मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ५ )

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ५ )

जगणे आनंदी करणाऱ्या शैक्षणिक संकल्पना 

मागील चार भागांमध्ये रवींद्रनाथ टागोरांचे व्यक्तिमत्व कसे घडत गेले हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणविषयक संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या या भागात आपण त्यांच्या याच शैक्षणिक संकल्पना जाणून घेण्याचा आणखी प्रयत्न करू या.
रामायण, महाभारताच्या काळात आपल्या देशात शिक्षणासाठी तपोवन किंवा आश्रम पद्धती अस्तित्वात होती. गुरु आपल्या शिष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देत असत. प्राचीन काळातील ऋषीमुनी चिंतन, मनन आणि तपसाधनेतून ज्ञान प्राप्त करीत. त्यातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्या शिष्यांना सहजपणे देता यावे, देशहित आणि समाजहित साधतील असे उत्तम नागरिक त्यातून घडावेत असा त्यांचा उदात्त हेतू होता. हे ऋषीमुनी काही जीवनाला कंटाळून अरण्यात पळून गेलेले नव्हते. त्यांच्यासाठी निसर्गातील पंचमहाभूते म्हणजे खळाळणारे ईश्वरी चैतन्य होते. याच चैतन्याची अनुभूती त्यांना आपल्या शिष्यांना द्यायची होती. केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच त्यांचे जीवन जगणे आनंदी करायचे होते. या उदात्त हेतून आश्रमांची स्थापना त्यांनी केली होती.
रवींद्रनाथांना केवळ आश्रम किंवा तपोवनांची पुनर्निर्मिती करायची नव्हती. जुन्या रूढींचं आंधळेपणाने अनुकरण करणाऱ्यातलेही ते नव्हते. मानव ज्या निसर्गाचा एक भाग आहे, त्या निसर्गाच्या सहवासात मुलांचं व्यक्तिमत्व फुलून यावं, त्यांच्या तरल मानवी संवेदना जाग्या व्हाव्यात हा त्यांचा उद्देश होता. शेक्सपिअर, गटे, होमर आदी कवींच्या काव्यात निसर्ग येतो पण निसर्गाची जी सखोल जाणीव आणि अनुभूती कालिदास, भास, भवभूती आदींची नाटके वाचताना येते, वेद, उपनिषदात त्यांचे जे वर्णन येते तसे ते पाश्चात्य साहित्यात अनुभवास येत नाहीत. आपल्या मुलांना आपल्या भाषेतच शिक्षण द्यावे, येथील काव्य, लोकसाहित्य आदींशी त्यांचा परिचय करून द्यावा असं त्यांना वाटत होतं. ' आमार जीवन, आमार बानी ' असं ते म्हणत त्याचा अर्थ हाच होता.
कालिदासाच्या तपोवनातलं एक सुदंर उदाहरण ते आपल्या ' तपोवन ' या निबंधात देतात. ते म्हणतात, ' शकुंतला आणि तिच्या सख्या आश्रमातील झाडांना पाणी घालत असत. झाडाभोवतीचे आळ भरलं की त्या लांब निघून जात. त्या लांब निघून गेल्यावर पक्षी येऊन ते आळ्यातील पाणी पीत असत. म्हणजे पाणी देताना केवळ झाडांचाच विचार त्या करीत नव्हत्या तर सभोवतालचे प्राणी, पशुपक्षी आदींचाही विचार त्यामागे होता. असा दुसऱ्यांच्या जगण्याचा, कल्याणाचा विचार तपोवनातील शिक्षणामागे होता.
रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला निसर्ग म्हणजे केवळ शांतिनिकेतनाच्या भोवती असलेली वृक्षवेलींनी बहरलेला परिसर नव्हता. तर त्या निसर्गाची अनुभूती शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना यावी असं त्यांना वाटत होतं. वृक्षांच्या शीतल छायेत बसणं, पक्ष्यांची कुजबुज ऐकणं, नदीच्या पाण्यात डुंबणं, त्या पाण्याचा सर्वांगाला स्पर्श करून घेऊन त्या जीवनदायिनी नदीशी आपलं मानसिक नातं जोडणं या सगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या. नाहीतर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या शाळा त्या काळातही होत्याच. सिमला, मसुरी, डेहराडून आदी ठिकाणी अशा शाळा होत्या. आजही अशा अनेक शाळा आहेतच. पण केवळ शाळेभोवती निसर्ग असणं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याची अनुभूती घेता घेता शिक्षण देणं वेगळं. म्हणून रवींद्रनाथांची शाळा या शाळांपेक्षा आगळीवेगळी असणार होती.
पण इतके सुंदर आणि उदात्त विचार असणाऱ्या रवींद्रनाथांकडे आणि त्यांच्या शाळेकडे पाहण्याचा तत्कालीन समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित होता. हा माणूस आमच्या मुलामुलींना नाचगाणी शिकवणार, चित्रं काढायला शिकवणार, निसर्गात रिकामटेकडी भ्रमंती करायला लावणार, कविकल्पनेत रमणार आणि आमच्या मुलांना बिघडवणार असे लोकांना वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या शाळेकडे लोक फिरकायला तयार नव्हते. इंग्रजी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणं म्हणजेच सर्वस्व असं समजणारा समाज मुलांना त्यांच्या शाळेत घालायला तयार नव्हता.
एकीकडे स्थानिक बंगाली लोकांचा असा दृष्टिकोन होता तर दुसरीकडे त्यांच्याकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोनही संशयास्पद होता. आपल्या भाषेत मुलांना शिक्षण देऊ इच्छिणारा, इंग्रजी भाषेचे मुलांच्या मानेवरील जोखड फेकून देणारा हा माणूस त्यांना ब्रिटिशविरोधी वाटत होता. स्वधर्म, स्वभाषा आणि आपली संस्कृती यांचं शिक्षण देणं म्हणजे राजद्रोह असा समज ब्रिटिश सरकारचा झाला होता. लोकमान्य टिळकांना रँडच्या खुनखटल्यात गोवल्याने त्यांनी इंग्रज सरकारवर कडाडून टीका केली होती. तर टिळकांना हा खटला लढताना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी निधीही जमवला होता. या सगळ्या कारणांमुळे ब्रिटिश सरकार रवींद्रनाथांकडे आणि त्यांच्या या शांतीनिकेतनाच्या प्रयोगाकडे संशयाने पाहत होते.
कोणत्याही समाजसुधारकाला एखादी नवीन गोष्टीची सुरुवात करताना जो त्रास सोसावा लागतो, त्या त्रासातून रवींद्रनाथांचीही मुक्तता झाली नाही. या सगळ्या परिस्थितीचे दाहक चटके सोसून त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना कशी केली हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. ( क्रमशः )
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३०/०६/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...