भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग बत्तीस
सुमधुर गीते देणारा संगीतकार : चित्रगुप्त
चित्रगुप्त यांनी अनेक अप्रतिम अशी मधुर गाणी चित्रपट सृष्टीला दिली. पण चित्रगुप्त हे पौराणिक हे नाव धारण करणाऱ्या या संगीतकाराच्या नशिबी तशी उपेक्षाच आली. कशी आणि का ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण सुरुवातीला जरा त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या.
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात १६ नोव्हेंबर १९१७ मध्ये जन्माला आलेल्या चित्रगुप्त यांचे पूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. पण ते चित्रगुप्त या नावानेच ओळखले जातात. चित्रगुप्त यांनी अर्थशास्त्रात एम ए केले होते शिवाय पत्रकारितेची पदवी घेतली होती. याशिवाय लखनौतील सुप्रसिद्ध भातखंडे संगीत विद्यालयातून संगीत शिक्षणही घेतले होते. काही काळ त्यांनी पाटणा येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले. उच्चशिक्षित आणि बुद्धिमान असलेल्या या तरुणाच्या डोळ्यात मात्र वेगळीच स्वप्ने आकार घेत होती. संगीताची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. काहीतरी वेगळे करावे आणि आपल्यातील संगीताच्या आवडीला सुयोग्य अशी दिशा द्यावी या उद्देशाने चित्रगुप्त आपले नशीब अजमावण्यासाठी इतर सर्वांसारखेच मायानगरी मुंबईत आले. १९४५ चा तो काळ होता.
ते ज्यावेळी मुंबईत आले तेव्हा स्टंट चित्रपटांची लाट आली होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीला काही स्टंट चित्रपटांना संगीत देण्याचे काम मिळाले. या काळात ते संगीतकार एस एन त्रिपाठी यांचे सहायक म्हणूनही राहिले. या प्रकारातील ' रॉबिनहूड ' हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. याशिवाय तो काळ धार्मिक आणि पौराणिक चित्रपटांचाही होता. चित्रगुप्त यांना तशा प्रकारचेही चित्रपट मिळाले आणि लवकरच त्यांची ओळख पौराणिक चित्रपटांना संगीतकार म्हणून होऊ लागली. ' तुलसीदास ' या १९५४ मध्ये आलेल्या चित्रपटातील त्यांनी संगीत दिलेले ' मुझे अपनी शरण मे ले लो राम ' हे गीत लोकप्रिय झाले. पण संगीतकार म्हणून ते खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते ' भाभी ' चित्रपटापासून. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली. पहाडी रागावर आधारित मो रफी यांनी गायिलेले ' चल उड जा रे पंछी ' ने रसिकांच्या हृदयाला हात घातला. तर ' भैरवी ' रागातील ' चली चली रे पतंग मेरी चली रे..' हे मो रफी आणि लतादीदींच्या आवाजातील युगलगीत लोकांना मनापासून आवडले. लतादिदींच्याच आवाजातले ' छुपा कर मेरी आँखोंको ...' हे अतिशय मधुर गीत आहे.
चित्रगुप्त आणि लतादीदींचा एक मजेदार किस्सा सांगितला जातो. एकदा स्टुडिओत येताना चित्रगुप्त लंगडत चालत येत होते. लतादीदींनी त्यांना पाहिले. त्या म्हणाल्या, ' चित्रगुप्तजी, आपके पैर मे कोई तकलीफ हैं क्या जो आप इस तरह चल रहे हैं ? ' यावर चित्रगुप्त म्हणाले, ' दीदी, मेरी चप्पल टुटी हुई हैं ..' दीदी म्हणाल्या, ' बस, इतनी सी बात. चलिये आज आपके लिये नयी चप्पल खरीदते हैं .' यावर चित्रगुप्त यांनी म्हटले, ' दीदी, ये चप्पल मेरे लिये लकी हैं. जिस दिन भी इसे पहनकर आता हूँ तो रेकॉर्डिंग बडी अच्छी होती हैं. ' यावर दीदी खळखळून हसल्या. त्या म्हणाल्या, ' चित्रगुप्तजी, आपको अपनी चप्पल पे यकिन हैं, मेरे गाने पर नहीं .' त्यांच्या संगीत निर्देशनात दीदींनी ' आकाशदीप ' या चित्रपटात गायिलेले ' दिल का दिया जला के गया ' हे गाणं लतादीदींच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे. या गाण्यातला दीदींचा कोमल, हळुवार स्वर आपल्याला एका वेगळ्याच मूडमध्ये घेऊन जातो. सर्व नामवंत गायकांबरोबर जवळपास आठशे ते साडेआठशे गीते संगीतबद्ध करणाऱ्या या संगीतकाराबरोबर दीदींनी २४८ गाणी गायली आहेत.
साठ सत्तरचे दशक म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात नौशाद, शंकर जयकिशन, एस डी बर्मन हे आघाडीचे संगीतकार होते. राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, शम्मी कपूर आदी आघाडीच्या अभिनेत्यांचे चित्रपट या दिग्गज संगीतकारांकडे होते. याशिवाय मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, रवी, हेमंत कुमार, सलील चौधरी, रोशन आदी संगीतकार देखील चित्रपट सृष्टीत मान्यता आणि प्रतिष्ठा पावलेले होते. या सगळ्यांमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या चित्रपट आणि गीतांमध्ये चित्रगुप्त यांनी अशा काही कौशल्याने आणि आपल्या संगीत प्रतिभेने रंग भरले की त्यांचे संगीत ,त्यांची गाणी ही त्यांच्या चित्रपटांपेक्षा लोकप्रिय ठरली. आपल्या ठेका धरायला लावणाऱ्या सुमधुर संगीताने त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी स्वतः काही अप्रतिम गाणी लिहिली आहेत. त्याचबरोबर प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, राजेंद्र कृष्ण, आनंद बक्षी, साहिर आदी गीतकारांकडून सुंदर गाणी लिहून घेतली.
कोणते चित्रपट आले चित्रगुप्त यांच्या वाट्याला ? त्यांच्या वाट्याला एकही ए ग्रेडचा चित्रपट आला नाही. वर उल्लेख केलेल्या आघाडीच्या एकाही अभिनेत्याचा चित्रपट त्यांना करायला मिळाला नाही. त्यांच्या वाट्याला आले ते सगळे बी आणि सी ग्रेडचे चित्रपट. पण हा महान संगीतकार कधी हताश, निराश झाला नाही. आपल्या प्रतिभेचा वापर करून तो उत्तमोत्तम गाणी देतच राहिला. त्यांची काही गाणी पाहिली तर मी असे का म्हणतो हे आपल्या लक्षात येईल. त्यांच्या ' भाभी ' आणि ' आकाशदीप ' चित्रपटातील गाण्यांचा उल्लेख मी वर केलाच आहे. पण इतर चित्रपटातील त्यांची काही अप्रतिम गाणी पाहू या.
' कोई बता दे दिल हैं जहाँ क्यूँ होता हैं दर्द वहाँ...' हे ' मैं चूप रहुंगी ' या चित्रपटातलं अप्रतिम गीत. लतादीदी आणि मो. रफी यांनी गायलेलं. हा चित्रपट १९६१ मध्ये आला. आज साठ वर्षे लोटली तरी या गीताची गोडी कमी झाली नाही. याच चित्रपटातलं ' चाँद जाने कहाँ खो गया ' हे ही असंच अप्रतिम गीत. ' काली टोपी लाल रुमाल ' या चित्रपटातलं ' लागी छुटे ना अब तो सनम...' , जबक चित्रपटातलं ' तेरी दुनिया से दूर...' हे असंच काळजाला हात घालणारं गाणं ही सगळी लतादीदींनी मो. रफींसोबत गायलेली युगलगीत. इतकी वर्षे लोटली तरी आजही टवटवीत आहेत. ' बरखा ' चित्रपटातलं मुकेश यांच्याबरोबरच ' एक रात में दो दो चाँद खिले ...' किशोरकुमार यांच्यासोबतच ' गंगा की लहरे ' चित्रपटातलं ' मचलती हुई हवामें छम छम...' याच चित्रपटातलं ' छेडो ना मेरी जुल्फे..' ही गाणी कधीही जुनी होणार नाहीत. लतादीदींनी गायिलेली काही सोलो गाणी बघा. कारे कारे बादरा ( भाभी ), तडपाओगे तडपाना हम तडप तडप कर भी... ( बरखा ), दगा दगा वै वै ( काली टोपी लाल रुमाल ), दिल को लाख संभाला जी ( गेस्ट हाऊस ), अखियन संग अखियां लागे आज ' राग मालकंस वर आधारित ' बडा आदमी ' चित्रपटातलं गीत, महेंद्र कपूर सोबतचं ' तुमने हंसी हंसी में दिल क्यूँ चुराया ' , वासना चित्रपटातील ' ये पर्बतों के दायरे ये शाम का धुआ ' ही गाणी पाहिल्यानंतर चित्रगुप्त यांच्या संगीताचं सौंदर्य आणि उच्च दर्जा लक्षात यायला हरकत नाही.
इतकी अप्रतिम गाणी देणारा हा गुणी संगीतकार उपेक्षित का राहिला हा मोठा प्रश्न आहे. त्यांना एखादाही फिल्म फेअर पुरस्कार मिळू शकला नाही. याचे कारण मी वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांना मिळालेले बी आणि सी ग्रेडचे चित्रपट. त्याचप्रमाणे जे आघाडीचे अभिनेते होते, त्यांचे चित्रपट न मिळणे हे ही एक कारण असू शकते. आपण पत्त्यांचा डाव मांडतो तेव्हा आपल्या हातात कोणते पत्ते यावेत हे आपल्या हातात नसते. पण जे काही पत्ते आपल्या वाट्याला आलेत, त्यांच्या मदतीने आपला खेळ सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते. तेच चित्रगुप्त यांनी केले. नियतीने सर्वोत्तम चित्रपट त्यांच्या वाट्याला दिले नाहीत पण जे चित्रपट त्यांना मिळाले, त्यातील गाणी देताना त्यांनी आपले जे सर्वोत्तम आहे ते दिले. म्हणूनच त्यांची गाणी सदाबहार आहेत, सदाबहार राहतील. चित्रगुप्त १४ जानेवारी १९९१ ला हे जग सोडून गेले. त्यांच्या संगीताचा वारसा त्यांची मुले आनंद - मिलिंद हे उत्तम प्रकारे चालवत आहेत. आपल्या मधुर गाण्यांची टिकून राहिलेली लोकप्रियता आणि मुलांचे यश पाहून स्वर्गातून हा चित्रगुप्त नक्कीच समाधानी असेल.
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा