उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग तीन )
रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं आणि त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना कशी आणि का केली याची हकीगत मनोरंजक आहे. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. ते विद्वान आणि व्यासंगी होते. पण कोरडे पांडित्य त्यांच्याजवळ नावालाही नव्हते. एकदा बीरभूमीमध्ये ते काही कामानिमित्त आले होते. तेथून ते सुरूल या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बैलगाडीने निघाले. या रस्त्यावर वाटचाल करीत असताना त्यांना एक विस्तीर्ण असे मोकळे माळरान दृष्टीस पडले. या उघड्या माळरानावर दोन विशाल असे सप्तपर्णी वृक्ष त्यांना दिसले. दाट छाया असलेल्या या वृक्षांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. ते आपल्या बैलगाडीतून खाली उतरले. त्या विशाल वृक्षांच्या छायेत बसले. त्या वृक्षांच्या शीतल छायेत त्यांची जणू समाधीच लागली. विलक्षण शांतता अनुभवास आली. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही जागा अतिशय योग्य आहे असे त्यांना वाटले. त्यांनी मग तो चक्क ते माळरान विकतच घेतले. लवकरच त्यांनी त्या रम्य जागी एक छोटी एकमजली बंगली बांधली. ही जागा त्यांना शांतता देणारी वाटली म्हणूनच या बंगलीचं नाव त्यांनी शांतिनिकेतन ठेवलं. हा काळ साधारणपणे १८६३चा. बीरभूम जिल्ह्यात आणि आताच्या बोलपूर शहराजवळ हा शांतिनिकेतनचा परिसर येतो. कोलकात्याच्या उत्तरेस साधारणपणे १५२ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
त्या माळरानापासून जवळच एक किमी अंतरावर भुवनडांगा म्हणून एक छोटी वस्ती होती. पाचपंचवीस झोपड्या असलेल्या या वस्तीत प्रामुख्याने दरोडेखोर राहत होते. मोकळ्या माळावरची दोन सप्तपर्णीची झाडे म्हणजे या दरोडेखोरांचे वाटमाराचे ठिकाण होते. हे दरोडेखोर अत्यंत क्रूर आणि कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी एखाद्याची हत्या करण्यासाठी मागेपुढे पाहत नसत. पण ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या देवेंद्रनाथांना त्यांची कधीही भीती वाटली नाही. उपनिषदातील मा भै : हा मंत्र त्यांना केवळ माहितीच होता असे नाही तर त्यांनी तो अंगी मुरवला होता. ' मा भै : ' म्हणजे भिऊ नकोस. देवेंद्रनाथ त्या ठिकाणी नियमितपणे ध्यान करू लागले. सुरुवातीला त्या दरोडेखोरांनी केवळ उत्सुकतेच्या भावनेतून त्यांचे निरीक्षण केले. पण नंतर त्यांना वाटले की ही व्यक्ती इतरांपेक्षा काहीतरी वेगळी आहे. हळूहळू ते सुद्धा देवेंद्रनाथांच्या जवळ येऊन बसू लागले. आपली सुखदुःखे सांगू लागले. देवेंद्रनाथांच्या सात्विक आणि निरपेक्ष व्यक्तिमत्वाचा त्यांचा प्रभाव पडला. दरोडेखोरांचा म्होरक्या त्यांना शरण आला. सत्संगतीचा प्रभाव असा विलक्षण असतो. हळूहळू त्या दरोडेखारोनी आपला परंपरागत वाटमारीचा व्यवसाय सोडून दिला आणि ते कष्टाची कामे करून आपली उपजीविका करू लागले.
मग देवेंद्रनाथ आपल्यासोबत हळूहळू धाकट्या रवीला म्हणजेच रवींद्रनाथांना सोबत त्या ठिकाणी घेऊन येऊ लागले. रवींद्रनाथ त्या ठिकाणी प्रथम आले तेव्हा ते १०-१२ वर्षांचे असावेत. रवींद्रनाथांच्या विलक्षण प्रतिभेची चमक लहानपणापासूनच दिसू लागली होती. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी कविता करायला सुरुवात केली होती. आता शांतिनिकेतन या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या वडिलांच्या सान्निध्यात त्यांचे अनौपचारिक शिक्षण सुरु झाले.
मुलं कशी घडतात त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. रवींद्रनाथ आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत, इंग्रजी, उपनिषदे, खगोलशास्त्र इ. विषय तर शिकलेच पण आपल्या वडिलांकडून निसर्गाचे प्रेम त्यांनी घेतले. त्या निसर्गरम्य भागातील आत्म्याला प्रसन्नता देणारी शांतता त्यांनी अनुभवली. सकाळच्या वेळी झाडाच्या शेंड्यावर चालणारा सोनेरी सूर्यकिरणांचा मोहक खेळ, नदीचे सकाळच्या वेळी शांत असणारे पात्र, पक्ष्यांची किलबिल, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूर्व आणि पश्चिम क्षितिजावर होणारी विविध रंगांची उधळण त्यांना मोहून टाकत असे.
देवेंद्रनाथ पुढे उत्तर भारतात प्रवासाला गेले. या प्रवासात त्यांनी छोटया रवीला सुद्धा आपल्या बरोबर नेले होते. तेथून ते पुढे हिमालयात गेले. या प्रवासात रवीचे शिक्षण आपोआप घडत होते. निसर्गाचे निरीक्षण, वडिलांबरोबर केलेली विविध विषयांची मनमोकळी चर्चा यामुळे बालमनावर संस्कार घडत होते. हिमालयाची भव्यता, निसर्गातील शांतता आणि समृद्धता पाहून मन विशाल होत होते. संकुचितता, मनाचे मालिन्य आणि विचारांचे दारिद्र्य यांना कोठेही थारा नव्हता. चार भिंतींच्या शाळेत शिक्षण घेण्यापेक्षा निसर्गाच्या सहवासात प्राप्त झालेलं हे अनोखं आणि अनौपचारिक शिक्षण आनंददायी होऊ शकतं याची जाणीव त्यांना याच वयात झाली. त्यांच्या मनात असणारी ' शांतिनिकेतनची ' कल्पना इथूनच साकार व्हायला सुरुवात झाली. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे,चाळीसगाव
१६/०६/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा