भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणतीस
सदाबहार गीते देणारा संगीतकार -गायक : हेमंत कुमार
१९६२ सालची गोष्ट. लतादीदी आता सुप्रतिष्ठित गायिका म्हणून चित्रपटसृष्टीत स्थिरावल्या होत्या. अशा वेळी एक अनपेक्षित संकट आले. त्या अचानक अशा काही आजारी झाल्या की डॉक्टरांनी त्यांना तीनचार महिने विश्रांतीचा सल्ला दिला. त्यांची परिस्थिती अशी होती की त्या बेडवरुन उठू शकत नव्हत्या. डॉ म्हणाले की त्यांना डिफथेरिया नावाचा आजार झाला आहे. या आजारात घशाला संसर्ग होतो. एकाच वेळी दोन दोन आवाज निघतात. असंही म्हटलं जात होतं की त्यांच्यावर अन्नातून विषप्रयोग झाला आहे. पुन्हा पूर्वीप्रमाणे लतादीदी बऱ्या होऊन पूर्वीप्रमाणे गाऊ शकतील की नाही या चिंतेने दीदींसह साऱ्या कुटुंबियांना ग्रासले होते. चित्रपट निर्मात्यांची तर झोप उडाली होती. दीदींच्या गाण्यांशिवाय तर वितरक चित्रपटांना हात लावत नसत. निरनिराळ्या अफवांनाही ऊत आला होता. अशा परिस्थितीत यशाच्या शिखरावर असणारा दुसरा एखादा कलाकार खचून गेला असता. पण दीदींजवळ दुखण्याला हरवण्याचा आत्मविश्वास होता. बाह्य गाणं जरी बंद झालं होतं तरी दैवी सूर अंतरात निनादत होताच. यापूर्वीही लहानपणी देवीचा आजार झाला असताना त्यांना श्री मंगेशाच्या कृपेने आणि बाबांच्या ( मा दीनानाथ ) आशीर्वादाने तारले होते. आताही दीदींचा या चमत्कारिक शक्तींवर दृढ विश्वास होता.
साधारण चार महिन्यानंतर दीदींनी गाऊन पाहिले तर उत्तम सूर लागत होता. पण रेकॉर्डिंग करताना सूर लागला नाही, काही त्रास झाला तर काय करायचं ही काळजी होतीच. अशाच वेळी गायक आणि संगीतकार असलेले हेमंत कुमार दीदींसाठी गाण्याची ऑफर घेऊन आले. हेमंत कुमार हे दीदींपेक्षा वयाने मोठे होते शिवाय दीदींची काळजी वाहणारे होते. त्यांनी दीदींच्या आईंना शब्द दिला की काही काळजी करू नका. सगळं माझ्यावर सोपवा. दीदींना काही झालं तर मी स्वतः त्यांना घेऊन येईन. दीदी त्यांच्यासोबत स्टुडिओत गेल्या. परमेश्वर कृपेने अडचण तर काहीच आली नाही. रेकॉर्डिंग निर्विघ्नपणे पार पडलं. आश्चर्य म्हणजे आजारातून उठल्यावर मूळच्याच तेजस्वी असलेल्या दीदींच्या सुरांना आणखी धार चढली होती, त्यांचं तेज वाढलं होतं. जे गाणं रेकॉर्ड झालं ते प्रचंड गाजलं. ते गाणं होतं ' कही दीप जले कहीं दिल...' आणि चित्रपट होता ' बीस साल बाद . '
आज साठी सत्तरीच्या घरात असणाऱ्या चित्रपट रसिकांना हेमंतदा यांची जादुई स्वर असलेली आणि काळजाला भिडणारी गाणी सहज आठवत असणार. त्या काळात तर तरुणांवर जणू त्यांच्या गाण्यांनी गारुड केले होते. एखादा कार्यक्रम असला आणि एखाद्या तरुणाला गाण्याचा आग्रह झाला तर त्याला गाता येवो वा न येवो सहजच त्याच्या ओठांवर यायचं ' तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार हैं ...', आणि ' जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला ', ' ये नयन दरे दरे..', ना तुम हमे जानो ...' ' छुपा लो दिल में ...' यासारखी कितीतरी गाणी तरुणाईच्या मनात रुंजी घालत असत. ' तुम पुकार लो..' गाण्याची सुरुवात बघा किती छान ' हमिंग साऊंड ' ने झालीय.
हा ' हमिंग साउंड म्हणजे हेमंतदा यांचं वैशिष्टयच किंवा अगदी योग्य इंग्रजी शब्दात सांगायचं झालं तर ती हेमंतदा यांची ' सिग्नेचर स्टाईल. ' याच सिग्नेचर स्टाईलचा वापर त्यांनी ' आनंदमठ ', जाल ' या चित्रपटातील गाण्यात केला होता. ' तुम पुकार लो...' या गाण्याची शेवटी घातलेली ती हळुवार शीळ ऐका. एकूणच हेमंतदांची गाणी थेट काळजाला हात घालतात. प्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांनी तर हेमंतदांच्या आवाजाबद्दल एकदा म्हटलं होतं की परमेश्वराला जर कधी गायची इच्छा झाली तर तो हेमंत कुमारांच्याच आवाजात गाईल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हा ' ईश्वरी आवाज ' आहे. लतादीदी एकदा त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या की हेमंतदांचं गाणं म्हणजे मंदिरात बसून एखादा साधू किंवा पुजारी गाणं गातो आहे असं वाटतं. असा हा भावविभोर करणारा पवित्र स्वर आहे !
हेमंतदांचा जन्म १६ जून १९२० चा. जन्मस्थळ वाराणसी. बंगाल मधील एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं. लहानपणी गावात येणारी नाटकं, बंगाली लोकगीतं ऐकत हेमंतदा मोठे झाले. कॉलेजचं शिक्षण कोलकत्याला झालं. त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता पण मन मात्र संगीताकडे ओढ घेत होतं. साहित्यक्षेत्रातही हेमंतदांना रस होता. नाटक, कथा, गीतं ते लिहीत असत. हेमंतदांनी उस्ताद फैयाज खान यांच्या शिष्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. पण ईश्वरदत्त प्रतिभेमुळे संगीत आणि गाणं त्यांच्या रोमारोमात होतं. त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ संगीतकार म्हणून स्वतःला संगीतक्षेत्रात झोकून दिलं. त्यांच्या घरच्या मंडळींचा या क्षेत्रात जाण्यासाठी विरोध होता पण हेमंतदांनी आपली आवड अधिक महत्वाची मानली आणि आपण निवडलेले संगीत क्षेत्र हे योग्यच होते हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले.
त्यांनी अनेक बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिलं आणि पार्श्वगायक म्हणून गाणीही गायली. असं म्हटलं जातं की बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांच्या तोडीचा महान गायक कोणी झाला नाही. चाळीसच्या दशकात हेमंतदा मुंबईत आले. मुंबईत त्यांची गाठ सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांच्याशी पडली. त्या काळी सुप्रसिद्ध गायक असलेले के एल सैगल यांचा प्रभाव सर्वांवर होता. हेमंतदांनी नौशाद यांना सैगल यांची गाणी म्हणून दाखवली. नौशाद त्यांचा आवाज ऐकून खुश झाले आणि त्यांनी हेमंतदांच्या आवाजात त्याच सुमारास दोन गाणी रेकॉर्ड केली. ' शबाब ' चित्रपटातलं ' चंदन का पलना रेशम की डोरी ' आणि ' इन्साफ की डगर पे‘ बच्चों दिखाओ चलके...’ हे ‘गंगा जमना’ या चित्रपटातील गीत. ही दोन्ही गाणी लोकप्रिय ठरली.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हेमंतदानाही उत्तम ब्रेक मिळाला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर ' आनंदमठ ' या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी हेमंतदांवर होती. त्यांनी या संधीचे सोने केले. या चित्रपटातील 'वंदे मातरम ' हे लतादीदींच्या आवाजातील गीत कमालीचे लोकप्रिय झाले. आजही हे गीत विशेष प्रसंगी खास म्हणून गायलं जातं. अंगावर रोमांच उभे करण्याची ताकद या गीतात आहे. गुरुदत्तनिर्मित ' जाल ' चित्रपटातील ' ये रात, ये चांदनी फिर कहाँ ..' हे त्यांचं गीत लोकप्रिय झालं. सोपवली. नंतर गुरुदत्त यांचा ' प्यासा ' चित्रपट आला. या चित्रपटातील त्यांनी गायिलेले ' जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला ' हे गीत रसिकांच्या ओठांवर खेळू लागले.
1954 मध्ये आलेल्या ‘नागिन’ चित्रपटाचे संगीत रसिकांच्या हृदयात आजही घर करून आहे. त्यात एक गाणे होते ‘मन डोले मेरा तन डोले.’ त्यात पुंगीचा आवाज ऐकू येतो. खरे तर तो पुंगीमधून आलेला आवाज नव्हता तर यासाठी हेमंत कुमार यांनी एक युक्ती लढवली होती. क्ले व्हायोलिनचे साधक कल्याणजी आणि हार्मोनियमचे मास्टर रवी यांना बसवून त्यांच्याकडून हे संगीत तयार करून घेतले होते.या गाण्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. हेमंतदा हे संगीतात नवनवीन प्रयोग करणारे प्रयोगशील संगीतकार होते. पुढे गुरुदत्त यांनी ' साहिब बीबी और गुलाम ' या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी हेमंतदांवर सोपवली. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली. या चित्रपटात हेमंतदांनी आशा भोसले, गीतादत्त या गायिकांना पण संधी दिली. या कालावधीत हेमंतदा एक उत्कृष्ट संगीतकार आणि गायक म्हणून नावारूपाला आले होते. ते एवढे व्यस्त होते की दररोज ते मुंबई ते कोलकाता असा विमान प्रवास करीत असत. एअर इंडियाने तर त्यांना डेली पॅसेंजर म्हणून किताब दिला होता.
१९६० च्या दशकात जेव्हा फिल्मिस्तान स्टुडिओ बंद पडण्याच्या मार्गावर होता, तेव्हा हेमंतदांनी ' गीतांजली ' स्टुडिओची निर्मिती करून त्यामार्फत संस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली. त्यांना रहस्यमय चित्रपटांची आवड होती. त्यांची अशाच प्रकारची ' बीस साल बाद ' मधील ' कहीं दीप जले कहीं दिल, ' कोहरा ' मधील ' झूम झूम ढलती रात ' या सारखी गाणी रसिक विसरू शकणार नाहीत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांमध्ये ' आनंदमठ ', ' दुर्गेशनंदिनी ' , ' नागिन ', ' ' ताज ', साहिब बीवी और गुलाम ', बीस साल बाद ' बिन बादल बरसात, कोहरा, मिस मेरी, खामोशी इ चित्रपट प्रमुख आहेत. खामोशी चित्रपटाने तर त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. या चित्रपटातील लतादीदींच्या आवाजातील ' हमने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू ' हे गाणं म्हणजे मास्टरपीसच ! कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. याच चित्रपटातील हेमंतदांचं ' तुम पुकार लो..' आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील ' वो शाम कुछ अजीब थी ..' या गाण्यांबद्दल काय बोलावं. ही सगळीच सदाबहार गाणी आहेत. हेमंतदांना आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. त्यात फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. गायक म्हणून, संगीतकार म्हणून मिळाले आहेत. रवींद्र भारती विश्वविद्यालयाची सन्माननीय डी लिट आहे.
लतादीदी या हेमंतदांच्या आवडत्या गायिका होत्या. हेमंतदांनी आपल्या संगीत कारकिर्दीत सर्वच श्रेष्ठ गायकांकडून गाणी गाऊन घेतली आहेत. लेखात बऱ्याच गाण्यांचा उल्लेख आलाच आहे. त्यांची काही लोकप्रिय गाणी पुढे देत आहे. याद किया दिल ने ( पतिता ), ये रात ये चांदनी ( जाल ), जाग दर्द ए इश्क जाग ( अनारकली ), नैन से नैन ( झनक झनक पायल बाजे ), ओ नींद न मुझको आये ( पोस्ट बॉक्स ९९९ ), इतना तो कह दो हमसे ( सहेली )
हेमंत कुमार यांनी काही निवडक मराठी गाणी देखील गायली आहेत. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील ' गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ' तसाच लतादीदींसोबत असलेलं ' मी डोलकर डोलकर दर्याचा राजा ' ही गाणी कमालीची लोकप्रिय झाली. दर्यावरी रं ,
प्रीतीच्या चांदराती, प्रीती तुझी मनमोहिनी ही त्यांची मराठी भावगीते देखील लोकप्रिय आहेत.
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा