मुख्य सामग्रीवर वगळा

दिवसाची एक छोटी सुरवात...

 उगवतीचे रंग 

दिवसाची एक छोटी सुरवात... 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शिक्षणानिमित्त काही काळ मी एका वसतिगृहात राहत होतो. त्या वेळी त्या ठिकाणी झोपण्यासाठी पलंग नव्हते. फक्त गाद्यांची सोय होती. प्रत्येकाला एक गादी, चादर आणि उशी मिळायची. आमच्यातले काही बहाद्दर त्या गादीची फक्त गोल गुंडाळी करून ठेवायचे. बाहेरून आले की त्या गुंडाळीवर एक लत्ताप्रहार करीत. गादी सरळ होई. त्यावरील बेडशीट कधी सारखे केले तर केले नाहीतर तसेच झोपायचे. पुन्हा उठल्यावर तशाच लत्ताप्रहाराने त्या गादीची गुंडाळी करीत. त्यांचे हे कौशल्य वाखाणण्यासारखेच होते. पण त्या बहाद्दरांना असे कधीच वाटले नाही की गादीची व्यवस्थित गुंडाळी करून ठेवावी. त्यावरील चादरींची घडी घालावी. बाहेरून आल्यानंतर आपल्या अंगातील कपडेही ते अस्ताव्यस्त कुठेही टाकून देत. जाताना पुन्हा तेच उचलून घातले की झाले. याउलट मी अनेक माणसे अशी पाहिली आहेत की ते आपल्या कपड्यांची व्यवस्थित घडी घालून ठेवतात किंवा कपाटातील हँगरला अडकवून ठेवतात. आपले डोळे आपण उघडे ठेवले की अशा गोष्टी आपल्याला दिसतात. जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी बघण्याची आणि त्या अंगवळणी पडण्याची सवय लावून घ्यावी लागते. 

मग मला माझे बालपण आठवले. आम्ही त्यावेळी एका छोट्याशा खेड्यात राहत असू. घरासमोर मोठे अंगण होते. रात्री त्या अंगणात खाटांवर आम्ही झोपत असू. त्यावेळी सगळ्यांची अंथरुणं घालण्याचं काम माझ्याकडे असायचं. मी ते काम कसं करतो यावर वडिलांचं बारीक लक्ष असायचं. गादीवर टाकलेल्या बेडशीटला त्यांना  एकही अढी चालत नसे. पांघरुणं सुद्धा जोडून पटकन अंगावर ओढून घेता येतील असे ठेवायचे. सकाळी उठल्यावर त्याच गोष्टी उलटक्रमाने कराव्या लागायच्या. त्या सगळ्या अंथरुणांची  व्यवस्थित घडी घालून एका तिपाईवर रचून ठेवाव्या लागत. त्यावर एक सुरेखशी चादर किंवा बेडशीट घातले जाई. सकाळी उठल्यावर हे काम आधी करावं लागायचं. पण एकदा सकाळची व्यवस्थित सुरुवात या छोटया कामानं झाली की दिवस कसा छान जायचा. दिवसाची सुरुवात छोटीशीच पण चांगल्या प्रकारे केली की पुढील दिवसही छान जातो.  बऱ्याच वेळा घरही मला झाडावं लागायचं. झाडणं हे काम मला अतिशय सोपं वाटायचं. झाडू किंवा कुंचा घेऊन सरळ झाडून काढायचो. पण ते सुद्धा व्यवस्थित कसं करायचं हे माझ्या बाबांनी मला सांगितलं. खाली एखादी वस्तू पडलेली असेल तर उचलून तिच्याखालूनही व्यवस्थित झाडून घ्यावं लागे, त्यातूनच प्रत्येक काम कसं व्यवस्थित करायचं याचे धडे मिळत गेले. माझी शाळेची वह्या पुस्तकं सुद्धा त्यांना व्यवस्थित ठेवलेली लागत. ते मला म्हणायचे, ' अर्ध्या रात्री एखादं पुस्तक हवं असलं तरी ते पटकन सापडायला हवं. अंधारातही ते तुम्हाला सापडलं पाहिजे. ' 

वडिलांच्या या सूचना त्यावेळी कधी कधी जाचक वाटायच्या पण त्यामुळे पुढील आयुष्याला वळण लागलं. कोणतीही गोष्ट व्यवस्थित आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे, कोणतेही काम व्यवस्थिपणे केलं पाहिजे ही शिकवणच अंगी बिंबली आणि त्याचा उपयोग पुढील आयुष्यात झाला. अमेरिकेच्या नौदलात विल्यम मॅकरेवन या नावाचे एक ऍडमिरल होते. ते म्हणायचे, ' जग बदलण्याची इच्छा तुमच्यात असेल, तर त्याची सुरुवात करा ती स्वतःचे अंथरूण सारखे करण्यापासून. ! ' २०११ ते २०१४ या काळात ते अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांडचे प्रमुख होते. एकदा टेक्सास विद्यापीठात त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला. 

आपल्या दिवसाची सुरुवात आपला बिछाना सारखा करण्यापासून करा असे जेव्हा ऍडमिरल विल्यम सांगतात तेव्हा त्यामागे काहीतरी निश्चित उद्देश असला पाहिजे. अंथरूण सारखे करणे, व्यवस्थित ठेवणे हे पाहिले तर तसे क्षुद्र काम. पण ते छोटेसे काम जर आपल्याला व्यवस्थित करता आले, तर इतर कामेही आपल्याला व्यवस्थित करायची सवय लागेल. चांगल्या गोष्टींची सवय लागावी लागते. चांगल्या सवयी लागाव्या म्हणून जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. वाईट सवयी सहजच अंगवळणी पडतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. 

कोणतेही काम व्यवस्थित करायचं ते केवळ दुसऱ्याची शाबासकी मिळवण्यासाठी नक्कीच नाही. एखादं काम जाणीवपूर्वक छान केलं तर त्याचा आनंद आणि समाधान आपल्या स्वतःलाच किती वाटते हे अनुभवून पहा. अशी कामाची चांगली सुरवात  आपल्याला आनंद तर देतेच पण पुढील कामे चांगली करण्याची प्रेरणा देते. अशाच सवयी आपले आयुष्य घडवीत असतात. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२/१/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...