उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ४ )
शांतिनिकेतनच्या स्थापनेमागील विचार
रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनची कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्व कसकसे समृद्ध होत गेले ते आपण गेल्या काही भागापासून पाहत आहोत. ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यांच्या शांतिनिकेतन मागील विचार आणि त्यांच्यातील शिक्षण विषयक भूमिकेचे आकलन होणार नाही. सुप्रसिद्ध नाटककार बर्नाड शॉने एका ठिकाणी असं म्हटलंय की माझ्या विकासाच्या आड प्रामुख्यानं काही आलं असेल तर ती म्हणजे माझी शाळा ! हे वाक्य आजही आपल्याला ऐकायला धक्कादायक वाटतं पण ते सत्य आहे. त्यांचेच समकालीन असलेल्या रवींद्रनाथ टागोरांचे विचारही असेच होते. रवींद्रनाथ म्हणतात, ' माझी शाळा संपल्यानंतरच माझे खरे शिक्षण सुरु झाले. ' आता हे सगळे वाचल्यानंतर आपला असा समज होण्याची शक्यता आहे की शाळा या आपल्या विकासाच्या आड येतात. त्यामुळे त्या बंद करायला हव्यात का ? अर्थात हा टोकाचा विचार झाला. सरसकट शाळांना दोष देण्यापेक्षा आपली जी प्रचलित शिक्षणपद्धती आहे, त्यात काही उपयुक्त सुधारणा करता येतील का ? अशा सुधारणा की ज्यातून माणूस घडेल, भारताचा भावी नागरिक सुदृढ घडेल. शिक्षणातून असा नागरिक घडावा की जो निसर्ग, देश आणि समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करू शकणारा असा असावा. त्यासाठीच आपण रवींद्रनाथ कसे घडत गेले हे पाहतो आहोत.
रवींद्रनाथांच्या घरात पिढीजात जमीनदारी होती. पण जमीनदारीचा अहंगंड आणि श्रेष्ठतेची गुर्मी नव्हती. रवींद्रनाथांनी लहानपणापासूनच आपल्यातील प्रतिभेचं दर्शन त्यांच्या वडीलधाऱ्यांना घडवलं होतं. काव्य, नाट्य, संगीत आदी कलांमधील त्यांची प्रतिभा भरारी घेत असतानाच त्यांचा वास्तवाशी परिचय व्हावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शहराकडून खेड्याकडे पाठवलं. शेतसारा वसुलीचं काम त्यांच्यावर सोपवलं. गोरगरीब असलेल्या कुळांकडे, छोट्या छोट्या शेतकऱ्यांकडे आणि मजुरांकडे ते आपल्या कामानिमित्त गेले. पण या छोट्या रवींद्रचे डोळे ग्रामीण जीवन कमालीच्या संवेदनशीलतेनं टिपत होते. या लोकांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, अनारोग्य आदी गोष्टींनी भरलेलं जग पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनशैलीमध्ये असलेली दरी त्यांनी अनुभवली.
त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांच्या असं लक्षात आलं की ही दरी इंग्रजी शिक्षणातून निर्माण झाली आहे. इंग्रंजांच्या सभ्यतेच्या कल्पना आणि त्यालाच सर्वस्व मानून त्याचे अनुकरण करणारा शहरी वर्ग या लोकांमधील दुरावा वाढवण्यास कारणीभूत आहे. ग्रामीण भागातील लोक आपल्या बोलीभाषेत बोलत असतील, ते भलेही अशिक्षित असतील पण त्यांच्याजवळही बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांची कमी नाही हे त्यांनी जाणले. माणसातील शहाणपणा केवळ पुस्तकी शिक्षणाने येत नाही. ग्रामीण भागातील लोक अशिक्षित, ग्राम्य भाषा बोलणारे असतील पण त्यांच्याजवळ अनुभवाने आलेले शहाणपण नक्कीच होते. ग्रामीण साहित्यात तर त्यांना साहित्यातील अभिजात सौंदर्याचे दर्शन घडत होते. ग्रामीण लोककला, साहित्य किती समृद्ध आहे हे त्यांनीच प्रथम साहित्यिकांच्या आणि जाणकारांच्या लक्षात आणून दिले. कोलकात्यातील तथाकथित शिक्षित लोकांच्या दृष्टीने लोकगीते म्हणजे अडाण्यांची गाणी होती. परंतु त्यातील प्रतिभा आणि सौंदर्य रवींद्रनाथांनी सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून दिले ही त्यांची मोठीच कामगिरी होती.
जीवनाच्या सर्व बाजूंचा, अंगांचा विचार त्यांनी केला. केवळ अर्थार्जनासाठी उपयोगी पडणारे, जीवनाच्या आणि व्यवहाराच्या दृष्टीने उपयुक्त असणारे शिक्षण त्यांना मान्य नव्हते. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षणातून मिळणारी कोरडी माहिती नव्हे हे त्यांच्या लक्षात आले होते. खरे ज्ञान तेच की ज्यामध्ये मनुष्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचा सुरेख संगम होतो. केवळ बुद्धीच नव्हे तर सारी इंद्रिये चैतन्यमय होतात. केवळ पुस्तकी ज्ञान देणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यांमध्ये माहितीचे भेंडोळे कोंबून त्यांना पदवी देणारी विद्यापीठे यांच्या ते विरुद्ध होते. असल्या शाळांची आणि विद्यापीठांची बंगालमध्ये आणि देशात कमी नव्हती. त्यांची शाळा या सर्वांपेक्षा वेगळी असणार होती. त्यांच्या शाळेत नवनिर्मितीला प्राधान्य होतं, सृजनशील विचारांची आणि त्याचबरोबर कृतीची ती प्रयोगशाळा असणार होती. त्यांच्या शाळेत केवळ अनुकरणाला, पाठांतराला फाटा देण्यात आला होता. शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती यांची आंतरिक प्रेरणा याच संकल्पनेतून निर्माण झाली होती. श्रीनिकेतनात रवींद्रनाथांचे नाट्यप्रयोग, ऋतूंचे उत्सव साजरे केले जात होते. ग्रामीण आणि शहरी जीवनात पडलेलं अंतर कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या पुनर्निमाणासाठी श्रीनिकेतनात प्रयत्न केले जात होते. तर शांतिनिकेतन हे विविध विद्या आणि कला यांच्या शिक्षणाचे माहेरघर होते. विश्वभारती केवळ पदवी वाटप करण्यासाठी नव्हतं तर चैतन्यमय युवक घडावा, त्याची ज्ञानेन्द्रीय आणि कर्मेंद्रियं हातात हात घालून चालावीत आणि त्याच्यातून एक उत्तम नागरिक घडावा हा त्याच्या स्थापनेमागील उद्देश होता.
आपल्या बोलीभाषेतील कविता, संस्कृतातील सुंदर आणि अर्थपूर्ण स्तोत्रे विद्यार्थ्यांची सहज मुखोद्गत होत होती. या कविता, स्तोत्रे चालीवर सहज गुणगुणता येत होती. या पार्श्वभूमीवर इंग्रजी कविता घोकून पाठ करणे त्यांना आवडत नव्हते. इंग्रजीचा त्यांना द्वेष होता, इंग्रजी कविता त्यांना आवडत नव्हत्या असा त्याचा अर्थ नाही. इंग्रजी वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास होताच पण विनाकारण आपल्या विद्यार्थ्यांवर हे ओझे लादण्यासाठी त्यांचे मन तयार नव्हते. त्याकाळी इंग्रजी शिक्षणाच्या निमित्ताने इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर लादलं गेलेलं इंग्रजी भाषेचं जोखड त्यांनी काढून टाकण्याचं ठरवलं.
ते म्हणतात, ' केवळ उपयुक्त आणि आवश्यक गोष्टींमध्येच अडकून राहणं हा मानवी जीवनाचा धर्म नाही. मुलांना अशा गोष्टीत शिक्षणाच्या नावाखाली अडकवून ठेवलं तर त्यांच्या मनाचा विकासच होणार नाही. ' ज्या वयात मुलांना भरपूर आनंद लाभावा, तोच त्यांच्याकडून शिक्षणाच्या नावाखाली हिरावून घेतला जातो. आपण एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला जातो तेव्हा त्या वृक्षाने आपल्याला फुल, फळ आणि सावली द्यावी अशी अपेक्षा आपण करतो की नाही ! अगदी तशाच प्रकारची अपेक्षा घेऊन सामान्य विद्यार्थी शाळेकडे येतो आणि आपण त्याला ती द्यायला हवी, तरच शिक्षणाला काही अर्थ आहे. ( क्रमशः )
Ⓒविश्वास देशपांडे
२०/०६/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा