मुख्य सामग्रीवर वगळा

ते चाळीस दिवस

 Vishwas Deshpande:

उगवतीचे रंग

ते चाळीस दिवस...

१ मे २०२३ चा दिवस. आपण सगळे महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्र दिन साजरा करत असताना कोलंबिया देशातील अमेझॉनच्या जंगलात एक महाभयंकर घटना घडत होती. कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर आणि अद्भुत असतं . एखाद्या चित्रपटाचा विषय व्हावा अशी ही हकीगत. कोलंबिया देशातील सेस्ना २०६ हे छोटंसं खाजगी विमान एका छोट्या गावातील काही लोकांना घेऊन सॅन जोस डेल ग्वावियारे या शहराकडे निघालं होतं. या विमानात त्या विमानाच्या वैमानिकासह एकूण सात जण प्रवास करत होते. एक स्थानिक नेता होता. एक आई तिच्या चार लहान मुलांना  सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघाली होती. अमेझॉनच्या जंगलातील हितोतो या आदिवासी जमातीतील हे सगळे रहिवासी होते. तेथील सशस्त्र टोळ्यांच्या दहशतीपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांना आपलं गाव सोडणं भाग पडलं होतं. पण हायरे दैवा ! सुरक्षिततेच्या शोधात जाणाऱ्या या निष्पाप जीवांचं विमानच असुरक्षित झालं. विमानानं साधारणपणे ३५० किमी चा पल्ला पार केला असेल नसेल तोच विमानाच्या इंजिनात काहीतरी बिघाड आहे याची वैमानिकाला जाणीव झाली. आता आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे हे त्यानं विमानातील सगळ्यांना सांगून टाकलं. थोड्याच वेळात त्या विमानाचा रेडिओ संपर्क तुटला. पुढच्या काही क्षणातच भयानक आवाज करीत ते विमान अमेझॉनच्या घनदाट जंगलात कोसळलं. हे विमान एका झाडावर कोसळलं आणि झाडावरच अडकून पडलं. या दुर्दैवी अपघातात वैमानिक आणि  त्या विमानात असलेला स्थानिक नेता मृत्युमुखी पडले.आपल्या आईसोबत प्रवास करीत असलेल्या त्या छोट्या चार मुलांची जीवनरेखा मात्र बळकट होती. या भयानक अपघातातून ते छोटे जीव आश्चर्यकारकरित्या बचावले. त्या मुलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघालेली ती माता मात्र गंभीर जखमी झाली होती. तिची वाचण्याची कोणतीही शक्यता दिसत नव्हती. पण अशाही परिस्थितीत या मातेने चार दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण कोणतीही मदत वा वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने तिने या जगाचा निरोप घेतला. तिचा जीव अडकला होता तिच्या पिलांमध्ये. जाता जाता त्यांना कसं जगायचं हे ती सांगून गेली. मला इथेच सोडून द्या आणि तुम्ही सुरक्षित जागी पोहचण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा जीव वाचवा. 

या चार छोट्या मुलांमध्ये होती लेस्ली नावाची एक तेरा वर्षांची मुलगी. तिच्यासोबत होती तिची तीन लहान भावंडं. सोलेनी वय वर्ष नऊ, टिएन वय वर्षे फक्त चार आणि लहानगी क्रिस्टीन. क्रिस्टीन तर अगदीच कोवळी. जेमतेम एक वर्षाची. अपघातातून बचावले तरी जिवंत राहणे या मुलांसाठी सोपं नव्हतं. नियती जणू त्यांची कठोर परीक्षा घेत होती. अमेझॉनच्या जंगलाचं नुसतं नाव जरी काढलं तरी भल्याभल्यांचा थरकाप होतो एवढं हे भयानक जंगल. या जंगलात दिवसाही सूर्यप्रकाश सगळीकडे पोहोचू शकत नाही एवढं ते घनदाट आणि उंच. जंगलामध्ये हिंस्त्र प्राण्यांचा सुळसुळाट. डास, विषारी कीटक, साप यांचा वावर. जवळपास कोणतीही मानवी वस्ती नाही. मदत मिळण्याची शक्यता नाही. भरीत भर म्हणजे हे जंगल तस्करांचा आणि दहशतवाद्यांचा अड्डा. अशा या जंगलात ही कोवळी पोरं आपल्या आयुष्याशी झुंजत होती.

अपघात घडल्याचे कळल्यानंतर कोलंबियामध्ये एकच हलकल्लोळ उडाला. कोलंबिया सरकारने विमानाचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु केली. तेथील पोलीस दल, सैन्यदल आणि बचाव पथकाची माणसं या विमानातील माणसं, मुलं कुठे आढळताहेत का याचा नियोजितपणे शोध घेऊ लागले. शोधकार्यात अमेझॉनच्या घनदाट जंगलामुळे अनेक अडथळे येत होते. पण नेटाने शोध घेणे सुरूच होते. अखेर झाडावर अडकलेले विमान शोधपथकाला सापडले. विमान अपघातात ठार झालेल्या व्यक्तींचे मृतदेह मिळाले. पण ती चार चिमुकली बालके मात्र कुठे आढळत नव्हती. सगळ्यांना चिंता आणि उत्सुकता होती ती त्यांची. हे बचावकार्य अक्षरशः चाळीस दिवस चालू होते. अतिशय घनदाट असे अमेझॉनचे जंगल ही माणसे पिंजून काढत होती. जमिनीवर म्हणजेच प्रत्यक्ष जंगलात जाऊन शोध  घेणारी बचावपथके होती तशीच हेलिकॉप्टरचा वापर करून आकाशातूनही शोध घेणे सुरु होते. इच्छा असली की मार्ग दिसतोच. या शोध पथकाने मुलांच्या आजीकडे जाऊन तिच्या आवाजात आणि त्या मुलांच्या स्थानिक भाषेत एक ऑडिओ मेसेज रेकॉर्ड केला. त्या ऑडिओत आजी म्हणत होती, ' बाळांनो, आहेत तिथेच थांबा. आम्ही तुमचा शोध घेतोय. तुम्ही आम्हाला हवे आहात. आम्ही तुमची वाट पाहतोय.' हा आजीच्या आवाजातील संदेश ती शोधपथके मुलांसाठी मोठ्या आवाजात प्रक्षेपित करत होती. ती मुले एकाच ठिकाणी थांबावी आणि त्यांना शोधणे सोपे जावे हा उद्देश होता. त्या मुलांना खायला मिळावं यासाठी हेलिकॉप्टरमधून खाद्यपदार्थांची पाकिटे टाकण्यात येत होती.

इकडे या बालकांचा आयुष्याशी लढा सुरु होता. तशी तेरा वर्षांची लेस्ली लहानच ! पण आता ती सगळ्या भावंडांमध्ये मोठी होती. आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी नियतीनं तिच्यावरच टाकली होती. लेस्लीने धीर एकवटला आणि निश्चय केला की या परिस्थितीतही आपण आपल्या भावंडाना वाचवायचं. जगायचं आणि जगवायचं तर खाण्यासाठी काहीतरी व्यवस्था करणं भागच होती. सुरुवातीला विमानातून खाली पडलेल्या अन्नावर त्यांनी कसेबसे दिवस काढले. पाण्याचा शोध घेतला. जंगलातील फळे खाणे तसे धोक्याचे होते कारण काही फळे विषारीही असतात. पण लेस्ली जंगलकन्या होती. आदिवासी जमातीतील होती. जंगलात कसे राहायचे, आपला बचाव कसा करायचा, काय खायचे आणि काय खायचे नाही याचे ज्ञान तिला लहानपणापासून मिळाले होते. अवघ्या एक वर्षाच्या क्रिस्टीनालाही सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर होती. लेस्ली आणि तिची भावंडे नियतीने घेतलेल्या कठोर परीक्षेत यशस्वी झाली. चाळीस दिवस या मुलांनी जीवनमरणाचा लढा दिला होता. कशी राहिली असतील ही मुलं ? त्यांनी काय खाल्लं असेल ? पाण्याची तहान त्यांनी कशी भागावली असेल ? केवळ एका वर्षाच्या बाळाला त्यांनी कसे सांभाळले असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.

इकडे शोधपथकाचे कार्य सुरूच होतं. स्निफर डॉगसह १५० सैनिक या मुलांचा शोध घेत होते. अखेर त्यांना या मुलांच्या काही खाणाखुणा मिळायला सुरुवात झाली. एक दुधाची बाटली, डायपर, कात्री, केस बांधण्याची क्लिप आणि आणखी काही वस्तू मिळाल्या. मुलांच्या पायांचे ठसे आढळले. शोधपथकाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. चारही मुलं आश्चर्यकारकरित्या त्यांना जिवंत मिळाली. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ही आनंदवार्ता जाहीर केली. ते म्हणाले, ' इतक्या भीषण परिस्थितीतही ही मुले चाळीस दिवस जिवंत राहिली, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ही मुले राष्ट्राचे भूषण आहेत. ' या मुलांना त्यांना चिल्ड्रन ऑफ कोलंबिया म्हणून जाहीर केले. अत्यंत विपरीत परिस्थितीत राहिल्यामुळे ही मुले कमालीची अशक्त आणि आजारी झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी कोलंबियाची राजधानी बोगोटा इथे नेण्यात आले.

या घटनेला आपल्या मनोवृत्तीप्रमाणे केवळ ' देव तारी त्याला कोण मारी ' असे म्हणून सोडून देता येणार नाही. या घटनेत मुलांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तर आहेच पण विपरीत परिस्थितीतही जीवन जगण्याचं जे ज्ञान आणि कौशल्य त्यांच्याकडे होतं त्यामुळे ती जिवंत राहू शकली. ही घटना आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करते. आपल्याकडील मुले समजा अशा विपरीत परिस्थितीत अपघाताने सापडलीच तर ती कितपत तग धरू शकतील ? आपण मुलांना शालेय शिक्षण देत असताना अशी काही कौशल्यं शिकवतो का ? पूर, भूकंप, आगीच्या घटना, रोगाच्या साथी,दुष्काळ आणि अन्य काही नैसर्गिक आपत्तीपांसून बचाव करायचे आपण त्यांना शिकवतो का ? आपण त्यांना फक्त पुस्तकी किडे बनवत नाही का ? घोकंपट्टी करून परीक्षेत उतरवलेले ज्ञान अशा परिस्थितीत कितपत उपयोगी ठरू शकेल ? आपण मुलांमध्ये पोहणे, झाडावर चढता येणे, सायकल चालवता येणे, आपल्या वाहनाची दुरुस्ती करता येणे, जंगलातील वनस्पती आणि फळांची माहिती असणे, पाण्याचा शोध कसा घ्यायचा यासारख्या गोष्टींची कौशल्ये विकसित करतो का असा प्रश्न आहे. दरवर्षी वेगवेगळ्या सहलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतो. घनदाट अरण्ये, वाळवंट इ. ठिकाणी हरवण्याच्या घटना घडू शकतात. असे प्रसंग सांगून येत नाहीत. अशा प्रसंगी साहस, प्रसंगावधान, जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा, आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठीची सकारात्मक आणि कणखर मानसिकतेची आवश्यकता असते. कोलंबियात घडलेल्या अशा घटना आम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. प्रश्न असा आहे की आपण त्यापासून काही शिकणार का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

०९/०१/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...