उगवतीचे रंग
घे भरारी...
२००३ मध्ये सीबिस्किट या नावाचा एक इंग्रजी चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला आणि त्यासंबंधी माहिती शोधू लागलो. तर मला त्याच्या कथानकाबद्दल थोडक्यात जी माहिती मिळाली, ती अतिशय प्रेरणादायी वाटली. हा चित्रपट घोड्यांच्या शर्यतीवर आधारित आहे. लॉरा हिलेनब्रँड यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. सीबिस्किट हा एक लहान चणीचा असलेला अश्व या चित्रपटात दाखवला आहे. टोबी मॅग्युअर, जेफ ब्रिजेस आणि ख्रिस कुपर हे कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे कथानक थोडक्यात असे. सीबिस्किट हा लहान चणीचा असलेला अश्व शर्यतीत दौडावा म्हणून सुरुवातीला त्याला सराव दिला जातो. जॉकी रेड अर्थात टोबी हा त्याच्याकडून सराव करवून घेतो. छोट्या शर्यतीत भाग घेणं, लहान लहान अडथळे सहज पार करणं, जॉकीसह अडथळ्यांवरून वेगाने झेप घेऊन अंतर पार करणं हे सगळं पाहताना सीबिस्किट आणि टोबी जसे आपापल्या भूमिकेशी एकरूप होतात, तसेच प्रेक्षक म्हणून आपणही त्यात गुंतत जातो आणि पुढे काय घडणार याची उत्कंठा आपल्याला खिळवून ठेवते.
पण एकदा एक अपघात घडतो. त्या अपघातात जॉकी रेड अर्थात टोबी आणि त्याचा आवडता घोडा सीबिस्किट जबर जखमी होतो. दोघांच्याही पायाला मार लागलेला असतो. एक वेळ टोबी बरा होऊन पुन्हा शर्यतीत भाग घेऊ शकेल अशी शक्यता स्वतः टोबीसह सगळ्यांना वाटत असते, पण पाय दुखावल्यामुळे जायबंदी झालेला सीबिस्किट पुन्हा शर्यतीत भाग घेऊ शकेल का आणि भाग घेतला तरी शर्यत जिंकू शकेल का अशी रास्त शंका सगळ्यांच्या मनात असते. पुन्हा हळूहळू सराव सुरु होतो, आणि मग एके दिवशी स्पर्धेला सुरुवात होते. स्पर्धा सुरु झाल्यावर सीबिस्किट अपेक्षेप्रमाणे मागे पडतो. सगळ्यांना वाटते की आता याचे काही खरे नाही. पण अचानक सीबिस्किटचा वेग वाढतो. तो हळूहळू आपल्यापुढे धावत असणाऱ्या अश्वांना मागे टाकत जातो. या शर्यतीत वॉर ऍडमिरल सारखे नामांकित अश्व सहभागी झालेले असतात. पण आपला हा सीबिस्किट भरारी घेतो, आणि शेवटी शर्यतीत पहिला येऊन शर्यत जिंकून साऱ्यांचीच वाहवा मिळवतो.
हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटतो कारण तो सत्यकथेवर आधारित आहे. तो प्रेक्षकांना आपलासा का वाटतो, याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे हा घोडा म्हणजेच सीबिस्किट आता संपला, आता तो काही कामाचा नाही असं प्रेक्षकांना वाटत असतानाच तो उसळी घेतो. आणि शर्यतीत नामांकित अश्व सहभागी झालेले असताना तो त्यांना मागे टाकून शर्यत जिंकतो. पराभवाने, अपयशाने खचून न जाता, ठरवले तर अशक्य वाटणारी गोष्टही आपण साध्य करू शकतो असा संदेश हा चित्रपट आपल्याला देतो. आणि दुःखाने खचलेल्या, निराश झालेल्या मनांना उभारी देण्याचं काम करतो. आज कोरोनामुळे अवघं जग हतबल झालं असताना, त्यामुळे खचून न जाता पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा हे कथानक निश्चितपणे आपल्याला देईल असं मला वाटतं . या सगळ्या निराशाजनक परिस्थितीतून पुन्हा एक बलवान राष्ट्र म्हणून उभं राहू. आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यातूनही मार्ग काढण्यात यशस्वी होऊ अशी खात्री मला वाटते. या ठिकाणी मला फिनिक्स पक्ष्याचे उदाहरण आठवते. फिनिक्स हा ग्रीक पुराणकथेतील गरुडासारखा दिसणारा एक पक्षी. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो नष्ट झालेला असताना राखेतून पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि भरारी घेतो. मानवी मनातील निरंतर आशेचे तो प्रतीक आहे. याच आशेची ज्योत आपल्या मनामनात सतत तेवत ठेवू या.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा