मुख्य सामग्रीवर वगळा

पर्यावरणाचे सदिच्छा दूत : दिलीप आणि डॉ सौ पौर्णिमा कुलकर्णी

उगवतीचे रंग


पर्यावरणाचे सदिच्छा दूत : दिलीप आणि डॉ सौ पौर्णिमा कुलकर्णी

तुम्हाला का जगायचं  हे जर कळले तर कसे जगायचं  या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत जाते. आणि जीवनाचं हे ध्येय ज्याला कळलं तो आपलं जीवन समृद्ध तर करतोच, पण इतरांचंही जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावतो. अशाच एका ऋषितुल्य दाम्पत्याचा परिचय आज आपल्याला करून द्यायचा ठरवला आहे. त्यांचं नाव आहे दिलीप कुलकर्णी आणि डॉ सौ पौर्णिमा कुलकर्णी. एकमेकांना सर्वच बाबतीत अनुरूप आणि साथ देणारी ही जोडी. हे दोघंही पर्यावरणाचे सदिच्छा दूत आहेत असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई. या दोघांची यु ट्यूबवरील वेध या सदरात डॉ आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत मी पाहिली आणि त्यांची जीवनशैली, साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो. मग मी आंतरजालावरून आणखी माहिती घेतली. तीच साररूपाने तुमच्यापुढे ठेवतो आहे.  

दिलीप कुलकर्णी म्हणजे एक मनमोकळा माणूस चेहऱ्यावर हास्य. मुक्तपणे वाढेल तशी वाढू दिलेली दाढी. अंगावर इस्तरी न केलेले परंतु स्वच्छ असे सुती कपडे. तेवढेच साधं स्वच्छ आणि पारदर्शक असं हे व्यक्तिमत्व ! आधी ते पुण्यात टेल्कोमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोकरी फार काळ करू शकत नाही कारण आपण जीवन जगण्यासाठी जी तत्त्वं मनाशी ठरवली आहेत, ती यामुळे साध्य करता येणार नाही. सुखवस्तू आणि आरामदायी जीवनशैली प्रदान करणाऱ्या नोकरीमुळे येणारा सुखवस्तूपणा त्यांनी येऊ दिला नाही. किंबहुना तसे जगणे त्यांना मान्यच नव्हते. म्हणून त्यांनी उत्तम पगार आणि प्रतिष्ठा देणारी ही नोकरी सोडली आणि कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद केंद्राशी स्वतःला जोडून घेतलं. काही वर्षे हे काम त्यांनी केलं. त्याबरोबरच ग्राहक चळवळ, ग्रामायन यासाठी काम करायला सुरुवात केली. काही काळ ' विवेक विचार ' या नियतकालिकाचं संपादन केलं. याच काळात त्यांची पौर्णिमाताईंशी ओळख झाली. पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर. दोघांचेही विचार आयुर्वेदाला आणि पर्यावरणाला पूरक असे होते. दोघांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न करून एकत्र आपल्या ध्येयासाठी कार्य करायचे ठरवले. 

पौर्णिमाताईंच्या संसाराच्या कल्पना चारचौघींपेक्षा वेगळ्या होत्या. गाडी, बंगला, साड्या, दागिने या गोष्टीत त्यांचं मन रमणे शक्यच नव्हते. कमीतकमी गरजा ठेवणे, उपभोगाच्या वस्तूंवर नियंत्रण आणणे, ऊर्जेचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे ही तत्वे त्यांनी मनाशी ठरवली होती. 

१९९३ मध्ये दिलीपदादा आणि पौर्णिमाताई आपल्या मुलासह कोकणातील पंचनदी या गावी राहायला आले. त्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी एक प्रकल्प सुरु केला होता. दिलीपजींनी चार वर्षे त्या प्रकल्पाचे काम पाहिले. पण पुढे काही कारणामुळे तो प्रकल्प बंद पडला. त्यानंतर या दोघांनी १९९७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या कुडावळे या गावी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी १० गुंठे जमीन भाडेकराराने घेतली. दिलीपदादा, पौर्णिमाताई यांचा संसार या ठिकाणी सुरु झाला.  दिलीपदादा आणि पौर्णिमाताई हे दोघंही खरे समाजशिक्षक. त्यांचं वाचन, चिंतन सतत  सुरूच होतं. त्यातून त्यांच्या  पर्यावरणविषयक जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत होत्या. त्यातून जे विचारमंथन झालं त्यावरून दिलीपदादा आणि पौर्णिमाताई या निर्णयाला आले की लोकांना केवळ सल्ला देण्यापेक्षा आपण स्वतःच अशी पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करू या.

स्वतः पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर असल्याने आयुर्वेदिक औषधे, जीवनशैली त्यांना उत्तम प्रकारे परिचित होती. पण त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना केवळ औषधे सांगण्यापेक्षा त्यांची जीवनशैली जर आयुर्वेदाच्या तत्वांशी मिळतीजुळती असेल तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. त्यांना हेही लक्षात आलं की पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि आयुर्वेदाची तत्वे यात कुठेही विसंवाद नाही. ते परस्पर पूरक आहेत. त्यामुळे आधी तसे वागून दाखवायचे आणि मगच लोकांना काही सांगायचे असे दोघांनी ठरवले. 

कुडावळे ठिकाणी दिलीपजींनी त्यांना हवे तसं घर बांधलं. त्यांना पर्यावरणपूरक असं मातीचच घर हवे होतं. तस त्यांनी बांधून घेतलं. जमिनीचा तळही मातीचाच.  ही जमीन शेणाने सारवायची. थोडी शेती, थोडं बागकाम करायचं असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला. छोट्याशा कौलारू घरात शांत, सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा आनंद ते घेतात. पण केवळ शेती, बागकाम यातच त्यांना अडकून पडायचं नव्हतं. ' आधी केले मग सांगितले ' या उक्तीचा प्रत्यय या दोघांनी लोकांना आणून दिला. त्यांनी प्रबोधनात्मक लेखनाला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या लोकांच्या नजरा कौतुकात बदलायला सुरुवात झाली. त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे यायला लागली. त्यातूनही त्यांना जनजागृतीचा एक मार्ग गवसला. हे सगळं सुरु असताना त्यांनी ' गतिमान संतुलन ' हे मासिक सुरु केलं. त्याशिवाय हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण, निसर्गायण, विकसित भारत, बदलू या जीवनशैली, अणू विवेक, सम्यक विकास, बसू चरित्र, अहेड टू नेचर, वेगळ्या विकासाचे वाटाडे आदी पुस्तके लिहिली. याच कालावधीत त्यांना ' निसर्गायण ' शिबिराची कल्पना सुचली. पर्यावरणविषयक गोष्टी जाणून घेण्याची ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते अशांसाठी त्यांनी निवासी आणि अनिवासी शिबिरे सुरु केली. 

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई यांना असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो की तुम्ही अशा प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी मोठी किंमत मोजत आहात का ? तेव्हा ते म्हणतात, ' किंमत तर शहरी लोकांना मोजावी लागते. ट्रॅफिक जाम, प्रदूषण, निरनिराळे आजार या रूपाने शहरी लोक ही किंमत मोजतात. आजकाल आपण खूप उपभोगवादी झालो आहोत. उपभोगामुळे अधिकाधिक वस्तूंची हाव वाढत जाते. त्यामुळे उत्पादन वाढवावे लागते. उत्पादन वाढले म्हणजे विकास झाला असे आपण समजतो. पण हा विकास पर्यावरणाची म्हणजे बाह्य आणि आपली आंतरिक हानी करतो. अधिक उत्पादन यावे म्हणून रासायनिक खते, कीटकनाशके आपण वापरतो. यामुळे जमिनीची आणि पर्यावरणाची हानी तर होतेच पण अन्नधान्य, फळे, भाजीपाला, पाणी इ. च्या माध्यमातून हे घातक पदार्थ आपल्या शरीरात जातात. त्यातून अनेक नवनवीन आजारांना आमंत्रण मिळते. 

मग सगळ्यांनी त्यांच्यासारखं शहर सोडून खेड्यात राहायला जावं का ? याचं उत्तर त्यांच्या दृष्टीनं ' नाही ' असं आहे. आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे. ते आपल्याला चार R सांगतात. पहिला R म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत, ज्यांचे लवकर विघटन होत नाही, अशा वस्तुंना refuse करा म्हणजेच नाही म्हणा. जर ते शक्य नसेल तर दुसरा R म्हणजे reduce म्हणजे त्या वस्तूचा कमीतकमी वापर करा. तिसरा R म्हणजे reuse . त्या वस्तूंचा पुनर्वापर करा. आणि चौथा R म्हणजे recycle. म्हणजे त्या वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी करा. उदा. कागदाची रद्दी रद्दीवाल्याकडेच द्या जेणेकरून त्यापासून नवीन कागद निर्मिती होईल. अधिक वृक्षतोड करावी लागणार नाही. 

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई ज्याला आपण लाल डबा म्हणून हिणवतो त्या लाल बसनेच प्रवास करतात. जवळ जायचं असेल तर शक्यतो पायीच जातात. त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर सायकल वापरतात. लांबच्या अंतरासाठी लाल बसचा वापर करतात. ए सी तर नाहीच नाही. बसच्या प्रवासात काढलेलं तिकीट सुद्धा ते जपून ठेवतात. त्याच्या पाठकोऱ्या भागाचा त्यांना काहीतरी लिहिण्यासाठी उपयोग होतो. ते तिकीट नंतरही ते फेकून देत नाहीत. रद्दीच्या कागदाची एक पिशवी त्यांनी केली आहे. त्यात ते ठेवतात. पुरेशी रद्दी साठल्यावर रद्दीवाल्याला देऊन टाकतात. त्यांना अमेय आणि सृजन अशी दोन मुले आहेत. अमेय पुण्यात बी एस्सी करतो. सृजन दापोलीच्या शाळेत शिकतो. दोघंही सायकल वापरतात किंवा आपल्या आईवडिलांप्रमाणे बसचा वापर करतात. आपल्या आईवडिलांची साधी जीवनशैली त्यांनीही अंगिकारली आहे. ही दोन्ही मुले इतर सर्वसामान्य मुलांसोबत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकली. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांसोबत त्यांना मुक्तपणे शिकू दिले, खेळू दिले. समाजाच्या, निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढतील याची काळजी घेतली. 

जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात असे विचारल्यावर दिलीपदादा हसत हसत म्हणतात. आम्हाला महिना पाच हजार रुपये खूप होतात. त्यातूनही पैसे उरतात. शिवाय आता पुस्तकांची रॉयल्टी, व्याख्यानांचे मानधन वगैरे धरून दहा बारा हजार रुपये मिळतात. एवढ्या पैशांचं काय करायचं हा प्रश्नच पडतो. ते म्हणतात, ' अर्थार्जन करायचं ते केवळ उदरनिर्वाहासाठीच ! अनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा नाही. तुम्ही आम्ही तर चपला, बूट, कपडे, फर्निचर इ. वस्तूंचा किती अनावश्यक साठा करतो. निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगायचं. बागकाम करायचं. त्यानं आनंद मिळतो. माणूस हा दिनचर प्राणी आहे. निशाचर नाही. त्यामुळे दिवसा काम करावं. रात्री जागत बसून विजेचा अपव्यय करू नये. दिवसाचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो. रात्री काम करण्याने संगणक, मोबाईल वापराने डोळ्यांवर ताण पडतो. दिवसा उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर करून घ्यावा. कपडे वाळवण्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता सूर्यप्रकाशात ते वाळवावेत. भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करावा म्हणजे तेच सांडपाणी बागेला वापरता येते. शहरातील लोक पाण्याची अक्षरशः नासाडी करतात. कपडे, भांडी धुण्यासाठी नळ सुरूच ठेवतात. गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरतात. त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी ओल्या फडक्याने पुसली तर कमी पाण्यातही स्वच्छ करता येते. अंघोळीसाठी साबण वापरण्याची आवश्यकता नाही. साबण वापरला नाही तर अर्धी बादली पाण्यातसुद्धा छान अंघोळ होते. शिवाय ते पाणी झाडांना वापरता येते. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करत नाहीत. ते वाळलेल्या काटक्या किंवा तुटलेल्या फांद्यांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करतात. त्याशिवाय सोलर कुकर स्वयंपाकासाठी वापरतात. त्यांच्या घरात टीव्ही नाही, मिक्सर नाही. बातम्या कळण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक रेडिओ फक्त आहे. ताक रवीने घुसळतात. काही वाटायचे असले तर पाट्या वरवंट्यावर वाटतात. असे करण्यासाठी कष्ट जरूर पडतात, वेळ लागतो पण त्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय शारीरिक व्यायाम होतो. महिन्याकाठी जेमतेम एक ते दोन युनिट ते वीज वापरतात. त्याचे सत्तर पंचाहत्तर रुपये बिल येते तेवढेच. पण ते गमतीनं म्हणतात, ' आम्ही टाटा अंबानींपेक्षा महागडी वीज वापरतो. एका युनिटला सत्तर रुपये ! ' 

जीवन जगण्याची काही सूत्रे त्यांनी ठरवली आहेत. त्याप्रमाणे आधी ते वागतात आणि मगच लोकांना सांगतात. 

 सूर्योदवपूर्वी उठावेच. अनेशापोटी काही व्यायाम वा योगासने करावी. ट्रेडमिलवर व्यायाम करणे त्यांना मंजूर नाही कारण त्यासाठी विनाकारण विजेची नासाडी होती. त्यापेक्षा फिरायला जाणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे निसर्गाचे सान्निध्यही लाभते. दिवसातून एखादा तास तरी थोडा घाम येईपर्यंत काही शारीरिक कष्टाचे काम करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. झाडं, माती, पालापाचोळा म्हणजे घाण नाही. जे बायो डिग्रेडेबल आहे त्यामुळे रोग होत नाहीत. माती, पालापाचोळा यांना रोज एकदा तरी हात लागलाच पाहिजे. घरात नैसर्गिक खेळती हवा आणि पुरेसा उजेड असावा. पंख्याची गरज भासू नये आणि गरज लागलीच तर अगदी कमीतकमी वापर करावा. ए सी चा वापर तर नकोच. माठातील पाणी प्यावे. फ्रीजचा वापर टाळावा. ताजे अन्न, फळे, भाजीपाला खावा. शक्यतो घरीच जेवावे. बाहेरचे खाऊ नये. प्रवासात जाताना सुद्धा दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्टीलचे ग्लास सोबत नेतात. त्यातच ते चहावाल्याकडून चहा घेतात. चहासाठी कागदी वा प्लास्टिकचे मग वापरून पर्यावरणाची हानी करणे त्यांना मान्य नाही. दुपारी सूर्य डोक्यावर आला की जेवावं आणि संध्याकाळी अंधार पडण्याआधी जेवून घ्यावं. रात्र ही विश्रांतीसाठी आहे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे या समर्थांच्या उक्तीचं ते पालन करतात. ते म्हणतात गरज आणि हाव यात आपल्याला फरक करता आला पाहिजे. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो पण आपली हाव मात्र तो पुरी करू शकत नाही. आपल्या उत्पादन वाढीच्या आणि हावेच्या लालसेमुळे निसर्गाला आपण ओरबाडतो आहोत. पुढच्या पिढ्यांसाठी आपण काही ठेवणार आहोत की नाही ?

त्यांचं एकंदरीत वागणं आपल्यासारख्या शहरी जीवनमान अंगवळणी पडलेल्या लोकांना विचित्र वाटेल. उपभोगासाठी विविध वस्तूंचा संचय करणाऱ्या आणि त्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्यांची जीवनशैली पचनी पडणार नाही. पण हे लक्षात घ्यायलाच हवे की हे दोघे उच्चशिक्षित आहेत. केवळ मी पर्यावरणस्नेही वागून असा कितीसा फरक पडणार आहे असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. गांधीजींचे फोटो लावून व्यासपीठावर त्यांच्यावर बोलणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा गांधीजींच्या तत्वांचे खरे अनुकरण या दोघांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या दोघांची आध्यात्माची बैठकही पक्की आहे. विचारांची बैठक पक्की आहे. एकदा ठरवले की ते निर्धाराने करतात. गेली पंचवीस वर्षे ते ही जीवनशैली जगत आहेत.अनेक मंडळी आवर्जून त्यांचं घर, त्यांची जीवनशैली पाहायला जातात. अशा व्यक्तींचंही ते स्वागत करतात. त्यांचे ' स्वप्नामधील गावा ' हे पुस्तक त्यांना असे जीवन जगताना आलेले अनुभव आपल्याला सांगते. ' थेंबांनी जर भरते घागर, का उधळावा उगाच सागर ? ' हे त्यांचे तत्वज्ञान आपणही एकदा जरूर विचार करावा असे आहे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
 २७/०१/२०२४
 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...