पळून जात. आपणही चित्रपट अभिनेता व्हावे ही त्यांच्या मनातली सुप्त इच्छा होती. त्यांच्या घरच्यांचे आणि त्यांचे या गोष्टीवर कधीच एकमत झाले नाही. खैय्याम यांचे एक काका तेव्हा दिल्लीत राहत होते. खैय्याम यांनी घरून पळ काढला तो थेट आपल्या काकांकडे ते गेले. काका अतिशय चांगले होते. त्यांनी खय्याम यांची समजूत घालून त्यांना शाळेत घातले. त्यावेळी ते फार तर दहा वर्षांचे असतील. खैय्याम यांनी कसंबसं आपलं पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. काकांनी त्यांची गाण्याची आवड ओळखली आणि त्यांना संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. प्रख्यात संगीतकार हुस्नलाल भगतराम आणि त्यांचे मोठे बंधू पं अमरनाथ यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. पुढे प्रख्यात पाकिस्तानी गायक आणि संगीतकार बाबा चिश्ती यांच्याकडेही संगीताचे धडे त्यांनी गिरवले. 

संगीताची मुळातच आवड असणाऱ्या खय्याम यांचा शास्त्रीय संगीताचा पाया आता मजबूत झाला होता. पण त्यांना काम मिळत नव्हते. तो काळ दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीचा होता. खैय्याम यांनी त्या काळात सैन्यात भरती होऊन तीन वर्षे सेवा दिली. पण सैन्यातल्या बंदुका, तोफा हाताळण्यापेक्षा निरनिराळी वाद्ये हाताळण्याची ओढ खैय्याम यांना स्वस्थ बसू देत नव्हती. १९४६ मध्ये ते मुंबईत आले. ज्यांनी सुरुवातीला त्यांना संगीत शिकवलं अशा हुस्नलाल भगतराम या संगीतकार बंधूंना भेटले. त्यांच्या ओळखीने त्यांना जोहराबाई अंबालीवाला यांच्यासोबत युगलगीत गाण्याची संधी मिळाली. काही काळ त्यांनी अजीज खान आणि हुस्नलाल भगतराम यांचे संगीत सहाय्यक म्हणून काम केले. पुढे त्यांना ' हीर रांझा ' या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांच्यासोबत रेहमान या नावाचे आणखी एक संगीतकार होते. या दोघांनी ' शर्माजी आणि वर्माजी ' या नावाने जवळपास पाच चित्रपटांना संगीत दिले. पुढे शर्माजी-वर्माजी जोडीतील वर्माजी म्हणजे रेहमान पाकिस्तानात निघून गेले. 

या नंतर झिया सरहद्दीनी त्यांना ' फूटपाथ ' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली. झिया सरहद्दीनी सांगितल्यानुसार तेव्हापासून ' खय्याम ' या नावाने संगीतकार म्हणून काम करू लागले आणि हिंदी चित्रपटसृष्टीला ' खैय्याम ' नावाचा अद्वितीय संगीतकार मिळाला. नंतर प्रख्यात अभिनेता राज कपूर यांचा ' फिर सुबह होगी ' हा चित्रपट त्यांना मिळाला. त्यांच्या संगीत कारकिर्दीची देखील ती खऱ्या अर्थाने सुबह म्हणजे पहाट ठरली. खय्याम आणि गीतकार साहिर या जोडीने या चित्रपटात अप्रतिम गीते दिली. नंतर आलेल्या ' शोला और शबनम ' या चित्रपटात खय्याम यांनी गीतकार कैफी आजमी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटाची सगळी गाणी हिट ठरली. खैय्याम यांना एकामागून एक चित्रपट मिळत गेले. पण निवडक चित्रपटच त्यांनी घेतले. चित्रपटाचा साहित्यिक दर्जा, मूल्ये इ गोष्टींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांची गाणी तर हिट होत होती. पण चित्रपट समीक्षकांचा त्यांच्यावर आरोप होता की त्यांचे चित्रपट सिल्व्हर ज्युबिली होत नाहीत. त्यांच्या ' कभी कभी ' आणि ' उमराव जान ' या चित्रपटांनी मात्र त्यांना एवढे अभूतपूर्व यश दिले की टीकाकारांची तोंडे आपोआप बंद झाली. या चित्रपटांच्या गाण्यांनी सगळे रेकॉर्ड्स तोडले. 

' उमराव जान ' या चित्रपटाला संगीत देताना ते थोडे घाबरले होते. त्याचे कारण म्हणजे त्याच्या काही दिवस आधीच तशीच पार्श्वभूमी असलेला ' पाकिजा ' हा मीनाकुमारी आणि राजकुमार यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील गाणी हिट झाली होती. त्यांना साधारणपणे तशीच गणिकेची पार्श्वभूमी असणाऱ्या ' उमराव जान ' या चित्रपटाला संगीत द्यायचे होते. खय्याम यांनी त्यासाठीच्या तयारीत कोणतीच कसर ठेवली नाही. त्या काळातील लोकजीवन, संगीत आदी सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. ' उमराव जान ' हा चित्रपट ' उमराव जान अदा ' या कादंबरीवर आधारित होता. तिचा अभ्यास केला. त्यांच्या कठोर परिश्रमांना यश आले. ' उमराव जान ' मधील सगळी गाणी ऑल टाइम हिट ठरली. गायिका आशा भोसले यांनी या गाण्यांचे आणि अभिनेत्री रेखा यांनी त्या भूमिकेचे सोने केले. 

खैय्याम यांनी आपल्या संगीतात राग पहाडी, राग यमन यांचा अत्यंत चपखलपणे वापर केला. त्यांची गाणी जणू जखमेवर हळुवार फुंकर घालणारी ! फुलांच्या ताटव्यावरून येणारी शीतल, सुगंधी हवेची झुळूक ! लतादीदींच्या आवाजातील सौंदर्य खैय्याम यांच्या संगीतात विशेष खुललं. शंकर हुसैन या चित्रपटातील लतादीदींच्या आवाजातील कहीं एक मासूम नाजूक सी लडकी, आप यूं फासलों से गुजरते रहे आणि अपनी आप रातोमे ही तिन्ही गाणी अप्रतिम. ' अपनी आप रातों में ... ' हे गाणं तर आपल्याला एका वेगळ्या ट्रान्समध्ये घेऊन जातं. या गाण्यांचा उल्लेख उदाहरणादाखल केला आहे. त्यांच्या संगीत निर्देशनात  दीदींनी गायलेली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. त्यातील काही पुढे देणारच आहे. 

खैय्याम यांना आपल्या संगीतातील योगदानासाठी लता मंगेशकर पुरस्कार, नौशाद सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार इ पुरस्कार मिळाले. तीन वेळा ते फिल्म फेअर पुरस्काराचे मानकरी ठरले. २०११ मध्ये ते पदमभूषण पुरस्काराने सन्मानित झाले. खैय्याम हा अतिशय जिंदादिल माणूस होता आणि तशीच त्यांची गाणीही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जवळपास दहा ते बारा कोटींची संपत्ती नवोदित कलाकारांसाठी असलेल्या ट्रस्टला दान केली. २०१३ मध्ये खैय्याम यांचे निधन झाले. पण आपल्या संगीतरूपाने ते सदैव आपल्यात असणार आहेत. त्यांची काही लोकप्रिय गाणी पुढे देत आहे. 

बहारों मेरा जीवन भी संवारो... ( आखरी खत ), कभी कभी मेरे दिल मे  ( कभी कभी ), आजा रे मेरे दिलबर आजा ( नुरी ), करोगे याद तो  ( बाजार ),  दिखाई दिये यु ( बाजार ), फिर छिडी रात ( बाजार ), ना जाने क्या हुआ ( दर्द ), मोहोब्बत बडे काम की चीज है ( त्रिशूल ), जाने मन तुम कमाल करती हो ( त्रिशूल ), सिमटी हुई ये घडिया ( चंबल की कसम ), जलता हैं बदन ( रजिया सुलतान ), हजार राहे ( थोडी सी बेवफाई ), तेरे चेहरे से नजर नही हटती ( कभी कभी )

( क्रमशः पुढील भाग बुधवारी )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
३०/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...