मुख्य सामग्रीवर वगळा

स्वराज्य - सुराज्य -रामराज्य

उगवतीचे रंग 

स्वराज्य - सुराज्य -रामराज्य  

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. प्रजासत्ताक दिनही साजरा झाला. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. या पार्श्वभूमीवर जरा मागील काळात एक चक्कर मारून येऊ या. काही दृश्ये मी आपल्याला दाखवणार आहे. आपल्याला ती काल्पनिक वाटतील पण त्यांना घडलेल्या घटनांचा आधार आहे. काही लेखातून, पुस्तकातून माझ्यापर्यंत पोहोचलेली ती समाजमनाची आंदोलने आहेत असे समजायला हरकत नसावी. 

दृश्य एक 

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ 

सर्वत्र इंग्रजी राजवट. गोऱ्या साहेबांचा प्रभाव, दिमाख आणि तोरा. गावागावातल्या शाळा भरल्या आहेत. भिंतीवर पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी यांच्या तसबिरी विराजमान आहेत. धोतर, कोट, टोपी घालून लहान मुले शाळेत बसली आहेत. शाळेची सुरुवात ' भो पंचम जॉर्ज... ' अशा काहीतरी शब्दांनी गोऱ्या साहेबाला वंदन करून होते. सातासमुद्राकडून आलेला गोरा साहेब आमच्या या देशावर राज्य करतो. त्याच्या कृपेनेच सर्व काही होत आहे. शिक्षण, विज्ञान, नवनवीन शोध, संकल्पना त्यांच्यामुळेच आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अशी शिकत असलेल्या  बालगोपाळांची कल्पना. इंग्रजांमुळेच आपल्या देशात सुधारणा होत आहेत अशी सर्वसामान्यांची सुद्धा भावना होत होती. आपल्यावर राज्य करून ते आपल्यावर जणू उपकारच करत आहेत असेही काहींना वाटत होते. 

दृश्य दोन 

साधारणपणे १९३१-३२ आणि त्यानंतरचा काळ. देशात स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलेलं. इंग्रज आणि इंग्रजी सत्तेबद्दल कमालीचा असंतोष लोकांच्या मनात निर्माण झाला. सुभाष बाबू, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या असंख्य  क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याचे यज्ञकुंड धगधगते ठेवले होते. अशातच महात्मा गांधी नावाच्या एका महान नेत्याचा देशाच्या राजकीय पटलावर उदय झाला.  गांधी नावाची सर्वसामान्यांवर मोहिनी पडली. मोठ्यातला मोठा आणि सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्या एका हाकेवर सगळं काही करायला तयार, प्राण द्यायलाही तयार झाला. मिठाचा सत्याग्रह, दांडीयात्रा, चले जाव वगैरे चळवळीत लाखोंचा सहभाग. स्वातंत्र्याची चळवळ केवळ नेत्यांची राहिली नाही, जनतेच्या सहभागातून ती पुढे जाते आहे. स्वराज्य मिळालं म्हणजे वर्षानुवर्षे दडपल्या गेलेल्या देशवासियांचा आवाज बुलंद होईल, प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, जनतेचा आवाज हा देशाचा आवाज होईल, स्वातंत्र्यसूर्याच्या प्रकाशात जीवन उजळून निघेल ही सर्वसामान्यांच्या मनातील आशा. तिला अंकुर फुटले. 

***

पंडित नेहरू, सरदार पटेल, आचार्य कृपलानी, सरोजिनी नायडू, डॉ आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, सुभाष बाबू ,राजगोपालाचारी, पंडित मदन मोहन मालवीय हे सगळे आणि असे अनेक दिग्गज नेते जनतेवर प्रभाव गाजवीत होते. त्यांच्या देशप्रेम आणि त्याग या गुणांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव पडलेला. गांधीजींची सूतकताई घरोघरी पोहोचलेली. चरख्यावर कातलेल्या सुताची शुभ्र वसने ल्यायलेले त्यागी पुढारी. डोक्यावर गांधी टोपी. या टोपीचा दिमाख, बडेजाव अजिबात नाही. साधी, स्वच्छ धुतलेली टोपी डोक्यावर शोभून दिसायची. इस्त्री असली काय आणि नसली काय फारसा फरक पडत नव्हता. 

गांधीजींसह ही सगळी मंडळी आपल्याला स्वातंत्र्यानंतर शिताची, छताची आणि सुताची ( अन्न, वस्त्र, निवारा ) करतील. स्वराज्य आपले असेल अशी सामान्य जनतेच्या मनातील भावना. 

ब्रिटिश काळात जनतेवर अन्याय, अत्याचार करणारे सरकारी अधिकारी, बाबू आता या बदलत्या काळात खादीधारी आणि गांधीटोपी परिधान केलेल्या   नेत्यांपुढे कमालीचे नम्र होताना पाहून स्वराज्यातील सुखद चित्र सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभे राहत होते. 

***

' द कम्युनल ट्रँगल इन इंडिया ' या नावाचं एक पुस्तक अच्युतराव पटवर्धन आणि युसूफ मेहेरअली यांनी लिहिलं होतं. त्यात हिंदू आणि मुसलमान म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू आणि तिसरी बाजू म्हणजे ब्रिटिश सरकार असं प्रतिपादन केलं होतं. स्वराज्य आलं की ब्रिटिश सरकार नामक तिसरी बाजू नष्ट होईल आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन बाजू ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी एकजूट होऊन लढत होत्या तशा एक होतील अशी भाबडी आशा लोकांना वाटत होती. 

***

दृश्य तीन 

स्वराज्य दृष्टीपथात आलं. पण स्वराज्याच्या चित्रातील कल्पित सुखद रंग जाऊन भलतेच चित्र दिसायला लागले. ब्रिटिश सरकार नामक त्रिकोणाची तिसरी बाजू गेल्यावर हिंदू मुस्लिम एक होण्याऐवजी त्या दोन बाजूत संघर्ष निर्माण झाला. फाळणी झाली. दंगे भडकले. अन्याय, अत्याचार, महिलांवरील बलात्कार, सामूहिक हत्या अशा रक्तरंजित आणि  छातीत धडकी भरवणाऱ्या बातम्या रेडिओ आणि वर्तमानपत्रातून येऊ लागल्या. स्वातंत्र्याचा आनंद साजरा करावा की अशा घटनांबद्दल शोक व्यक्त करावा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. 

***

व्यापारी साठेबाजी करू लागले. काळाबाजार या नावाचा एक नवीनच अपरिचित बाजार आकार घेऊ लागला. नफेखोरी हेच उद्दिष्ट असलेल्या कंपन्या राजकीय पक्षांना निधी देऊ लागल्या. या पक्षांनी देशासाठी कार्य करावे अशी प्रामाणिक इच्छा या कंपन्यांची किंवा भांडवलदारांची होती यावर भाबडा विश्वास ठेवायची गरज नाही हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा लक्षात आले. पण त्यावर नियंत्रण ठेवणे हे सामान्य माणसाच्या हातात नव्हतेच. 

*** 

ध्येयवादी, त्यागी नेत्यांच्या पिढ्या संपुष्टात येऊ लागल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी त्याग करणारे नेते सत्तेची खुर्ची दृष्टीपथात येताच बदलले. अंगावरची खादी आणि डोक्यावरची गांधी टोपी हिचा रोख सर्वसामान्यांच्या दिशेने न वळता सत्तेच्या दिशेने वळू लागला. सत्तेचे फायदे नेत्यांच्या मुलांना, नातेवाईकांना मिळू लागले. सत्तेचे वारसदार तेच ठरू लागले. गावागावात पांढऱ्या टोप्यांचे पीक आले. नीतिमूल्ये सोयीस्कररीत्या पाळली जाऊ लागली. आपल्या पक्षातील अनुयायी, सहकारी नेत्यांची लांडीलबाडीची, भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपून ठेवून त्या आधारे नेते मंडळी त्यांचा हवा तसा वापर करू लागली. त्यांना आपल्या दावणीला बांधून ठेवू लागले. 

*** 

स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीने सरकारी अधिकारी वागवत होते, त्यात बदल होईल अशी आशा जनतेला होती. सर्वसामान्य जनतेला पुन्हा उपेक्षित जगणे आले. अधिकारी, नेते यांची युती तयार झाली. सरकारी कार्यालयात काही कामासाठी गेलेल्या सर्वसामान्य माणसाला समोरच्या खुर्चीत बसा असे म्हणणे तर दूरच पण त्यांच्याकडे लवकर लक्षही जाणे कठीण झाले. काही अपवाद जरूर असतील पण हे चित्र मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. 

***

स्वातंत्र्यानंतर देशाने प्रगती केली. अनेक क्षेत्रात. औद्योगिक प्रगती झाली, धरणे बांधली गेली, रस्ते झाले, वीज, एस टी बस ग्रामीण भागात पोहोचली. माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, मोलकरणीच्या, गुराख्याच्या हातात मोबाईल आला. म्हटलं तर केवढी क्रांती, केवढी प्रगती ! पण सर्वसामान्य माणूस निर्भय झाला का ? जगातील मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या या देशात निवडणुका लोकशाही मार्गाने तर होऊ लागल्या. पण निवडणूक कशी जिंकायची याचे एक तंत्र तयार झाले. जाती, धर्माचा वापर करून घेतला जाऊ लागला. त्यालाच बहुमताचा कौल असे सुरेख नाव दिले गेले. 

***

स्वातंत्र्यानंतरच्या काळात व्यासपीठावर गांधीजींचे गुणगान, सरकारी कार्यालयात, संसदेत, विधानसभेत नोटेवर इ ठिकाणी गांधीजींची प्रतिमा झळकू लागली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सत्याचा आग्रह, अहिंसा आदी गांधीजींची तत्वे फक्त बोलण्यापुरती उरली. गांधीजी जेव्हा जेव्हा स्वराज्याबद्दल बोलत तेव्हा सुराज्य आणि रामराज्य त्यांना अपेक्षित असे. रामराज्य या शब्दाचा अनेकदा उच्चार ते करीत असत.  स्वातंत्र्यपूर्व काळात मनामनावर राज्य करणारा महात्मा फोटोपुरता उरला. 

*** 

पु लं देशपांडे यांच्या ' खिल्ली ' या पुस्तकात ' एका गांधी टोपीचा प्रवास ' या नावाचा एक लेख आहे. त्यात एक प्रसंग वर्णन केला आहे. गांधी चळवळीत सामील झालेल्या एका ज्येष्ठ नेत्याला पुलं विचारतात की गेल्या पंचवीस वर्षात सर्वात मोठे परिवर्तन कशात झाले असे तुम्हाला वाटते ? तेव्हा ते उत्तरले, ' गांधी टोपीत. पूर्वी गांधी टोपी घालताना इंग्रज सरकारची भीती वाटत होती. आता आपल्याच लोकांची वाटते. खाडीच्या कपड्याकडे, टोपीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला आहे. ' असे म्हणून त्यांनी एक प्रसंग सांगितला. 

' मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलीस स्टेशनजवळ लोक पोलिसांच्या गाडीत शिरून स्वतःला अटक करून घेत होते. त्यात सर्वसामान्य स्त्री पुरुष सारेच सामील झाले होते. त्यात एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरवले. शेजारच्याच एका माणसाच्या हाती दिले. आपलं नाव पत्ता सांगून ते घरी नेऊन द्यायला सांगितले. आणि घरच्या माणसांना सांगा की मी सत्याग्रहाच्या चळवळीत सामील झाले आहे. तिने ज्या माणसाजवळ दागिने दिले तो माणूस म्हणाला, ' बाई, तुमची माझी ओळखसुद्धा नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहचवेन असा तुम्हाला विश्वास का वाटतो ? ' यावर ती तरुण स्त्री उत्तरली, ' तुमच्या अंगावर खादी आहे आणि डोक्यावर गांधी टोपी आहे. त्यामुळे मला खात्री आहे. ' त्या बाईचे हे शब्द पुरेसे बोलके आहेत. आज गांधी टोपीचा वापर कालानुरूप कमी झाला आहे. तरीही नेता म्हटला की खादीचे कपडे, गांधी टोपी, जाकीट वगैरे घातलेल्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येतेच. त्या तरुण स्त्रीने त्या काळात खादीवर दाखवलेला विश्वास आज दाखवता येईल का ? 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

३०/०१/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...