मुख्य सामग्रीवर वगळा

लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..!

उगवतीचे रंग  

लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! 

परवा पेपरमध्ये ( संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ' पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ' आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ' फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ' ऑरेंज '  विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ' लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ' ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. )

आता मला सांगा लॉरेन्स बाईंचे हे चुकले नाही का ? कंपनीने काम नाही दिले म्हणून काय झाले ? पूर्ण पगार तर दिला ना ! त्यातही या बाई दिव्यांग ! तरी त्यांनी असे म्हणावे ? आपल्याकडे तर काही मंडळी काम नको म्हणून दिव्यांग असल्याचा दाखला मिळवतात असेही ऐकिवात आहे. खरं म्हणजे ' असा दिव्यांग दाखला ' मिळवताना त्यांना केवढा त्रास होत असेल, संबंधितांना कदाचित काही पैसेही द्यावेही लागत असतील.  पण त्या बिचाऱ्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही. 

आपल्याकडील नोकरी करणाऱ्या महिलांना जर लॉरेन्सबाई भेटल्या तर काही महिला त्यांचा हेवा करतील. त्यांना म्हणतील, ' तुमचे मागील जन्मातील काहीतरी मोठे पुण्य असावे हो. नाहीतरी अशी नोकरी ( काम न करता पूर्ण पगार देणारी ) कोणाला मिळते का ? 

योगायोगाने याच मी महिन्यात युरोप ट्रीपसाठी गेलो होतो. त्या दौऱ्यात फ्रान्सचा समावेश होता. पण मला या लॉरेन्सबाईंची ही बातमी आताच इथे आल्यावर कळली. तिथे कळली असती तर या बाईंचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला गेलो असतो. त्यांना तुम्ही चुकता आहात अशी जाणीव करून दिली असती आणि त्या कंपनीविरुद्धचा खटला मागे घ्यायला लावला असता. पण एवढे महान कार्य आमच्या हातून होणे नव्हते. मला तर या काम न देता पगार देणाऱ्या कंपनीचा जाहीर सत्कार करावा असे वाटते. अशा कंपन्या भारतात येतील तर आमची केवढी सोय होईल ! बेकारी दूर व्हायला मदत तर होईलच पण आमच्याकडील सज्जन आणि प्रामाणिक माणसे अशा कंपनीला कोर्टात अजिबात खेचणार नाहीत. उलट आमच्याकडील माणसांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल. 

अरे कंपनीत काम नसले म्हणून काय झाले ? त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मनाने पुष्कळ काही करता येईल. पूर्वी महिला देवळात कीर्तन प्रवचन वगैरे ऐकायला जायच्या. त्यावेळी त्या ते प्रवचन ऐकता ऐकता वाती वळत असत असे ऐकले आहे. आता आजच्या जमान्यात वाती वगैरे वळण्याचे काम राहिलेले नाही. पण ऑफिसमध्ये बसून विणकाम करणे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शिकणे, मैत्रिणींशी फोनवर गप्पा किंवा चॅट करणे आम्ही सहज करू शकतो. त्या काळात आम्ही नवीन काही शिकू शकतो. अर्थात नवीन काही शिकलंच पाहिजे असं काही कंपनीचं बंधन असणार नाही. फक्त वेळेत येणं आणि वेळेत जाणं एवढंच आम्हाला करावं लागेल. ते आम्ही आनंदानं करू. अर्थात या सगळ्यांना गोष्टींना काही मोजके अपवाद असतीलही. त्यांना असं काम न करता पगार घेतलेला आवडणार नाही. पण आपण त्यांचा विचार कशाला करायचा ! लोकशाहीत बहुमत फार महत्वाचे ! 

तेव्हा तुम्हाला म्हणून सांगतोकी ही लॉरेंसबाई जर यदाकदाचित भारतात आलीच तर ते आम्हाला मुळीच आवडणार नाही. अरे, पूर्ण पगार देऊनही तक्रार करते म्हणजे काय ? शिवाय कोणतेही काम न करता. स्वातंत्र्यपूर्व काळात वसाहतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. त्यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी ' सायमन गो बॅक ' अशा घोषणा दिल्या. तसेच काहीसे या लॉरेन्सबाई भारतात आल्या तर होऊ शकेल. ' लॉरेन्स गो बॅक ' असे फलक चौकाचौकात लागतील. 

मागे अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. जपानचा राजा वृद्ध झाल्याने  त्याने निवृत्तीची घोषणा केली. जपानमध्ये आता राजेशाही नसली तरी राजघराण्यातील व्यक्तींना मान दिला जातो. अगदी इंग्लंडप्रमाणेच. तर त्या जपानच्या राजाने निवृत्तीची घोषणा केली. आता मला सांगा वय झाले तरी हाती असलेली सत्ता सहजासहजी सोडून कोणी असे निवृत्त होतो का ? आपल्याकडे तर निवृत्तीच्या वयात जरा जास्तच उत्साहाने कार्यरत राहणारी मंडळी पाहिली की मन कसे अभिमानाने भरून येते. त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारांना ते वेड्यात काढतात. संगीत शारदा नाटकातल्या प्रमाणे ' म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..' त्या काळात पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर वर्षे वय असले तरी ती व्यक्ती नवरदेव म्हणून लग्नासाठी तयार असायची. आता लग्नाचं जाऊ द्या हो पण राजकारणात तरी वयाचं ऐशीवं दशक ओलांडलं तरी सत्ता सोडण्याची आमची इच्छा नसते. तेव्हा त्या जपानच्या राजाला काय म्हणावं ? बरं, खरी गंमत पुढेच आहे. त्या राजाचा मुलगा त्याचा वारस म्हणून त्याच्या गादीवर बसला. या आनंदाप्रीत्यर्थ जपान सरकारने लोकांना चक्क दहा दिवसांची सुटी जाहीर केली होती. 

आपल्याकडे तर अशा निर्णयाचं मधुकर तोरडमलांच्या भाषेत सांगायचं तर मोठं हे केलं असतं, मोठा हा केला असती आणि मोठी ही केली असती. मोठं स्वागत केलं असतं, मोठा आनंद साजरा केला असता, मोठी मजा केली असती. फटाके फोडून स्वागत झाले असते. पर्यटनस्थळे फुल्ल झाली असती. त्याला जोडून लोकांनी अजून एकदोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेतल्या असत्या. पण हे जपानी लोक सुद्धा त्या फ्रान्समधल्या लॉरेन्सबाईसारखे. त्यांना जपान सरकारचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. या दहा दिवसात करायचे काय असा वेडगळ प्रश्न त्यांना पडला. या काळात उद्योग ठप्प होतील, उत्पादन बंद पडेल, देशाचे आर्थिक नुकसान होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्या सुटीऐवजी त्यांना ज्यादा काम करून तो आनंद साजरा करायला आवडले असते असेही काही जण म्हणाले. आपल्याकडे अशा लोकांना आपण मुर्खांच्या गणतीत काढू. चांगली दहा दिवस सुटी मिळाली. मस्त फिरायला जायचे किंवा आराम करायचा. मनसोक्त खायचे प्यायचे आणि एन्जॉय करायचे. काम तर नेहमी असतेच ना !काही लोकांना असे वाटते की फ्रान्स, जपान यासारख्या देशांची प्रगती लोकांच्या अशा दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच झाली आहे. पण केवळ सुधारणा, प्रगती, देशहित यांचा सततच विचार किती करीत राहायचा ? आम्हाला आमचे काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही ? आम्ही हौसमौज तरी केव्हा आणि कशी करायची ? छे ! छे ! लॉरेन्सबाई तुमचे आणि जपानी नागरिकांचे  हे चुकलेच ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२४/०६/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...