मुख्य सामग्रीवर वगळा

गाठी आतल्या आणि बाहेरच्या

 उगवतीचे रंग 

गाठी आतल्या आणि बाहेरच्या 

परवा माझा एक मित्र दुसऱ्या एका मित्राबद्दल बोलताना म्हणाला, ' अरे, तो ना फार आतल्या गाठीचा आहे बरं का ! त्याच्यापासून सावध राहा. ' तो हे बोलून तर गेला पण मी विचार करायला लागलो. खरोखर आतल्या गाठीचा म्हणजे कसा असेल ? तसा हा शब्द मला नवीन नव्हता. मी लहानपणापासून तो ऐकत आलो होतो. आतल्या गाठीचा म्हणजे आपल्या मनात काय आहे ते दुसऱ्या व्यक्तीला सहजासहजी समजू न देणारा. या अर्थाने मला हा शब्द माहिती होता. पण तो कसा आला असावा याचा विचार करता करता मला गाठी आठवल्या. 

पूर्वी किराणा दुकानातून वाणसामान आणताना वाणी ते सामान बहुधा कागदात बांधून द्यायचा. त्याला एक दोरा गुंडाळून त्याची गाठ मारली जायची. घरी गेल्यावर वस्तू काढताना हा दोरा सोडायचा. कधी कधी सुती दोरी किंवा सुतळीने बांधलेली एखादी वस्तू घरात यायची. त्यालाही सुतळी गच्च आवळून गाठ मारलेली असायची. ही गाठ सोडवण्याचे दोन मार्ग असायचे. एक म्हणजे हातांनी ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरा मार्ग अतिशय सोपा. तो म्हणजे ब्लेड, सुरी किंवा कात्री यांच्या साहाय्याने ती गाठ कापून काढणे. यातील पहिला प्रकार माझा आवडता. त्या गाठीवर शल्यकर्म करण्याआधी हाताने ती सुटते का हे पाहायला मला आवडायचे. काहींना तेवढा धीर नसायचा. ते आपले पटकन ब्लेड, सुरी इ. चा वापर करून ती दोरी कुठेही कापायचे. मग अशा वेळी ती दोरी अखंड न राहता तिचे तुकडे व्हायचे आणि पुन्हा ती वापरता येईलच अशा कामाची राहायची नाही. ती पुन्हा वापरायचीच असेल तर पुन्हा तिला गाठीच माराव्या लागायच्या ही त्यातली गंमत. 

गाठींचेहि वेगवेगळे प्रकार. काही सहज सुटणाऱ्या. आणि काही निरगाठी. निरगाठी म्हणजे सहजासहजी न सुटणाऱ्या. गाठी या जीवनातील अडचणींचे निदर्शक आहेत असं मला वाटतं. जशा काही गाठी सहज सुटतात, तशा जीवनातील काही अडचणींवर प्रयत्नांनी सहज मात करता येते. काही गाठी या निरगाठी असतात. त्या सहज सुटत नाहीत. जीवनातील काही अडचणी सुद्धा अशाच असतात. त्या सोडवत बसण्यात वेळ वाया घालवणे किंवा त्याबद्दल सतत कुरकुरत राहण्यापेक्षा त्यांचा एकदा स्वीकार केला की जगणं तसं सोपं होऊन जातं. अशा गोष्टी माणसाची सहनशक्ती वाढवतात, जगण्याचं बळ देतात.

शरीरावर असणाऱ्या गाठी हा मात्र गाठींचा एक वेगळाच प्रकार ! शरीरावर दिसणाऱ्या गाठी या लक्षात येतात. त्या लक्षात आल्या म्हणजे त्यावर काही उपाय तरी करता येतो. अलीकडे गोळ्या औषधांनी त्या गाठी विरघळवणे किंवा ऑपरेशन करून त्या काढून टाकणे अशा गोष्टी करता येतात. पण अर्थात त्या लक्षात आल्या तर... पण शरीराच्या आत वाढणारी गाठ ? ती फार धोकादायक असते. सहजासहजी लक्षात येत नाही. एखादी शारीरिक समस्या जेव्हा उग्र रूप धारण करते, तेव्हा वैद्यकीय तपासणीअंती अशी गाठ लक्षात येते. कधी कधी अशा गाठींवर उपचार करणे कठीण होते कारण रोग हाताबाहेर गेलेला असतो. म्हणूनच वर दिसणाऱ्या गाठीपेक्षा ही आतली गाठ अतिशय घातक असते. 

खरं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आतल्या गाठीचा म्हणतो, तेव्हा ती गाठ त्याच्या शरीरापेक्षा मनाशी अधिक संबंधित असते. सरळ वागणाऱ्या साध्या माणसांचे व्यक्तिमत्व पारदर्शी असते. मन निर्मळ असते. त्यात कुठे काही कचरा, घाण साठलेली नसते. स्वच्छ, नितळ पाणी पारदर्शक असते. त्याचा तळ सहज दिसतो. गढूळ पाण्याचा अंदाज येत नाही. तसंच मनाचंही असतं. मनाचा तळ दिसत नाही. जेव्हा मनात घाण किंवा कचरा साठतो, तेव्हा गाठ निर्माण होते. ही गाठ बाहेरून दिसत नाही. जसा शरीरात किंवा शरीरावर मळ साठू देऊन चालत नसते, तसेच मनातही साठणार नाही याची दक्षता आपल्याला घेता येईल का ?  संत कबीर म्हणतात 

मन मैला तन उजला, बगुला कपटी अंग ।

तासो तो कौवा भला, तनमन एकही रंग ।। 

आजकाल दिखाऊ संस्कृती वाढली आहे. कबीर म्हणतात त्याप्रमाणे वरवर  झकपक कपडे, दागिने, सुगंधी स्प्रे पण आतून मन मात्र स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध यासारख्या गोष्टींनी मलीन झालेलं. अशा माणसांना कबीर बगळ्याची उपमा देतात. बगळा दिसायला पांढराशुभ्र पण त्याचं लक्ष मात्र शिकारीकडे ! त्यापेक्षा कावळा तरी चांगला. आत एक आणि बाहेर एक असा प्रकार नाही. संत तुकाराम म्हणतात, ' बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले. अंगे झाडीन अंगण, त्याचे दासत्व करीन  ' अशा माणसांची तर मी सेवासुद्धा करायला तयार आहे असे तुकाराम महाराज म्हणतात.एवढा महिमा साध्या सरळ आणि निर्मळ मनाच्या माणसांचा आहे. पण असे वागणे मुळीच सोपे नाही. त्यासाठी सदग्रंथ, सद्विचार आणि सज्जनांचा संग यांची कास धरावी लागेल. मनाला जाणीवपूर्वक वळण लावावे लागेल. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१०/१२/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...