मुख्य सामग्रीवर वगळा

दार

उगवतीचे रंग  

दार 

प्रिय वाचक, 

रोज मी आपल्याशी एखाद्या लेखाद्वारे संवाद साधतो. आज एका कवितेद्वारा आपल्याशी संवाद साधतो आहे. त्यात मी कितपत यशस्वी झालो हे आपण ठरवायचं आहे. कवितेचं नाव आहे ' दार '. ही कविता आहे स्त्रीच्या तीन पिढ्यातील स्थित्यंतराबद्दल. दार हा शब्द या कवितेत प्रतीकात्मक आहे. बंद दार हे बुरसटलेल्या विचारांचं, गुलामगिरीचं प्रतीक आहे. तर उघडं दार हे पुरोगामी विचारांचं, सुधारणेचं प्रतीक आहे. या कवितेत तीन टप्पे आहेत. ते तीन काळांचं प्रतिनिधित्व करतात. 

***************************************************

या कवितेचा पहिला भाग साधारणपणे ७०/८० वर्षांपूर्वीचा काळ दर्शवतो. त्या काळात समाजाची स्त्रीबद्द्दलची मानसिकता कशी होती  ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. एखादी कोवळी मुलगी जेव्हा सून म्हणून घरात यायची, तेव्हा तिच्या डोळ्यात भावी आयुष्याची काही स्वप्नं नक्कीच तरळत असणार. पण घरातील माणसे,सासू आणि समाज तिची कशी अवहेलना किंवा कुचंबणा करीत होता ते सांगण्याचा हा प्रयत्न. 

बंद दार 


कर्वे, फुले जरी स्त्री शिक्षणाचा करती पुरस्कार 

नकोस जाऊ तू बाहेर, बंद आहे दार. ।। १ ।।

या घरातच आहे काम तुला फार 

नकोस जाऊ तू बाहेर, बंद आहे दार. ।। २ ।।

चूल आणि मूल हेच आहे संसाराचे सार 

नकोस जाऊ तू बाहेर, बंद आहे दार. ।। ३ ।।

शिकून तरी तू कुठे दिवे लावणार फार 

नकोस जाऊ बाहेर, बंद आहे दार. ।। ४ ।।

घरातील कामे, पतीची सेवा कर तू वारंवार 

नकोस जाऊ बाहेर, बंद आहे दार. ।। ५ ।।

 सासरी आलेल्या मुलींसाठी बंध असतात फार 

नकोस जाऊ तू बाहेर, बंद आहे दार. ।। ६ ।।

घरातच द्वारका तुझी घरातच हरिद्वार 

नकोस जाऊ बाहेर, बंद आहे दार. ।। ७ ।।

लिहू नको वाचू नको, शिंग फुटतील फार 

नकोस जाऊ बाहेर, बंद आहे दार. ।। ८ ।।

उंबरठा जरा जरी ओलांडशील तर खबरदार 

नकोस जाऊ बाहेर, बंद आहे दार. ।। ९ ।।

उंबरठ्याआडच जग तुझे मृत्यूनंतरच दार 

नकोस जाऊ बाहेर, बंद आहे दार. ।। १० ।।

*******************************************************

गेल्या चाळीस पन्नास वर्षात परिस्थिती बदलली. कर्वे, फुले आदींच्या विचारांनी स्त्रीमध्ये बंड करण्याची ताकद आली. आता जेव्हा सून घरात येते, तेव्हा ती पूर्वीसारखी चार भिंतीत राहू इच्छित नाही. तिला आता तिच्या पायावर उभे राहायचे आहे, स्वकतृत्वाने जग जिंकायचे आहे. आता ती काय म्हणते ते पहा. 


उघडा आता दार 


नव्या युगाची नारी मी सगळं काही बदलणार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। १ ।। 

हातात आता नाही केवळ पाळण्याची दोरी 

चूल आणि मूल फक्त नाही सांभाळणार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। २ ।।

कर्तृत्वाने माझ्या माझे भाग्य मी बदलणार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। ३ ।। 

शाळा कॉलेजात जायची इच्छा मलाही फार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। ४ ।।

केवळ माझाच नाही, तुमचाही आहे संसार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। ५ ।।

उंबऱ्याबाहेरही विश्व माझे, नच केवळ संसार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। ६  ।।

सावित्रीची लेक मी, मागे का राहणार ? 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। ७ ।।

अडवाल मला जर, दिसेल माझ्या डोळ्यातील अंगार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार ।। ८ ।।

तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने मिळूनच होती साकार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार ।। ९ ।।

दशदिशा मोकळ्या माझ्यासाठी, मागे नाही फिरणार 

उशीर झालाय खूप, उघडा आता दार. ।। १० ।।

************************************************

आजची सावित्रीची लेक आता मुक्त झालीय. मोकळा श्वास घेऊ पाहते आहे. निरनिराळ्या क्षेत्रात मुक्त संचार करते आहे. तिच्या कर्तृत्वाला आता कोणत्याही सीमा नाहीत. ती जणू म्हणते आहे ' आता उघडले दार... '


उघडले आता दार 


एकविसाव्या शतकामधली मी मुक्त मोकळी नार 

उंच भरारी घेईन गगनी, उघडले आता दार ।। १ ।। 

शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ  मी बनणार 

काय उणे आहे मजला, आता उघडले दार. ।। २ ।। 

शिकले आता भवितव्याचा करते मी विचार 

उजाडले सर्वत्र बघा, उघडले आता दार. ।। ३ ।।

अडवू न शकती कोणी मजला, आहे मी झुंजार 

प्रकाशल्या वाटा माझ्या, उघडले आता दार. ।। ५ ।।

इस्रो असो की नासा, आता सर्वत्र माझा संचार 

बघा बघा मी व्यापले जग, उघडले आता दार. ।। ६ ।। 

चंद्र असो वा मंगळावरती मी सुद्धा जाणार 

आकांक्षापुढती गगन ठेंगणे, उघडले आता दार. ।। ७ ।। 

हृदयी माझ्या ममता जरी, डोळ्यात असे अंगार 

तुच्छ न मजला समजा लोकहो, उघडले आता दार ।। ८ ।। 

ना पायातली वहाण, ना मी भोगदासी बनणार 

बाहुत असे शक्ती माझ्या, आता उघडले दार ।। ९ ।। 

तुमच्यासंगे राहून मीही  करिन जगदोध्दार 

जाऊ बरोबर राहू बरोबर, आता उघडले दार. ।। १० ।।


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०३/०१/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी } 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...